तुझे स्वरूप प्रत्ययाला येणे अघटित

मनाच्या वेगाला मागे सारून त्याच्या पुढे कुणाला कसे जाता येईल? आकाशाला हाताची वीत घालून कधी वायूचे मोजमाप करणे शक्य आहे का? बाहूंमध्ये कितीही अमर्याद शक्ती जरी आली तरी त्याने काय मायेची नदी तरून जाता येणे शक्य आहे का?

Story: विचारचक्र |
15th February, 09:24 pm
तुझे स्वरूप प्रत्ययाला येणे अघटित

श्री कृष्ण करीत असलेल्या प्रदीर्घ विवेचनाचा अर्थ लक्षात यायला लागल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला त्याला होत असणारी जाणीव सांगत आहे.

अरे कृष्णा, देवर्षी नारद किंवा महर्षी असित देवल अशा दुसऱ्यांचे तुला मी काय सांगतोय, आमचे स्वतःचे भगवान व्यासदेव सुद्धा स्वतः आमच्या मंदिरात येऊन निरंतर तुझे वर्णन करायचे. पण अंधारात चिंतामणी बघूनही न ओळखल्याने मूर्खपणे तो दूर सारावा तसे त्यावेळी माझे झाले! आणि सूर्योदय झाल्यावर तो चिंतामणी आहे हे कळावे त्याप्रमाणे तुझा विवेचन-रूपी सूर्य उगवल्यावर आता हे कळत आहे की देवर्षी-महर्षींच्या ज्ञानरूप-रत्नांच्या त्या अमोल खाणींची तुझ्या वचन-सूर्याअभावी माझ्याकडून उपेक्षा झाली.

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।

न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवा: ।।१४।।

सरळ अर्थ : आणि हे केशवा, जे काही मला आपण सांगता आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन् आपल्या लीलामय स्वरूपाला दानव जाणत नाहीत आणि देवही जाणत नाहीत.

विस्तृत विवेचन : आता तुझी वाक्ये हेच माझ्यासाठी माझ्या अंत:करणात फाकणारे सूर्यकिरण आहेत. त्यांच्या योगे त्या महर्षींनी मागे जे जे मार्ग सांगितले होते, ते ते सर्व आता मला आकलून आले. त्यांचे ते ज्ञान-बीज-बोल माझ्या हृदयाच्या भूमीत खोल जाऊन पडले आहेत. तुझ्या कृपेची ओल लाभताच त्या संवादांमधे सफलता आलेली आहे! नारदादि संतांची नद्यांसारखी घोंघावत येणारी जी वचने आहेत, त्यांच्यासाठी आज मी खऱ्या अर्थाने संवाद-सुखाचा सागर झालेलो आहे! आजपर्यंत जन्मजन्मांतरी मी जे काही सर्वोत्तम सुकृत केलेले असेल ते बहुधा फळाला येऊन त्यायोगे तू मला आज सद्गुरू म्हणून प्राप्त झाला आहेस. वाडवडिलांच्या तोंडून रोज तुझे गुणगान कानावर पडत असे खरे, पण एक तुझी कृपा नसल्याने त्या तुझ्या स्वरूपाला मी ओळखले नाही. दैव सानुकूल असले तर केलेले प्रयत्न सफल होतात. तसे आपण श्रवण-पठण-मनन आदी जी काही साधना करतो, तिचा प्रत्यय जेव्हा केव्हा गुरुकृपा होईल तेव्हाच घेता येतो. नित्य जिवापाड श्रम करून माळ्याने झाड कितीही जरी वाढवले, तरी ते झाड वसंत ऋतू आल्यावरच फळे धरते आणि फळांच्या भाराने वाकते. विषम-ज्वर झाला असता अन्न गोड नाही. पण औषधाने त्या ज्वराला उतार पडला की मग जे गोड असते ते गोड लागायला लागते! जे औषध घेतले आहे ते, शरीर आरोग्याने (तंदुरुस्तीने) परिपूर्ण झाल्यानंतरच, चांगले आहे असे म्हणता येते. शरीरात इंद्रिये वाचा आणि प्राण असतात. पण चैतन्य जर नसेल तर त्यांचा काहीही उपयोग नाही. पण जेव्हा चैतन्य आपण होऊन शरीरात संचारते तेव्हाच त्या इंद्रिय-वाचा-प्राणाला अर्थ प्राप्त होतो. तसेच तप-साधना करून जे योगादि वेदशास्त्र अभ्यासले आहे, ते सद्गुरूंनी कृपा केल्यावरच आत्मसात होऊन आपलेसे होते.

