Goan Varta News Ad

बोलते व्हा

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
13th September 2020, 12:27 Hrs
बोलते व्हा

काही दिवसांपूर्वी याच शीर्षकाचा एक लेख आमच्या साहित्यप्रेमी गटाच्या एका सदस्याने व्हॉट्सअपवर टाकला होता. गेल्या अनेक दिवसांपासून, विशेषतः जेव्हा मी गावातून शहरात स्थलांतरित झालो तेव्हापासून हा विषय माझ्या डोक्यात घोळत होता. नोकरीच्या कालावधीत मी गावातच राहात होतो. बालपण मुंबईच्या एका उपनगरात गेले. त्या काळात म्हणजे सुमारे ५०-६० च्या दशकात आमच्या सारख्या मध्यमवर्गीयांचे चाळ हेच आश्रयस्थान होते. त्या काळात चाळ ही एक संस्कृती होती. आणि इतर नामशेष  झालेल्या संस्कृती प्रमाणेच ही संस्कृतीही अपार्टमेंट्सच्या पायाखाली दबली गेली. एकमेकांना टेकून असलेल्या सुमारे १०-१२ बिऱ्हाडांची रांग. प्रत्येक बिऱ्हाडाला दोन खोल्या. टू बीएचकेचा सारा संसार यात मांडला जायचा. पुढच्या बाजूला सर्व बिऱ्हाडांना कॉमन असा व्हरांडा. याचा उपयोग येण्या-जाण्यासाठी, मधल्या वेळेत आमच्या सारख्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी आणि कुणाकडे पाहुणे आले तर रात्री झोपण्यासाठी असा होत असे. व्हरांड्याचा कठडा कपडे वाळत घालण्यासाठी तर चाळीसमोरची  मोकळी जागा सामान्यपणे कचरा टाकण्यासाठी उपयोगात आणली जाई. 

दुपारी चाळीतल्या बायकांचे वनिता मंडळ भरे. वाटीभर साखर, कपभर दूध यासारख्या वस्तूंची देवाण घेवाण होत असे. एखाद्या बिऱ्हाडात पापडांचा घाट घातला तर न सांगता आजूबाजूच्या बायका पोळपाट लाटणं घेऊन येत. पापड लाटताना कुचाळक्या किंवा आजच्या भाषेतील गॉसिपिंगही चाले. पण ते तेवढ्या पुरतेच असायचे. पापड लाटून झाल्यावर पोळपाट धुवून स्वच्छ करावा तशाच स्वच्छ मनाने त्या परत जात. एखाद्या बिऱ्हाडात लग्न ठरले तर घर रंगवण्यापासून वरातीची तयारी करेपर्यंत सारे चाळकरी एकत्र येत. रात्री- अपरात्री कुणी आजारी पडला तर वेळेची पर्वा न करता शेजारी मदतीला धावून येत. हळदीकुंकू, सत्यनारायणाची पूजा या सारख्या कार्यक्रमांना वेगळे निमंत्रण द्यावे लागत नसे. याचा अर्थ चाळीत सगळी संतमंडळी राहात होती असा नाही. इथेही राग, लोभ, मत्सर, असूया यासारख्या गोष्टी होत्या. पण त्या चवीपुरत्या. त्यामुळे मूळ पदार्थाची लज्जत बिघडत नसे. कुणाला  राग आला तर तोंडावर बोलून दाखवत. प्रसंगी भांडतसुद्धा. पण, कुकरची वाफ निघून गेल्यावर तो जसा थंड होतो तसं भांडण संपलं की पुन्हा एक होत. चाळीतलं जीवन हे पाण्यावर मारलेल्या काठी प्रमाणे होतं. क्षणभर ते दुभंगल्यासारखं वाटे, पण पुन्हा ते प्रवाही होई. 

