Goan Varta News Ad

जांभई

Story: सुधीर तेलंग sudhirstelang@gmail.com |
04th September 2020, 11:15 Hrs
जांभई

आज मी 'जांभई' या गंभीर विषयावर लिहिणार आहे. तसा हा विषय सर्वश्रूत आहे. पण, कुणी त्यावर गांभीर्याने अभ्यास/ विचार केलेला नाही. जांभई म्हणजे सुस्ती हा एक गैरसमज. जांभई देणारा अत्यंत ज्ञानी असतो, हे किती जणांना माहीत आहे? समोरच्या माणसाने त्याला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला व त्याने भली मोठी जांभई दिली. याचा अर्थ त्याला ते ज्ञान उपजतच असतं. माणूस श्रीमंत     असला व त्याने एक प्रशस्त जांभई दिली, याचा अर्थ ती सुखा-समाधानाने दिली असा होतो व श्रीमंतीचा अंदाज येतो. या विषयाचा अभ्यासक्रम असता तर आज (बी. ए. विथ इकाॅनोमिक्स/ पोलिटिक्स) या धर्तीवर बी. ए. विथ जांभई, एम. ए विथ जांभई असे     पदवीधर झाले असते व आज "जांभई सल्लागार" वगैरेंची दुकाने थाटलेली बघायला मिळाली असती. तसेच कुणी मेडिकलला असताना सर्जरी घेतली असेल तर त्याला सर्जरी आली असं म्हणतात. पण, कुणी जांभई विषय घेऊन रिसर्च केलं तर त्याला आता जांभई आली असं म्हटलं तर टर उडविली जाईल. पण, स्कोप भरपूर आहे. उदा. नाक फेंदारुन, तोंड आ वासून जांभई दिलीच पाहिजे का? बंद तोंडाने का देऊ नये? 

जांभई देताना "परमेश्वरा, तू पाव" असे का आळविले जाते? तसा मी पण, लाॅकडाऊन काळामध्ये स्कंद पुराण, उपनिषद, वेद वगैरे सनातन साहित्यं चाळून पाहिली, पण जांभईचा कुठेही उल्लेख नाही! फुंकर, ढेकर, शिंक, झोप वगैरे विषयांवर कथा आढळतात. कुंभकर्णाने झोपण्याआधी साधी जांभई काढली असा कुठेही उल्लेख नाही. मी रामायण लिहित असतो तर "जांभई राक्षस" कथेत नक्की घुसवला असता. तसे बघितले तर जांभई हा शब्द उपहासाने घेतला जातो. भरपूर जेवणानंतर ढेकर देऊन एक दोन जांभया काढल्या तर ते जेवण छान झालं याचं सर्टीफिकेट असतं, पण नाही, खेकसून घ्यावंच लागतं, "जांभया कसल्या काढता, जा झोपा आता". 

जांभईची महती काय वर्णावी? समोरचा माणूस बोअर करीत असेल, तर त्याला घालवायला एकच उपाय. समोर दोन- तीन छान जांभया   काढल्या, की "अभी फुटो" हा संदेश दिला जातो. कधी कधी फ्रस्ट्रेशन आले, की जांभया येतात हे किती जणांना ठाऊक आहे? बराच वेळ टाॅयलेटमध्ये  बसून काही रिझल्ट आला नाही, की ज्या जांभया येतात त्याला फ्रस्ट्रेशन जांभई म्हणतात. तशा आनंदाच्या जांभया, दु:खाच्या जांभया वगैरे आहेत. एखाद्या गायकाला आलाप घेताना जांभया आल्या, तर बंदीशीचे व्हेरिएशन, फार‌ छान म्हणून टाळ्या वाजवतात. बरेचशे गायक गाताना तोंड वेडं, विचित्र करून गातात, ते याचसाठी. एक दोन खपून जातात. भीमसेनांना गाताना त्यांना मध्ये मध्ये जांभई येत असेल का? असे उगाचच वाटते.

बऱ्याच जणांना जांभई काढताना "छान छान "आवाज काढण्याची कला देवाने दिली आहे. मी लहान असताना एक भिम्याक्का म्हणून म्हातारी दिवसातून शंभर वेळा  "अ... आबा...ह्" अशा उद्गाराने जांभई काढायची. मग मी तिची नक्कल करायचो. सुनील शेट्टीचे डायलॉग फुल्ल जांभयांचे असायचे. बघा पैसे कमवून गेला की नाही पठ्ठया. असे बरेचसे किस्से सांगण्यासारखे आहेत, पण मलाच  जांभई येईल म्हणून हे पुराण आवरतो. तरीसुद्धा माझे सर्वांना आवाहन आहे, की हा विषय संशोधनासाठी समाविष्ट करा व जांभई बहाद्दरांची संख्या वाढवा. स्कोप बराच  आहे. "जांभई - नाटक, सिनेमा, टिव्ही सिरियल वगैरे! हा लेख  वाचून खूप जांभया येतील, नाही आल्या तर कळवा.

(लेखक साहित्यिक आहेत.)