विशेषांगींच्या समस्याः सकारात्मकता हवी

तयांना प्रेम अर्पावे

Story: प्रकाश कामत |
04th September 2020, 11:18 am
विशेषांगींच्या समस्याः सकारात्मकता हवी

-

विशेषांगींचे अनेक प्रश्न असतात.समाजामध्ये आणि सरकारमध्ये हवी तेवढी संवेदनशिलता नसल्याने हे प्रश्न व त्याच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी सातत्याने लाॅबिंग करावे लागते.

विशेषांगी क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, विशेष शाळा संचालक, विशेष शिक्षक हे आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. काही वेळा थोडे प्रयत्न यशस्वी होतात, काही हवे तेवढे यशस्वी होत नसतात. अशावेळी केलेल्या प्रयत्नांसाठी संबंधितांना दुवा देऊन त्यांची उमेद वाढवणे हेही महत्वाचे असते. त्यांच्यावर टिकेचा भडीमार करून त्यांना नाऊमेद करणे म्हणजे कुठे आपण हे करायला गोलो आणि तोंडघशी पडलो, असे त्यांना होता कामा नये. नेमका असाच काहीसा अनुभव श्रवणबाधीत विशेषांगींसाठी सरकारी समारंभ अॅसेसिबल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्थांना हल्लीच आला. असे होऊ नये म्हणून याची जाहीर दखल घेऊन हे लिहित आहे. 

केंद्र सरकारच्या दूरदर्शनवरील अथवा अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये श्रवणबाधित विशेषांगींसाठी सांकेतिक भाषा सुविधा असते. गोव्यात मी या सदरात पूर्वी अनेकवेळा लिहिल्याप्रमाणे, सांकेतिक भाषा प्रशिक्षित व प्रमाणपत्रधारक एक- दोन असतील. बाकीचे विशेष शाळा व सर्वसामान्य शाळांतील रिसोर्स सेंटरमध्ये शिकवणारे तुटपुंज्या प्रशिक्षणावर सांकेतिक शिक्षण देणारे कामचलावू शिक्षक. 

परंतु, आपल्या राज्यात सुमार तीन हजार श्रवणबाधित विशेषांगी असूनही त्यांच्यासाठी पूर्ण प्रशिक्षित सांकेतिक भाषा प्रशिक्षक नाहीत, सरकारी अथवा गोवा दूरदर्शनच्या कार्यक्रमात ही सेवा उपलब्ध असत नाही. मग सरकारी खात्यांमध्ये सांकेतिक भाषा दुभाषी मिळणे दूरच. तसेच त्यांच्या नोकऱ्यांसाठींच्या मुलाखतींमध्येही ही सेवा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर अन्याय होतच असतो. यासर्वांचा विचार करता आम्ही डिसेबिलिटी रायट्स असोसिएशनतर्फे (ड्रॅग) गोवा डॅफ असोसिएशनला बरोबर घेऊन या प्रश्नावर आवाज उठवायचे ठरवले. मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना पत्रे लिहून मुख्यमंत्र्यांचे दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांमधील संवाद, त्यांचे 15 आॅगस्टचे जाहीर भाषण, तसेच त्यांचा व राज्यपालांचा जनतेला पूर्वसंध्येचा संदेश सांकेतिक भाषा सुविधेसहीत व्हावे, असा आग्रह धरला. सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचजालक मेघना शेटगावकर यांनी हा विषय गंभीरपणे घेतला. त्यांच्या विनंतीवरून संजय विशेष शाळेचे अध्यक्ष गुरु पावसकर व सदस्य सचिव शेरू शिरोडकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळेची शिक्षिका या कामास उपलब्धही करून दिली. दूरदर्शन गोवा केंद्राचे कार्यक्रम प्रमुख उदय कामत यांनीही हा विषय गंभीरपणे घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत व तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या 15 आॅगस्टच्या संदेशांना सांकेतिक भाषेची जोड दिली. 

मुख्यमंत्र्यांचा शालांत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांकडील संवादाच्या वेळी गोव्यात पहिल्यांदाच हा सांकेतिक भाषा प्रयोग करण्यात आला. 

आपल्या देशात भाषिक, सांकेतिक विविधता खूपच मोठ्या प्रमाणावर असल्याने अमेरिकेसारखी प्रमाणीत अशी सांकेतिक भाषा अजून तयार झालेली नाही. त्यामुळे शिक्षक व इतर प्रशिक्षतांच्या कामात शिक्षणानंतरही फरक येतो, मर्यादा येतात. नेमके इथे तेच झाले. 

मुख्यमंत्र्यांना हा प्रकार नवीन, त्यात आॅनलाईन तांत्रिक जोडणी करणाऱ्यांनाही हे नवीन. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जलन बोलणे, त्याचबरोबर विचारलेल्या प्रश्नांसाठी सांकेतिक भाषा बॅकअप नसल्याने उत्तर समजून घेताना उडणारा गोंधळ अशा अनेक गोष्टी श्रवणबाधितांच्या बाबतीत घडल्या. परंतु, हे सर्व समजून घेऊन पुढे त्यात सुधारणा घडवून आणणे हे शहाणपणाचे वागणे असते. परंतु, काही अपरिपक्व विद्यार्थ्यांनी अतिउत्साहाच्या भरात फेसबूकवर धाव घेत या सगळ्यांचे खापर सांकेतिक भाषेसाठी आपला वेळ देणाऱ्या त्या शिक्षिकेवर फोडले आणि अत्यंत बेजबाबदार पोस्ट टाकून तिची निर्भर्त्सना केली.

आपल्या समाजातील विशेषांगी घटकांसाठी नव्या साधनसुविधा, त्यांना बलवान करणाऱ्या सेवा मिळविण्यासाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री ते खाली सगळे भागधारक यांना एक नवीन प्रयोग मार्गी लावला, यासाठी आपण शाबासकी द्यायला हवी. यापुढे सर्व सरकारी कार्यक्रमात व गोवा दूरदर्शनवर सांकेतिक भाषेला स्थान हवे, अशी आपली भूमिका हवी. त्या बिचाऱ्या शिक्षिकेवर वैयक्तिकपणे नकारात्मक दूषणबाजी व द्वेषमूलक टीका, तिही समाजमाध्यम पटलावरहे सर्वस्वी अयोग्य होय.

आपण जोपर्यंत असे प्रयोग करणार नाही, तोपर्यंत त्यातील अडचणी, कमतरता आपल्याला समजणार नाहीत. यासाठी थोडी सकारात्मकता, थोडा संयम व थोडी वैचारिक लवचिकता- बदल आमच्यापाशी हवा. तरच आपली पावले विशेषांगी क्षेत्रात पुढे पडतील.