छत्रपती शिवाजी आणि त्यानंतर संभाजी महाराज तसेच अन्य मराठा राजकर्त्यांचे लक्ष गोव्यावर असल्याकारणानेच पोर्तुगीजांना आपली सत्ता प्रारंभीच्या दीडशे वर्षांत केवळ तिसवाडी, सासष्टी (मुरगावसह) आणि बार्देशपुरती मर्यादित ठेवणे भाग पाडले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा गोव्यात आणि त्याच्यापल्याड भिडल्या होत्या. जेव्हा महाराजांनी कोकणातील मोहीम आखली होती, त्यावेळी त्यांनी आदिलशाही प्रदेशावर हल्ले करून डिचोली, साखळी हे प्रांत पुन्हा काबीज केले. यावेळी कुडाळचे लखम सावंत, पेडणेचे केशव नाईक देसाई, डिचोलीचे रवळू शेणवी देसाई, साखळीचे चंदा राणे देसाई यांनी आदिलशाहीशी संगनमत करून महाराजांना विरोध केला. हे चौघेही विजापूरच्या आदिलशहाचे मांडलिक होते. पोर्तुगीजांची खुशामत करून ते आपली नाममात्र छोटी राज्ये सांभाळून होते. आदिलशाहीचा पराभव होताच ते पोर्तुगीजांच्या आश्रयास गेले आणि पानेली, कोलवा व कांदोळी गावात राहू लागले.
पोर्तुगीजांचे समुद्रावर वर्चस्व होते. हिंदुस्थानाच्या पश्चिम किनारपट्टीजवळील सागरात फिरणाऱ्या जहाजांकडून पोर्तुगीजांना कर भरून फिरण्याचा परवाना घ्यावा लागत असे. महाराजांनाही हा कर भरावा लागत होता. गोव्यात हिंदूंचा जो छळ होत होता, त्याला तर मर्यादा नव्हती. महाराजांनी १९ डिसेंबर १६६७ च्या रात्री सात हजार सैन्यासह बार्देश आणि सासष्टी प्रांतात प्रवेश करून हल्ला चढवला. मराठा सैन्याने सर्वत्र लुटालूट व जाळपोळही केली. तेराशे लोकांना कैद केले. लखम सावंत आणि इतर तिसवाडीत पोर्तुगीजांच्या बालेकिल्ल्यात जाऊन राहिली. मराठा सैन्य बार्देश व सासष्टी प्रांतात विखुरले होते. त्यापैकी मूठभर मराठा सैनिकांशी विजरई कोंदी द सा व्हिसेंत याची झुंज झाली व त्यात त्याने यश मिळवले. त्यावेळी महाराज डिचोलीत होते. पोर्तुगीजांच्यावतीने महाराजांकडे तहाची विनवणी डिचोलीचे रामजी शेणवी कोठारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली होती. त्यावेळी झालेल्या तहानुसार महाराजांनी पकडून नेलेल्या युद्ध कैद्यांची मुक्तता केली. युद्धखंडणी म्हणून दीड कोटी रुपये वसूल करून घेऊन आणि लखम देसाई व इतर मंडळी आपल्या राज्यास त्रास देणार नाही, असे पोर्तुगीजांकडून लेखी आश्वासन मिळविले. १६६८ साली २६ डिसेंबरला गिफार्ड आणि चेंबरलेन यांनी कारवारहून लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी लहान लहान विभाग करून व वेगवेगळी निमित्ते शोधून जुन्या गोव्यात, म्हणजे त्या काळच्या पोर्तुगीजांच्या राजधानीत चार-पाचशे लोक सोडून दिल्याची माहिती आहे, असे लिहिले होते. सप्तकोटीश्वराचे मंदिर बांधण्यासाठी सामान हवे हे त्यापैकी एक महत्त्वाचे निमित्त होते. हळूहळू ही संख्या दुप्पट झाल्यानंतर एके रात्री एकदम उठाव करून व गोवा बेटात जाण्याची एखादी पाऊलवाट ताब्यात घेऊन, पोर्तुगीजांनी पुरेसे सैन्य लढण्यास उभे करण्यापूर्वीच, शिवाजी महाराजांचे लोक त्या बेटात शिरून व त्यांनी गोवे हस्तगत केले असते यात शंका नाही, असे डॉ. पिसुर्लेकरांनी 'पोर्तुगीज - मराठे संबंध' या ग्रंथात लिहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी वेंगुर्ल्यात होते व तेथून गोवा मोहिमेचे सर्व नियोजन चालू होते. पोर्तुगीज विजरईला संशय आला. त्याने अनेक माणसे पकडली. महाराजांचा वकील त्यावेळी गोव्यात होता. त्याला बोलावून आणून स्वतः विजरईने त्यांना अपमानित केले. त्यामुळे महाराजांनी बेत बदलला. परंतु ते गोव्यात आले ते गोवा मोहिमेची प्रतिष्ठापना करण्यासाठी व त्यासाठी श्री सप्तकोटीश्वराची आधी पुनर्स्थापना केली. दिवाडी येथे श्री सप्तकोटीश्वराचे ऐतिहासिक मंदिर होते. परंतु पोर्तुगीजांनी देवळाचा विध्वंस केल्याने श्री सप्तकोटीश्वराच्या भक्तांनी व महाराजांनी देवाची मूर्ती नदीपलीकडे नार्वेला आणली. तेथे छोटे मंदिर उभारून तीत मूर्तीची स्थापना केली.
