.... आम्ही मात्र अडकलो

Story: सागर डवरी |
04th September 2020, 11:19 am
.... आम्ही मात्र अडकलो

गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण. बाप्पा घरी येणार म्हंटल्यावर होणारी लगबग उत्साह भरून टाकते. जसे गणपती घरी येतात तसे बाहेगावी असणारे चाकरमाने, विध्यार्थी आणि विशेष म्हणजे मघारण्या (माहेरवाशिणी) घरी येतात आणि गणपतीसोबत आठवणीत रंगून जातात. आसुसलेली मने मोकळी होतात. पाच- सहा दिवसाचा सण. परंतु वर्षभराची उभारी देऊन जातो. मन प्रसन्न करून जातो. 

यावर्षी मात्र हे सारं चित्रच पालटले. गणपती घरी पोहचले, परंतु आम्ही मात्र अडकलो. आम्ही घरी कधी जाणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. करोनाच्या महामारीने साऱ्या जगाला स्तब्ध करून ठेवलं. कुणाला कुठं जाता येईना की कुणाकडे बसता येईना, बोलावं काही म्हटलं तर त्यातही सोशल डिस्टंसिंग आलंच. सगळे जिथल्या तिथं अडकून पडले.

गणपती घरी आले की घर कसे मंदिर बनून जाते. रोजच्या रोज होणाऱ्या आरत्या किती आनंद देऊन जातात, ते कसे बरे सांगायचे. या मंदिरातले भक्त मात्र बाहेरगावी अडकले. सोहळ्याला मुकलेच जणू. त्यानिमित्ताने होणारी आप्तेष्टांची भेटही चुकली. आतापर्यंत कधी ही गणपतीवारी चुकली नाही, पण आज आमच्यासारखे गणपतीचे वारकरी कामाच्या ठिकाणी अडकले. एक मात्र चांगलं घडतंय, माणसाला माणूस कळतोय. माणसांच्या प्रवृत्ती कळतात, आपला कोण, परका कोण? सगळे अनुभवायचा हा कठीण काळ होता.

घरी जाणं शक्य नाही, परंतु घरचा गणपतीबाप्पा मोबाईलवरच पाहिला. ते एक बरं आहे, निदान त्या छोट्याशा खिडकीतून गणपती बाप्पा आणि घराचे तरी दिसतात. त्यांना मन भरून डोकावून तरी पाहता येते. तेवढंच काय ते क्षणिक समाधान! ना बाप्पाच्या आगमनाची तयारी करता आली ना आरास सजवता आली.

इथं आजूबाजूला बाप्पांची एक- एक मूर्ती मनाला भावते आणि आम्ही त्या प्रत्येक मुर्तीपुढे सर्वांची भेट व्हावी, हे महामारीचं भय संपून जावे हे मागणे मागत राहतो. लवकरच हे संपेल आणि प्रत्येकाला हवं तिथं जाता येईल, भेटता येईल, बोलता येईल, मनाच्या गुदमरलेल्या कोपऱ्यात श्र्वास भरता येतील आणि पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पाचा सोहळा मनोभावे अनुभवता येईल. गणपती बाप्पा मोरया.


(लेखक सहा. प्राध्यापक आहेत.)