
साहेब आज श्रमपरिहार करून (क्वार्टर रिचवून) लवकर गाढ झोपले होते. इतक्यात उचकीताई व सुस्कारदादामध्ये कडाक्याचे भांडण
जुंपले. उचकी म्हणाली : मीच साहेबांची लाडकी.
सुस्कार - काहीतरीच काय? मीच लाडका.
उचकी - अरे मी आले तर साहेबांच्या सुखद आठवणी जागृत होतात.
सु.- मी तर साहेबांच्या संकट विमोचनाचा तारणहार आहे. संकटमुक्तीची पावती आहे.
उ.- ते कसं काय?
सु.- कितीही मोठे संकट आले तरी त्यातून ते मार्ग काढतात. त्यावरून मला सोडल्यावर, त्यांच्या जिवाला किती शांती मिळते, नाहीतर तू! चवचाल मेली. कुणीतरी कुठेतरी नुसती जांभई काढली तरी तू इथे ऊ: ऊ: क् करून नुसता थयथयाट घालतेस. साहेबांची पण कमाल आहे. आठवण कुणी काढली असेल? चंदा, मंदा, नीलू की शीलू? गेले आपले भूतकाळाच्या आठवणींच्या कोमात.
उ.- पण, त्या आठवणी किती आल्हाददायक असतात ते तुझ्यासारख्या रेड्याला काय कळणार? त्याला जात्याच रसिक असावे लागते.
साहेबांच्या कितीतरी मैत्रिणी! पण, एकीशीही भांडण नाही. त्याxनी आठवण काढली रे काढली, इकडे मला बरोबर सिग्नल मिळतो.
सु.- डोंबल! रसिक आमचे साहेब, तू कशाला फुक्याचे क्रेडिट घेतेस? तू बस आपली ऊ ऊ क् करीत. (तेव्हढ्यात तिथे उसासा आला.)
उसासा- "काय झालं? कशाला भांडता?"
सु.- अरे उसाशा, तू आणि कशाला धडपतोस इथे? तू ती मुकेशची गाणी ऐकत बस आणि डोळे पुसत बस बघू.
उ.- बिचारा. त्याच्यावर कशाला खेकसतोस? आधीच रडतराऊत आहे तो. ती जांभई कुठे दिसत नाही आजकाल.
सु.- ती आ वासून काॅम्प्युटरवर बिझी असते. बाई तोऱ्यात असते. साहेबांकडून लिफ्ट मिळाली ना तिला! सारखी सिरियल, सिनेमाच्या गोष्टी करीत असते. साॅलीड एॅटीट्यूड आला आहे तिला. कुणी विचारत नव्हतं तिला. आता बघ कशी भाव खाते!
उ.- मी चित्रपटात चांगलीच मुरलेली आहे.
सु.- काय सांगतेस?
उ.- मी हिरोईनबरोबरच असते, माझी कधी गरज लागेल सांगणं कठीणच! ते माझ्यावरचं फेमस गाणं "मला लागली कुणाची उचकी" कित्ती कित्ती नाचले लोक त्या गाण्यावर. राणी मुखर्जीनेतर मलाच घेऊन "हिचकी" या चित्रपटात काम केले. पण, तुम्हा कुणाला माझी किंमत कळलीच नाही.
सु.- मी पण डायलॉगबाजी करतो. दीवार पिक्चर आठवतो? ओरिजिनल माझा डायलॉग होता. अमिताभ विचारतो, "मेरे पास जांभई है मेरे पास उचकी है, मेरे पास ढेकर है, तुम्हारे पास क्या है?" त्यावर शांतपणे शशी कपूर उत्तरतो, "मेरे पास सुस्कारा है". पण लास्ट मोमेंटला कुणीतरी त्यात " मां " घुसवली. मी म्हटलंजाने दो, मां आखिर मां होती है नं! पिक्चरच्या शेवटी पण माझीच गरज असते.
उ.- ते कसं काय?
सु.- पिक्चरच्या शेवटी दे दणादण मारामारी असते. ती झाल्यावर पोलिस येतात. मग सगळे एकाचवेळी मला (सुस्कारा) सोडतात. हे सगळं तुला सांगून काही फायदा नाही. "तुम क्या जानो उचकू?एक सुस्कारेकी किंमत क्या होती है."
उ.- आहाहा, जन्मभर फुस्स फुस्स सुस्कारे सोडलेस, कभी ईष्क लडाया है? हाय, मी तरी या ठोंब्याबरोबर का टायम वेस्ट करू? शेवटी म्हणतात नं. "बंदर क्या जाने अद्रक का स्वाद?"
इतक्यात कोणी मोठ्यानं शिंकल्याचा आवाज आला. आं..क...शोअ्...उचकी जाम घाबरली व म्हणाली, "अरे सुस्काऱ्या, पळ लवकर, करोना आला वाटतं" आणि दोघांनी धूम ठोकली........ इतक्यात साहेब दचकून उठले व ओरडले, "करोना...करोना"
(लेखक साहित्यिक आहेत.)