एका बैठकीने बऱ्याच गोष्टी सुटसुटीत होण्याची शक्यता आहे. अशा बैठका वारंवार झाल्या आणि त्रुटी भरून काढण्यासाठी पावले उचलली, तरच गोव्याच्या आरोग्य क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार गंभीर आहे असे म्हणता येईल.

गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठे बदल गरजेचे आहेत. २०१२ पासून गोव्यात भाजप सत्तेवर आहे. दरवर्षी शेकडो कोटी रुपये आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ठेवले जातात, पण आजही गोव्यात गंभीर आजारांवरील उपचारांची व्यवस्था नाही. गोमेकॉसारख्या मोठ्या इस्पितळात रुग्णांची गैरसोय होते. तिथे रुग्णांचा भार इतका असतो की तिथली यंत्रणा तोकडी पडते. जिल्हा इस्पितळे, तालुक्यांतील आरोग्य केंद्रे शोभेच्या वास्तू झाल्या आहेत. तिथे आलेले रुग्ण बांबोळीलाच पाठवले जातात. ‘गोवन वार्ता’ने बुधवारच्या अंकात शिक्षकांना 'आरोग्य कवच' या अग्रलेखात गोव्यातील आरोग्य क्षेत्रातील त्रुटींबाबत लिहिले होते. योगायोगाने त्याच दिवशी आरोग्य क्षेत्रातील आवश्यकता पडताळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, मंत्री मॉविन गुदिन्हो, मंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव, आरोग्य सचिव आणि सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अशी बैठक दर महिन्याला होण्याची गरज आहे. पण बऱ्याच काळानंतर अशी बैठक झाली, ज्यात गोव्यातील सरकारी इस्पितळांपासून ते रुग्णवाहिकांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. गोव्यात गंभीर आजारांवरील उपचाराच्या सुविधा वाढविण्याचा महत्त्वाचा मुद्दा या बैठकीत चर्चेला आला. इतकी वर्षे राज्यात सत्ता असताना आता भाजप सरकारला गोव्यातील आरोग्य क्षेत्रातील त्रुटींबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला. हा वेळ काढल्याबद्दल सरकारचे अभिनंदन व्हायला हवे. किमान अशा बैठका दर महिन्याला होतील आणि गोव्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी आशा करूया.
बुधवारच्या बैठकीत गोव्यातील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका एकत्र करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव होता. अनेक सरकारी इस्पितळांतील रुग्णवाहिका अत्यंत जुन्या झाल्या आहेत. जुन्या झालेल्या रुग्णवाहिका भंगारात काढून, नव्या रुग्णवाहिका खरेदी करण्यासही सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. विशेष म्हणजे, सरकारी इस्पितळांशी संलग्न असलेल्या आणि सरकारच्या ताब्यातील रुग्णवाहिका १०८ सेवेशी जोडण्याचा सरकारने विचार चालवला आहे. गोव्यात रुग्णवाहिकांचे जाळे मजबूत करण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. पण हे करताना सर्व इस्पितळांना सुसज्ज रुग्णवाहिका द्याव्यात आणि त्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही अशा रोज येणाऱ्या तक्रारी बंद होतील. अपघात किंवा तातडीच्या वेळी रुग्णांना प्राथमिक उपचार मिळतील, अशा सुसज्ज रुग्णवाहिका सरकारने ताफ्यात आणायला हव्यात. दक्षिण गोवा इस्पितळ, फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळ, काणकोण, केपे, मुरगावमधील इस्पितळांमध्ये कर्मचारी आणि सुविधांची कमतरता आहे. ही गोष्ट आजची नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यातील अनेक सरकारी इस्पितळांमध्ये कर्मचारी उपलब्ध नाहीत आणि सरकारला आता जाग आली आहे. जाग आली असली तर इतक्या लवकर कर्मचारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. मिळालेच तर कंत्राटी कर्मचारी भरले जाऊ शकतात. डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहेच, पण तालुक्यांतील महत्त्वाच्या इस्पितळांत किमान उपजिल्हा आणि जिल्हा इस्पितळांमध्ये सर्व दर्जेदार सुविधा असतील, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. मोठ्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी सरकारी इस्पितळांमध्ये सुविधा नाहीत. गोव्यातील अनेक रुग्णांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैदराबादला जावे लागते. असे असेल तर गोव्यात आरोग्य क्षेत्रात फार सुधारणा झाल्या, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सरकारने तसे दावेही करू नयेत.
बुधवारच्या बैठकीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सर्व सरकारी इस्पितळांमध्ये भेटी देऊन व पाहणी करून ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्याचा तपशील तयार करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या अधिकाऱ्याने सरकारी आरोग्य केंद्रांना, उपजिल्हा, जिल्हा आणि अन्य सरकारी इस्पितळांना भेट देऊन तिथली पाहणी करायची आहे. तिथे काय हवे, त्याचा तपशील करून त्याची पूर्तता व्हावी यासाठी सरकारला प्रस्ताव द्यायचा आहे. अधिकाऱ्याने अहवाल सादर केल्यानंतर सरकार त्यावर विचार करणार आहे. इतकेच नव्हे तर गोव्यातील आरोग्य क्षेत्रात कशाची कमतरता आहे, त्याचा एकूणच अहवाल तयार करण्यासाठीही मुंबईतील एका सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते सल्लागार गोव्यातील आरोग्य क्षेत्रात कुठल्या सुविधांची कमतरता आहे आणि कुठल्या गोष्टी तातडीने करायच्या आहेत, त्याचा अहवाल देतील. एका बैठकीने बऱ्याच गोष्टी सुटसुटीत होण्याची शक्यता आहे. अशा बैठका वारंवार झाल्या आणि त्रुटी भरून काढण्यासाठी पावले उचलली, तरच गोव्याच्या आरोग्य क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार गंभीर आहे असे म्हणता येईल.