गलगोटिया विद्यापीठाने देशाची मोठी हानी केली आहे. त्यामुळे सरकारनेही या विद्यापीठावर कारवाई करायला हवी. कारण अति लाडामुळे बिघडलेले लोक शेवटी सरकारचेच नाक कापतात, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे.

नवी दिल्लीत सध्या ‘भारत मंडपम’ येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एरवी एवढे चर्चेत नसलेले हे प्रदर्शन यावेळी भलत्याच गोष्टीमुळे जगभर कुप्रसिद्ध झाले आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या एका ‘तारांकित’ विद्यापीठाच्या महिला प्राध्यापिकेने एआयपेक्षाही गतीने आणि धडधडीत खोटे बोलून या परिषदेच्या हेतूलाच हरताळ फासला. या एका चुकीमुळे ही एआय समिट सध्या कमालीची चर्चेत आहे. महिला प्राध्यापिकेचा उतावीळपणा, त्यानंतर वेगाने तयार झालेले त्या प्राध्यापिकेचे रिल्स, मिम्स आणि त्यानंतर आयोजक, केंद्र सरकार, विद्यापीठ यांचे खुलासे यांनीच गेले दोन दिवस सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांची जागा व्यापली आहे. ज्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी केंद्र सरकार नव्या संशोधनाला दरवाजे खुले करण्यासाठी प्रयत्न करते, त्याच परिषदेत एका विद्यापीठाला दारच बंद केले गेले. त्या विद्यापीठाच्या प्रतिनिधीने घातलेल्या गोंधळामुळे ही नामुष्की आली. विद्यापीठाला आपला स्टॉल काढण्याची वेळ आली. जे विद्यापीठ काँग्रेसच्या विरोधातील मोर्चात आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून राजकीय पोळी भाजून घ्यायचे, त्या बहुचर्चित ‘तारांकित’ विद्यापीठात आपण शिक्षण घेतो असे सांगायलाही आज तिथले विद्यार्थी कचरतात, एवढी मोठी नामुष्की विद्यापीठावर आली आहे.
विशेष म्हणजे, या परिषदेसाठी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी म्हणून अनेक नेत्यांचे भारतात आगमन झाले आहे. याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या अनेक जागतिक नेत्यांबरोबर बैठकाही घेतील. वेगवेगळ्या देशांतून अनेक उद्योजक, वैज्ञानिक, एआय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेला गोंधळ देशाचीही पत घालवणारा ठरला आहे.
ग्रेटर नोयडातील गलगोटिया विद्यापीठाने या समिटमध्ये सहभाग घेतला होता. तिथे त्यांनी चीनमधून मागवलेला एक रोबो-डॉग प्रदर्शित केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना विद्यापीठाच्या एका महिला प्राध्यापिकेने हा रोबो-डॉग स्वतःच्या विद्यापीठाने विकसित केल्याचा दावा केला आणि तिथूनच गोंधळ सुरू झाला. मुळात हे विद्यापीठ संकल्पना तयार करू शकते, पण अशा प्रकारे पक्के यंत्र तयार करायचे झाले तर त्यांच्याकडे ती साधनसुविधा नसेल. त्यामुळे विद्यापीठाने एक कुठला प्रकल्प तयार केला, तर ते समजून घेता येईल. पण एका कंपनीत तयार होऊन आलेला, तेही चीनच्या कंपनीतून तयार होऊन आलेला रोबो-डॉग आपण विकसित केला म्हणायचे म्हणजे त्यासाठी मोठे काळीज लागेल. चीनसारख्या देशाकडे जिथे भारताचे सीमावादावरून तंटे आहेत, अशा देशाचे एक उत्पादन ‘मेड इन इंडिया’ करून या गलगोटिया विद्यापीठाच्या बेजबाबदार महिला प्राध्यापिकेने देशाचीच अब्रू काढली. त्यानंतर तिचे खुलासेही आले. म्हणजे तिचे म्हणणे आहे की, ‘आपण ते चुकून बोललो. तुमचे सहा हे आपले नऊ असू शकतात,’ असा बोभाटाही तिने केला. त्या महिलेला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची एवढी हौस की, हा प्रकार समोर आल्यापासून तिने कितीतरी स्क्रीनटाईम मिळवला. आपण केवढी मोठी चूक करून देशाची किती बदनामी केली, याचे तिला काहीच सोयरसुतक नाही. हे प्रकरण असे जगभर पसरले की भारतविरोधी काही सापडते, याची वाट पाहत बसलेल्यांना घरी बसल्या खाद्य मिळाले. त्यामुळे एआयमध्ये काहीतरी करू पाहणाऱ्या आणि एआयमध्ये नवी संशोधने करणाऱ्यांसाठी असलेल्या एआय समिटमध्येच हा गैरप्रकार घडल्यामुळे अनेक भारतीय संशोधक, तज्ज्ञांनाही या गोष्टीमुळे खजील केले आहे. या परिषदेत देश-विदेशातील नेते, तज्ज्ञ आल्यामुळे त्याच वेळी झालेल्या या गोंधळाने देशाची बरीच हानी केली आहे. एक खरे की, हे विद्यापीठ गेल्या काही वर्षांमध्ये उत्साहाच्या भरात बऱ्याच आक्षेपार्ह गोष्टी करायचे. सरकारकडूनही अशा ‘तारांकित’ खासगी विद्यापीठांचे लाड केले जातात. लाखो, कोटींचे शुल्क घेऊन माणूस तयार करण्यापेक्षा कारकून तयार करण्याचे काम ही विद्यापीठे करतात. प्रसंग पाहून सत्तेत असलेल्यांच्या बाजूने वारा येईल तशी पाठ फिरवणाऱ्या अशा विद्यापीठांना यापुढे कुठेही बोलावताना सरकारलाही विचार करावा लागेल. अन्यथा विनाकरण देशाचे धिंडवडे काढण्याचे काम अशा विद्यापीठांकडून होत राहील. गलगोटिया विद्यापीठाने देशाची मोठी हानी केली आहे. त्यामुळे सरकारनेही या विद्यापीठावर कारवाई करायला हवी. कारण अति लाडामुळे बिघडलेले लोक शेवटी सरकारचेच नाक कापतात, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे.