वाढत्या शहरांना हवे आहे हिरवे छत्र

भारतभरातून व्यावसायिक समुदायाला झाडांच्या संवर्धनाकरिता एकत्र आणणे ही प्रगती आहे. अजून बरेच काम बाकी आहे. आर्बोरिकल्चरच्या मुख्य प्रवाहासोबत शहरी नियोजनाला न जोडले जाणे आपले नुकसान करणारे आहे.

Story: विचारचक्र |
5 hours ago
वाढत्या शहरांना हवे आहे हिरवे छत्र

भारत अभूतपूर्व वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करतो आहे. २०४७ पर्यंत आपल्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे वास्तव्य शहरांमध्ये असेल. मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली ही शहरे केवळ वाढत नाहीत, तर त्यांचा झपाट्याने कायापालट होत आहे. रस्ते रुंद होत आहेत, उड्डाणपूल उभे राहत आहेत, मेट्रोच्या बोगद्यांसाठी जमिनीखाली खोदकाम सुरू आहे. या प्रत्येक कामाकरिता आपण एक मोठी किंमत मोजत असतो. ती प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात कधीच दिसत नाही.
वृक्ष संवर्धनाचा आग्रह धरणाऱ्यांचे म्हणणे भारतातील नियोजक, अभियंते, महापालिका अधिकारी आणि धोरणकर्त्यांनी स्पष्टपणे ऐकण्याची वेळ कधीच उलटून गेली आहे. झाडे विकासाच्या विरोधात नाहीत. झाडांचे योग्य व्यवस्थापन केल्यास ती विकासाभिमुख आहेत.
मी आर्बोरिस्ट आहे असे सांगितले की, अनेकदा समोरचा प्रतिसादादाखल विनम्रपणे मान डोलवतो आणि मी एखाद्या रोपवाटिकेत काम करतो असा समज करून घेतो. विकेंडला कुंपण छाटतो, असा समज करून घेतो. प्रत्यक्षात हे काम त्यापेक्षा कितीतरी अधिक तांत्रिक आणि कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे.
आर्बोरिकल्चर म्हणजे शहरी वातावरणातील वैयक्तिक झाडांचे व्यवस्थापन करण्याचे शास्त्र आणि कला. यात संरचनात्मक धोक्याचे मूल्यांकन, पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वृक्ष-प्रभाव मूल्यांकन, मुळांच्या क्षेत्राचे व्यवस्थापन, बांधकामाच्या काळात झाडाचे छत्र जपणे, झाडांच्या आरोग्याचे निदान आणि झाड तोडणे व टिकवून ठेवणे याच्याशी संबंधित कायदेशीर व पर्यावरणीय चौकट यांचा समावेश होतो.
एक प्रौढ झाड कार्बन शोषून घेते. बाष्पोत्सर्जनाने सभोवतालचे तापमान दोन ते चार अंशांनी कमी करते. पावसाचे पाणी जमिनीत मुरवते. हवेची गुणवत्ता सुधारते, ध्वनिप्रदूषण कमी करते, जैवविविधता टिकवते आणि मानसिक स्वास्थ्य, मालमत्तेचे मूल्य आणि सामुदायिक एकात्मता यांवर सकारात्मक परिणाम घडवते.मुंबई आर्बोरिकल्चरची आव्हाने सर्वात तीव्र स्वरूपात मांडते. हे शहर असाधारण नैसर्गिक वारसा असलेले आहे. जुने वटवृक्ष जे संपूर्ण चौकांवर छत्र धरतात, किनारपट्टीचे रक्षण करणारी खारफुटीची जंगले, पिढ्यानपिढ्या शहराचे प्रदूषण आणि वेदना शांतपणे सहन करणारी झाडे आणि त्याचवेळी अखंड पायाभूत सुविधांच्या दबावाखाली असलेले हे शहर आहे. गेल्या दशकात एकट्या मुंबईत मेट्रो, किनारी रस्ता आणि महामार्ग प्रकल्पांसाठी हजारो झाडे तोडण्यात आली किंवा कायमची बाधित झाली. यातील काही तोडणे अपरिहार्य होते. पण अनेक झाडे वाचवता आली असती. झाड वाचवणे आणि झाड तोडणे हा बऱ्याचदा नियोजनाच्या टप्प्यातील निर्णय असतो. प्रशिक्षित आर्बोरिस्ट त्या निर्णय प्रक्रियेच्या बैठकीत होता का?
गर्दीच्या रस्त्यांवर मुळांवर दबाव, चुकीच्या पद्धतीने छाटणी आणि बांधकामामुळे झालेले नुकसान यामुळे झाडे धोकादायक बनतात. कमकुवत झालेले झाड डोळ्यांना वर्षानुवर्षे हिरवेगार आणि निरोगी दिसू शकते. पण एक दिवस अचानक कोसळते. प्रमाणित आर्बोरिस्टकडून झाडाचे जोखीम मूल्यांकन करून घेणे हे खर्चिक नाही. ती सार्वजनिक सुरक्षा आहे.
