पणजी : राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा, वैद्यकीय उपकरणांची स्थिती आणि एकूणच आरोग्य यंत्रणेतील त्रुटी शोधण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. या त्रुटींचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाय सुचवण्यासाठी मुंबईतील एका नामांकित सल्लागार कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय, आर्थिक विभागाचे सहसचिव वेळोवेळी रुग्णालयांना भेटी देऊन आपला स्वतंत्र अहवाल सरकारला सादर करणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आरोग्य सेवा आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, क्रीडा मंत्री रमेश तवडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यासह विविध खात्यांचे सचिव आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने दक्षिण गोव्यातील आरोग्य यंत्रणेवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मडगावचे दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, फोंडा उपजिल्हा रुग्णालय, चिखली, काणकोण, सांगे आणि कुडचडे येथील रुग्णालयांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित भागातील मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघातील रुग्णालयांच्या समस्या मांडल्या. चिखली रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, रुग्णांच्या तुलनेत डॉक्टर तसेच परिचारिकांच्या संख्येत वाढ झालेली नाही. येथे उपकरणांची देखील कमतरता आहे, ही बाब वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी बैठकीत मांडली.
दरम्यान, आर्थिक विभागाचे सहसचिव प्रणव भट्ट हे राज्यातील सर्व रुग्णालयांना नियमित भेटी देतील आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा अहवाल सरकारला देतील. मुंबईची सल्लागार कंपनी प्रत्येक रुग्णालयात जाऊन सेवा आणि उपकरणांची पाहणी करेल आणि आपला सविस्तर अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे सरकार आरोग्य क्षेत्रात मोठे बदल आणि सुधारणा करणार आहे.
राज्यातील रुग्णालयांची सद्यस्थिती
१. राज्यात सर्वच रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांची (नर्सेस) मोठी कमतरता आहे.
२. येथील इस्पितळात एक्स-रे मशीन आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय यंत्रांची गरज आहे. तसेच अनेक जुनी मशिनरी बदलण्याची आवश्यकता आहे.
३. फार्मसीमध्ये रुग्णांना आवश्यक ती सर्व औषधे वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
४. रुग्णांना डॉक्टरांच्या भेटीसाठी किंवा उपचारांसाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागते, याचाही अभ्यास सल्लागार कंपनी करणार आहे.
‘गोमेकॉ’वरील ताण कमी करण्याचा प्रयत्न
- गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) रुग्णालयावर सध्या उपचारांसाठी मोठा ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
- दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात तातडीने कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, सल्लागार आणि परिचारिकांची नेमणूक केली जाईल.
- सांगेतील रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लवकरच उद्घाटन केले जाईल. यामुळे सांगे भागातील रुग्णांना मडगावला जाण्याची गरज उरणार नाही.
- वाढत्या अपघातांची संख्या पाहता, जखमींवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी प्रत्येक रुग्णालयाच्या कॅज्युल्टी विभागात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी मंत्र्यांनी केली आहे.


