
देशात सर्वच भागांत विकासकामांना गती देण्यात आली आहे. मात्र विकासकामे करताना अनेक ठिकाणी सुरक्षात्मक उपायांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवावर बेतण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना मागील आठवड्यात दिल्लीत घडली, ज्यात २५ वर्षाच्या तरुणाला जीव गमवावा लागला. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. हेच पाऊल आधी उचलले असते, तर एकाचा जीव वाचला असता. ‘बैल गेला नि झोपा केला’, अशी वृत्ती काय कामाची?
दिल्लीतील जनकपुरी येथे ५ फेब्रुवारीच्या रात्री एका बँकेत काम करणारा अधिकारी २५ वर्षीय कमल ध्यानी हा काम संपवून मोटारसायकलने घरी येत होता. दिल्ली जल बोर्डाच्या बांधकाम स्थळावर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीसह कोसळून त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका महिलेने पोलिसांना फोन करून एक बाईकस्वार सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात पडल्याचे आणि त्याला तत्काळ मदतीची गरज असल्याचे सांगितले. सुमारे ८ वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना एक व्यक्ती मोटरसायकलसह सुमारे २० फूट लांब, १३ फूट रुंद आणि सुमारे १४ फूट खोल खड्ड्यात पडल्याचे दिसून आले. जखमी व्यक्तीला अग्निशमन दलाच्या मदतीने खड्ड्यातून बाहेर काढले आणि दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. त्यानंतर ही बातमी सर्वदूर पोहोचली.
या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दिल्ली जल बोर्डाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी कोणतेही चेतावणी चिन्ह, बॅरिकेड किंवा प्रकाश व्यवस्था नव्हती. रक्षकही तैनात नव्हता. खड्डा सुरक्षा उपायांशिवाय उघडा ठेवला होता. सार्वजनिक रस्त्यावर खड्डा उघडा सोडल्यास कोणीही व्यक्ती पडून तिचा जीव जाऊ शकतो, हे दिल्ली जल बोर्ड आणि ठेकेदाराला माहीत होते. त्यामुळे जनकपुरी पोलिसांनी बोर्ड आणि ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उप-कंत्राटदार राजेश प्रजापतीला अटकही केली आहे. सरकारने दिल्ली जल बोर्डच्या तीन अभियंत्यांना निलंबित केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरील सुरक्षा रक्षकाने त्याच रात्री एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला एक व्यक्ती खड्ड्यात पडली असल्याचे सांगितले होते. त्या कर्मचाऱ्याने रात्री १२.२२ वाजता उप कंत्राटदार राजेश प्रजापती याला फोन करून तातडीने घटनास्थळी बोलावले होते. प्रजापती घटनास्थळी पोहोचला. त्याने खड्ड्यात मोटारसायकल पडलेली पाहिली. परंतु पुढे काहीच कारवाई केली नाही.
एकाचा हकनाक बळी गेल्यानंतर जागे झालेल्या दिल्ली सरकारने जल अभियंत्यांना बांधकाम स्थळांना भेट देऊन त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारला उशिरा सुचलेल्या शहाणपणाबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
- प्रदीप जोशी