२०२१ मध्ये माझी संस्था ट्रीकोटेक एलएलपी आणि यूकेमधील बॅरेल ट्री कन्सल्टन्सीचे जेरेमी बॅरेल यांच्यासह चेन्नई येथील एका शाळेच्या बांधकाम स्थळावर १०० वर्षे जुना वटवृक्ष जतन करण्याचे काम मला मिळाले. हा वटवृक्ष बांधकाम क्षेत्राच्या थेट आतमध्ये होता. विकासकाची पहिली प्रतिक्रिया होती की, झाड तोडा. त्याऐवजी आम्ही सविस्तर वृक्ष मूल्यांकन केले. मुळांचे आराखडे नोंदवले, संरचनात्मक स्थिती तपासली, बांधकामाचे परिणाम मांडले. तो वटवृक्ष आजही उभा आहे, जिवंत आहे, त्या शाळेच्या अंगणात. त्याखाली शिकणाऱ्या मुलांना माहीतही नाही की, तो जवळजवळ संपण्याच्या उंबरठ्यावर होता. माझ्यासाठी यशस्वी आर्बोरिकल्चर असेच आहे.
दुसऱ्या टोकाला, ट्रीकोटेकने मुंबईजवळ डेटा सेंटर उभारू पाहणाऱ्या एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी ९०० हून अधिक झाडांचे वृक्ष-प्रभाव मूल्यांकन अलीकडेच पूर्ण केले. सविस्तर स्थिती सर्वेक्षण, सरकारी परवानग्यांसाठी कायदेशीर मदत हे या कामाचे स्वरूप होते.
व्यावसायिक आर्बोरिकल्चर महागडा अव्यापारेषु व्यापार नाही. एक झाड कोसळण्याच्या घटनेतून होणारी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, दिवाणी खटले आणि कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते. जोखीम कमी करण्यापलीकडे, रस्त्यावरील झाडे व्यावसायिक मालमत्तेचे मूल्य पाच ते पंधरा टक्क्यांनी वाढवतात. हरित मार्गिका शहरातील उष्मा कमी करतात. इमारतींचा थंडाव्यासाठी लागणारा ऊर्जा खर्च घटतो.
भारताला हे शास्त्र नव्याने शोधण्याची गरज नाही. यूके, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि युरोपमध्ये प्रगत आर्बोरिकल्चर अस्तित्वात आहे. आपण त्यांच्या अनुभवातून शिकू शकतो, त्यांच्या पद्धती अंमलात आणू शकतो. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या सहकार्याने मुंबईत दुसरी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय आर्बोरिकल्चर परिषद २०२६ आयोजित करत आहे. ६ मार्च २०२६ रोजी पूर्व-परिषद कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये बांधकामात झाडे कशी टिकवायची यावरील कार्यशाळा होणार आहे. IES कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यशाळेत जेरेमी बॅरेल, व्यवस्थापकीय संचालक, बॅरेल ट्री कन्सल्टन्सी, यूके हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. दुसरी कार्यशाळा महाराष्ट्र निसर्ग उद्यान, धारावी, मुंबई येथे होणार असून त्यामध्ये मार्गदर्शक डॉ. प्राची गुप्ता, अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरू या आहेत. ७-८ मार्च २०२६ दरम्यान मुख्य आंतरराष्ट्रीय परिषद सहारा स्टार हॉटेल, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होत आहे.
मुख्य परिषदेच्या दोन दिवसांत मुंबई ग्रीनवेचे सहसंस्थापक वास्तुविशारद अलन अब्राहम आणि अभिनेत्री व संयुक्त राष्ट्र पर्यावरण सदिच्छादूत दिया मिर्झा यांची मुख्य भाषणे होतील. अमेरिकेतील आर्बर डे फाऊंडेशनचे सीईओ डॅन लॅम्बे, आर्बोरिकल्चर ऑस्ट्रेलियाचे कार्ल डाला रिवा, टेनेसी विद्यापीठाच्या डॉ. शेरॉन जीन-फिलिपे, ग्रीहिलचे सीईओ गॅबोर गोर्ट्झ आणि डॉ. संग्राम चव्हाण, डॉ. स्मिता हेगडे, डॉ. विजय मोरस आणि आर्किटेक्ट शिल्पा गवाणे यांसारखे देशी, विदेशी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
जेव्हा मी आर्बोरिकल्चरमध्ये करिअर सुरू केले, तेव्हा हा शब्द बहुतेक भारतीयांना अपरिचित होता. एका दशकात मी या विषयाबाबतची जागरूकता शून्यातून येथपर्यंत वाढताना पाहिली आहे. या विषयावर मुंबईत एक आंतरराष्ट्रीय परिषद होत असून पाच खंडांतून वक्ते हजर राहत आहेत. भारतभरातून व्यावसायिक समुदायाला झाडांच्या संवर्धनाकरिता एकत्र आणणे ही प्रगती आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. अजून बरेच काम बाकी आहे. आर्बोरिकल्चरच्या मुख्य प्रवाहासोबत शहरी नियोजनाला न जोडले जाणे आपले नुकसान करणारे आहे.

- वैभव राजे
(लेखक अमेनिटी ट्री केअर असोसिएशनचे संचालक आहेत.)