
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका संघाने भारतावर ७६ धावांनी मात करत सुपर-८ फेरीत सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का दिला. या पराभवामुळे भारताचे केवळ दोन गुणांचे नुकसान झाले नाही, तर भारताच्या नेट रनरेटलाही मोठा फटका बसला आहे. आता उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघासमोर ‘करो या मरो’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारताने सुरुवातीला उत्कृष्ट गोलंदाजी करत सामन्यावर पकड बसवली. क्विंटन डी कॉक, एडन मारक्रम आणि रायन रिकल्टन यांना अवघ्या २० धावांत माघारी पाठवत भारताने पॉवरप्लेमध्ये वर्चस्व गाजवले. पाच षटकांत ३ बाद २० अशी अवस्था झाल्याने सामना भारताच्या बाजूने झुकला आहे, असे चित्र होते. मात्र त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस या दोघांनी संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मिलाफ साधत भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. मधल्या षटकांत भारताकडून नियंत्रण सुटले आणि क्षेत्ररक्षणातही चुका झाल्या. या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने १८५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. सुरुवातीच्या यशानंतर भारताने सामन्यातील गती गमावली, हेच या डावाचे टर्निंग पॉईंट ठरले. १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांकडून अपेक्षित शिस्त दिसली नाही. पॉवरप्लेमध्येच तीन गडी बाद झाल्याने संघावर दबाव वाढला. आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने पहिल्या तीन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर या सामन्यात १५ धावा केल्या. त्यानंतर सातत्याने आक्रमक फटके खेळण्याच्या प्रयत्नात विकेट्स गमावण्याची साखळी थांबली नाही. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतो, भारतीय फलंदाजांचा अति आक्रमकपणा संघाला घातक ठरत आहे का? टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमकता आवश्यक असली, तरी परिस्थितीनुरूप खेळण्याच्या शहाणपणाची गरज असते. अहमदाबादच्या खेळपट्टीवर चेंडू थोडा थांबून येत असताना संयमाची आवश्यकता होती; मात्र भारताने सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागली.
या मोठ्या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट वजामध्ये गेला आहे. सुपर-८ फेरीत अजून दोन सामने बाकी असताना भारताला आता दोन्ही सामने जिंकणे अपरिहार्य झाले आहे. २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आणि १ मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचे सामने होणार आहेत. मात्र केवळ विजय पुरेसा ठरणार नाही. भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवत रनरेट सुधारावा लागेल. अहमदाबादमधील हा पराभव निश्चितच धक्कादायक आहे; पण स्पर्धा अजून संपलेली नाही. दोन सामने जिंकून आणि रनरेट सुधारून भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी संघाने अति आक्रमकतेऐवजी संतुलित, शिस्तबद्ध आणि परिस्थितीजन्य क्रिकेट खेळणे गरजेचे आहे.
- प्रवीण साठे