अशा प्रकारे श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष स्वरूप प्रत्ययास आल्यानंतर अर्जुन आनंदातिशयानं भरून गेला. त्याला स्वानुभवाची गुंगी चढली आणि त्या गुंगीच्या (सकारात्मक) माजाने ते स्वरूप त्याच्या अंगी नाचायला लागले! तेव्हा तो म्हणाला की देवा तू जे जे मला बोललास ते ते अगदी सगळे मला अनुभवाला आले आहे! हे मोक्ष-स्वामी, दानवांच्या व देवांच्याही बुद्धीला तुझ्या स्वरूपाचे आकलन होणे शक्य नाही, हे आता मला इथे नि:संदेह कळून आले आहे. कारण समर्थ सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय आपल्याला स्व-बुद्धीच्या बळावर आपल्याआपणच खरे ज्ञान प्राप्त झाले असे जर कोणी म्हणत असेल तर ते त्याचे अज्ञानच होय, याची आजच्या प्रत्ययाच्या खुणेने जाणीव झाली.

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।

भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ।।१५।।

सरळ अर्थ : हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या भूतांच्या ईश्वरा, हे देवांच्या देवा, हे जगत्स्वामी पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात.

विस्तृत विवेचन : देवा, जसा आकाशाचा विस्तार आकाशालाच ठाऊक असतो अथवा पृथ्वीचा भार पृथ्वीच जाणते, तसा तुला स्वतःला तुझा तूच सर्व सामर्थ्याने ओळखतोस. एरवी वेदादि इतर सर्व तथाकथित ज्ञाननिधी ज्ञानाचा वृथा गर्व वाहतात. मला सांग, मनाच्या वेगाला मागे सारून त्याच्या पुढे कुणाला कसे जाता येईल? आकाशाला हाताची वीत घालून कधी वायूचे मोजमाप करणे शक्य आहे का? बाहूंमध्ये कितीही अमर्याद शक्ती जरी आली तरी त्याने काय मायेची नदी तरून जाता येणे शक्य आहे का? तसे तुझे ज्ञान होणे किंवा तुझे स्वरूप प्रत्ययाला येणे हे अघटित आहे आणि म्हणून तू नेमका काय आहेस, कसा आहेस, ते कुणालाही ठाऊक नाही. आपल्या स्वतःला आपणच  जाणून घ्यायला व दुसऱ्याला ती खूण सांगायला तुझा तूच समर्थ आहेस, हे आता मला चांगलंच उमजले आहे. म्हणून तुला एक विनवणी करतो.

माझ्या याबाबतीत काही इच्छा आहेत. त्या कधी, कोण, कशा कुठे पूर्ण करू शकेल व तसे करू शकेल तरी की नाही हे मला माहीत नव्हते. म्हणून त्या काळजीने माझ्या त्या इच्छांच्या कपाळावर घाम आला आहे. आता तो घाम तेवढा तू पूस. या त्रिभुवनाच्या उत्पत्तीच्या यक्षप्रश्नाचा जो अक्राळविक्राळ हत्ती आहे, त्याला हरवणारा सिंह तूच एक आहेस. तुझे एकट्याचेच असे स्वरूप आहे जे देवदेवतांसाठीही पूजनीय आहे. जगाची उत्पत्ती करणारा तू जगन्नाथ आहेस. आता मी काय म्हणतोय तिकडे जरा लक्ष दे. तुझी थोरवी एवढी आहे की तुझ्याजवळ उभे राहण्याची सुद्धा माझी लायकी नाही. याचा मला खेद वाटतो. पण म्हणून तुला भिऊन विनवणीच नाही केली तर तुझी मला पूर्ण ओळख कशी पटणार? चहूबाजूला जरी पाण्याने भरलेले समुद्र असले तरी चातक पक्ष्यासाठी ते कोरडेच! कारण मेघातून गळणारे पावसाचे थेंबच त्याची तहान भागवू शकतात. तसे गुरु-तत्त्व जरी सगळीकडे भरलेले असले तरी आमच्यासाठी खरी गती म्हणजे कृष्णा तूच आहेस.


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३