महानायक x अँग्री यंग मॅन सामना रंगला माध्यमांमध्ये

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तींना काही वेळा विपरित प्रसंगांचा, प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. काही वेळा त्यांचाही संयम संपतो आणि ते कडक प्रतिक्रिया देऊन बसतात.

Story: अग्रलेख |
31st July 2020, 09:45 pm
महानायक x अँग्री यंग मॅन  सामना रंगला माध्यमांमध्ये

देशाच्या करमणूक क्षेत्रातील सर्वांत प्रसिद्ध घराणे म्हणून अ​मिताभ बच्चन यांच्या कुटुंबाचे नाव घ्यावे लागेल. देशातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांत भारतीय आणि परदेशी नागरिकही या महानायकाचे चाहते आहेत. केवळ चित्रपटांतील हिरो म्हणून अमिताभ बच्चन प्रसिद्ध नाहीत. गेल्या चार ते पाच दशकांत अभिनयाबरोरच इतर अनेक क्षेत्रांत त्यांच्याबद्दल आदर वाटावा अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. म्हणून एक वेळ अमिताभ यांचे चित्रपट बघितलेले नसतील, एक वेळ त्यांची रुपेरी पडद्यावरील भूमिका आवडलेली नसेल, तरी काही ना काही कारणांमुळे अमिताभबद्दल कौतुक किंवा आदर वाटावा असा त्यांचा आजवरचा जीवनप्रवास राहिला आहे. सध्या कोविडची बाधा झाल्यामुळे मुंबईतील इस्पितळात उपचार घेत असलेले अमिताभ बच्चन वेगळ्याच कारणावरून प्रसिद्धी माध्यमांतून चर्चेचा विषय ठरले आहेत.
आताच्या जमान्यात समाजमाध्यमांतून बहुतांश बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद साधता येतो. कोट्यवधी चाहते या सुविधेचा लाभ उठवतात, परंतु काही महाभाग या आनंदतरंगात विष कालवण्याचे काम करतात. ‘कोविडच्या संसर्गाने आपण मराल अशी अपेक्षा आहे,’ असा अतिशय आक्षेपार्ह संदेश अमिताभ यांच्या एका कथित चाहत्याने आपले नाव उघड न करता त्यांना पाठवला. या संदेशाने महानायकामधील अँग्री यंग मॅन चवताळून उठला. ‘माझा द्वेष करणाऱ्या अज्ञात माणसा, संदेशात तुझे नाव नाही, बहुधा तुला तुझ्या वडिलांचे नाव ठाऊक नसेल म्हणून तू अज्ञात राहिला असशील,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘जगभरात माझे नऊ कोटींहून अधिक चाहते असून त्यांना तुझा संताप आला आहे. बरा झाल्यानंतर मी त्यांना सांगेन की, ठोक दो साले को!’ अशा शब्दांत ‘बिग बी’ने आपला राग व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीच्या काळात चित्रपटांत देमार भूमिका साकारल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची प्रतिमा एक सुसंस्कृत, कुटुंबवत्सल, इतरांचा आदर करणारी व्यक्ती अशी आहे. जाहीर कार्यक्रमांत किंवा कौन बनेगा करोडपती या टीव्ही कार्यक्रमात बोलताना तोलून मापून शब्द वापरण्यात ते प्रसिद्ध आहेत. कोणाचाही अवमान आपल्याकडून हाेऊ नये याची ते आटोकाट काळ​जी घेताना दिसतात. आपल्या वडिलांच्या- हरिवंशराय यांच्या अर्थपूर्ण कविता वरचेवर सादर करताना आई-वडिलांचा आदराने उल्लेख करतात. सर्व थरांतून आदर कमावलेल्या या महानायकाने आपला संयम सोडून अशी भडक सिनेमा स्टाईल प्रतिक्रिया कशी काय दिली, असे आश्चर्य त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना वाटले. त्याचबरोबर हीन चवीचा संदेश पाठविणाऱ्याला त्यांनी रोखठोक उत्तर दिले ते योग्यच केले, अशीही सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटली.
अभिषेक यांच्यावरही रोख
अमिताभ यांच्याबरोबर त्यांचा पुत्र अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनाही कोविडमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. ‘वडील इस्पितळात दाखल असल्यामुळे आता तुझे पोट कसे भरणार,’ अशा शब्दांत एका महाभागाने अभिषेक यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. संयत प्रतिक्रिया देण्यात प्रसिद्ध असलेल्या अभिषेक यांनी, ‘सध्या तरी आम्ही दोघेही इस्पितळात एकमेकांच्या खाटेवर पडून खात आहोत. तुमच्यावर ही वेळ येऊ नये अशी प्रार्थना करतो,’ असे नेमके उत्तर दिले. एकमेकांना सांभाळून घेऊन घरात सौहार्दाने एकत्रित कसे राहावे याचा आदर्श म्हणजे बच्चन कुटुंबीय आहे. त्यांच्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांतून अनेकदा वेगवेगळे प्रवाद निर्माण करण्यात आले असले तरी गैरसमजाला थारा न देता अमिताभ-जया आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्याबद्दलचा आदर कायम राखला आहे.
सेलिब्रिटींना अशा चित्रविचित्र प्रतिक्रियांतून जावे लागतेच. देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठे घराणे म्हणता येईल अशा गांधी कुटुंबातील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दलही समाजमाध्यमांतून बरीच गरळ ओकली जात असते. वैयक्तिक, राजकीय, व्यावसायिक किंवा कोणत्याही स्वरुपाचे मतभेद असले तरी सार्वजनिक जीवनात हीन स्तरावर उतरून एखाद्याची हेटाळणी करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जात नाही. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तींना काही वेळा विपरित प्रसंगांचा, प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा सेलिब्रिटी लोक या प्रतिकूलतेतून स्वत:ला सावरून घेतात, वेळ निभावून नेतात. काही वेळा त्यांचाही संयम संपतो आणि ते कडक प्रतिक्रिया देऊन बसतात. त्यातून समाजमाध्यमांवर नवीन वाद उभे राहतात आणि अवास्तव प्रसिद्धी मिळविण्याचे काही जणांचे डावपेच यशस्वी होतात.