पणजी महानगरपालिका निवडणूक; सोमवारपासून आचारसंहिता शक्य

१४ मार्च मतदान : १६ मार्च रोजी मतमोजणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी महानगरपालिका निवडणूक; सोमवारपासून आचारसंहिता शक्य

पणजी : पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची (Panaji Municipal Corporation elections) प्रतीक्षा अखेर संपली आहे. महानगरपालिकेसाठी येत्या १४ मार्च रोजी मतदान होणार असून, १६ मार्च रोजी मतमोजणीचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाईल आणि त्याच दिवसापासून शहरात निवडणूक आचारसंहिता लागू होईल.

महानगरपालिकेच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांचे राजकीय गणित बिघडले आहे. विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात, माजी महापौर उदय मडकईकर, संतोष सुर्लीकर आणि नीलेश मोरजकर यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या दिग्गज नेत्यांना आता आपली जागा सोडून दुसऱ्या प्रभागातून नशीब आजमावावे लागणार आहे. अनेकवेळा निवडून आलेले माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा प्रभागही आरक्षित झाला आहे. ते उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आरक्षणामुळे बऱ्याच प्रभागांमध्ये नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाबूश मोन्सेरात यांनी सर्व ३० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला असला तरी, उत्पल पर्रीकर यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

बाबूश विरुद्ध उत्पल थेट लढत
या निवडणुकीत आमदार बाबूश मोन्सेरात यांचे पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. पणजी भाजपमध्ये बाबूश मोन्सेरात यांचे मोठे वर्चस्व आहे. पक्षाने महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असून, ते निवडतील त्या उमेदवारांना पक्ष पाठिंबा देणार आहे. माजी नगरसेवक मिनीन डिक्रुझ आणि दत्तप्रसाद नाईक यांचा पाठिंबा असलेल्या उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तारखा जाहीर होताच ते आपल्या पॅनलाची घोषणा करणार आहेत.
३० पैकी १५ प्रभाग आरक्षित
* महानगरपालिकेच्या एकूण ३० प्रभागांपैकी ५० टक्के जागांवर आरक्षण लागू करण्यात आले आहे.
* सर्वसाधारण प्रभाग (१५ जागा) : ४, ५, ७, ९, १०, ११, १२, १३, १७, १८, २०, २४, २६, २८ आणि ३०.
* आरक्षित जागा : ओबीसी (५), ओबीसी महिला (३), महिला (६) आणि एसटी महिला (१) असे आरक्षणाचे स्वरूप आहे.