गावातलं जीवन हा माझ्यासाठी सुखाचा काळ होता. मोकळेपणा हा गावातल्या जीवनाचा स्थायीभाव. घराला सेफ्टी डोअरची गरज नव्हती. घराची दारे सकाळी उघडत ती रात्री झोपताना बंद होत. वाड्यावरील सर्वजण प्रत्येकाला व्यक्तिशः ओळखत. आमचं घर रस्त्याला टेकूनच होतं. त्यामुळे रस्त्यावरून कोणीही चालले तरी, थोडं थांबून आणि " ओS गाS कसो आसा? किदें करता? " असे विचारून, दोन मिनिटे गप्पा मारल्याशिवाय पुढे जात नसे. वाड्यावरची एखादी शेजारीण, "गेS व्हनीबाय, किदें करता गे? हो पळय, तायकिळो हाडला तुका." असे म्हणून थेट स्वयंपाकघरात जाई. घरात शिरताना किंवा तायकिळा दिल्यावर, "इल्ली चाय दी मगे" असे सांगताना तिला जसा संकोच वाटत नसे, तसाच व्हनीबायलाही त्यात काही वावगं वाटत नसे. सोमवारी देवळात भजन होई. चतुर्थीला प्रत्येकाच्या घरी जाऊन घुमटावरच्या आरत्या होत. विसर्जनाच्या दिवशी वाड्यावरचे सर्व गणपती एकत्र येऊन दिंडी घालत उत्साहाने विसर्जन होत असे. एखाद्या घरात लग्न ठरले तर माटव घालायला पुरुष मंडळी आणि स्त्री वर्ग स्वयंपाकाच्या मदतीला येत. घरचा जावई हा गावचा भावोजी होई. एकूणच गावातले वातावरण हे मोकळे ढाकळे होते. बोला म्हणून सांगायची गरजच नव्हती. आकाशात स्वच्छंदपणे विहरणाऱ्या  पाखरांचा मनमोकळेपणा होता.

पण, शहरात मात्र हा मोकळेपणा मिळत नाही. शहरात आलं की टू बीएचके मध्ये बंदिस्त करून घ्यायचे. फ्लॅटचे दार नेहमीच बंद. कोणी यायचं नाही की कोणाकडे जायचं नाही. धीर करून कोणाकडे गेलंच तरी फ्लॅटचा मालक किंवा मालकीण सेफ्टी डोअरच्या लहानशा खिडकीतून, "काय हवंय?" हे अशा स्वरात विचारतात की जाणाऱ्याला कशाला आपण आलो असे वाटावे. बाहेर कुठे भेटलातच तर हाय, हॅलो आणि लिफ्टमध्ये भेटलात तर ओठ जरासे वाकडे करायचे या पलीकडे काही नाही. अगदीच गरज पडली तर इंटरकॉम किंवा व्हॉट्सअप. प्रत्यक्ष संवाद नाही, एकत्र येणं नाही की ख्याली, खुशाली विचारणं नाही. मला एका गोष्टीच कोडं अजून उलगडलेलं नाही. या फ्लॅट्स मध्ये राहणारी माणसं ही काही इंग्लंड, अमेरिकेसारख्या परक्या देशातून आलेली नसतात. आजूबाजूच्या गावातूनच आलेली असतात. गावाचं मोकळेपण यांच्यात भिनलेलं असतं. मग फ्लॅटमध्ये येताच वागण्या- बोलण्यात असा अचानक बदल कसा होतो? गावातलं मोकळेपण जाऊन असा एकलकोंडेपणा का येतो? मनाला एवढी कुंपणं का घातली जातात? मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असे म्हणतात, पण फ्लॅटमध्ये तर तो व्यक्तिगत पातळीपर्यंत संकुचित होतो.

हे बदलायला हवं. एकमेकांकडे येणं जाणं व्हायला हवं. शेजारच्या घरी केलेल्या सांबाराची आणि आपल्या घरी केलेल्या मणगण्याची देवाणघेवाण व्हायला हवी. संध्याकाळच्या वेळी बेसमेंटमध्ये एकत्र जमून सुखदुःखे वाटून घ्यावीत. वर्षातून किमान एकदा 'गेट टू गेदर' व्हावे. बोलणं ही निसर्गाने माणसाला दिलेली फार मोठी देणगी आहे, पण ती न ओळखण्याचा करंटेपणा करणारा माणूस आता टिवटिव करायला लागला आहे. OMG, HBD, RIP यासारख्या दोनचार अक्षरातून तो आपल्या भावना व्यक्त करू लागला आहे. हे आता अतीच व्हायला लागले आहे. आजचा माणूस बिझी आहे याची कल्पना आहे, पण बिझीपणाच्या या स्वतःभोवती विणलेल्या कोषातून वेळीच बाहेर आलं नाही तर माणसातलं माणूसपण आतल्या अळीप्रमाणे गुदमरून जाईल. याला एकच मार्ग, "बोलते व्हा."  

(लेखक साहित्यिक आहेत.)