१३ नोव्हेंबर १६६८ रोजी श्री सप्तकोटीश्वराचे मंदिर बांधण्यास प्रारंभ केला. याचा संस्कृत शिलालेखच आज त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. तह करूनही पोर्तुगीज देसाईना महाराजांविरुद्ध चिथावणी देऊ लागले. तेव्हा पुन्हा युद्धाचा प्रसंग येताच त्यांनी १६६८ साली देसाईना आपल्या राज्याबाहेर घालवून दिले व ते मग महाराजांना शरण गेले.
त्यानंतर महाराजांचे व पोर्तुगीजांचे संबंध बिघडले. १६७२ मध्ये महाराजांनी पेडणे, साखळी व डिचोली या तिन्ही प्रांतांवरील आपला ताबा मजबूत केला. एप्रिल १६७५ मध्ये त्यांनी फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. दोन हजार घोडदळ व सात हजार पायदळ या वेढ्याच्या कामात गुंतले होते. मागच्या वेळी फोंड्याच्या किल्लेदाराला पोर्तुगीजांनी सहाय्य केले होते. तसा प्रकार पुन्हा घडू नये, म्हणून महाराजांनी पोर्तुगीजांच्या सासष्टी प्रांतातील चांदर, वेर्णे, कुंकळ्ळी येथे सैन्य पाठवून लुटालूट करविली आणि पोर्तुगीजांत धास्ती निर्माण केली. त्यामुळेच पोर्तुगीज फोंड्याच्या किल्लेदारास मदत करायला धजले नाहीत. ८ मे १६७५ रोजी फोंड्याचा किल्ला महाराजांनी सर केला.
या यशामुळे फोंडा किल्ल्याच्या अंमलाखालील सर्व प्रदेशावर म्हणजे अंत्रूज, अष्टागार, हेमाडबार्से, चंद्रवाडी, काकोडे, बाळ्ळी, सांगे व काणकोण या प्रदेशांवर महाराजांची सत्ता प्रस्थापित केली. हे प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाले. बार्देश, तिसवाडी व सासष्टी हे तिन्ही महाल पोर्तुगीजांकडे होते. फोंडा घेताच त्यांनी कारवारची मोहीम काढली व शिवेश्वर, कडवाड, कंद्रे, अंकोला ही ठाणी हस्तगत करून गंगावळी नदीपर्यंतचा आदिलशाहीत असलेला मुलुख त्यांनी स्वराज्यात आणला.
सासष्टी महालाजवळ बेतुल येथे साळ नदीच्या तीरावर एक जलदुर्ग बांधला. हाच 'काबो द रामा'चा किल्ला किंवा खोलगड. अरबी सागरालगत असलेला हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने विशेष महत्वाचा होता. या दुर्गाच्या बांधकामात व्यत्यय आणायचा व तो मोडून टाकण्याचा सल्ला सल्लागार मंडळाने वायसरॉयला दिला होता. पण वायसरॉयला ते धाडस झाले नाही. कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करताना बखरीत खोलगडाचा उल्लेख केलेला आहे. कारवार जिल्ह्यात महाराजांनी कुर्मगडाचा किल्ला बांधला.
प्रबळ आरमार उभारल्याशिवाय पोर्तुगीजांना आळा घालणे अशक्य, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बलवान आरमार समुद्रात उभे करून त्यांचा कोंडमारा करण्याची योजना आखली होती. पोर्तुगीजांची ही सत्ता पूर्णपणे नष्ट करण्याचा महाराजांचा इरादा होता. परंतु दुर्दैवाने ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचे आकस्मिक निधन झाल्याने ही योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही. पोर्तुगीजांची जुलुमी राजसत्ता यानंतर गोमंतक भूमीत हळूहळू प्रबळ होत गेली.
छत्रपती शिवाजी आणि त्यानंतर संभाजी महाराज तसेच अन्य मराठा राजकर्त्यांचे लक्ष गोव्यावर असल्याकारणानेच पोर्तुगीजांना आपली सत्ता प्रारंभीच्या दीडशे वर्षांत केवळ तिसवाडी, सासष्टी (मुरगावसह) आणि बार्देशपुरती मर्यादित ठेवणे भाग पाडले होते. अन्यथा आजच्या गोव्यातल्या नव्या काबिजादीतील प्रदेशाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला असता आणि गोव्यातील भारतीयत्व टिकणे प्रतिकूल झाले असते.

प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५