नोबेल विजेत्या मोहम्मदींवर कठोर कारवाई

Story: विश्वरंग - इराण |
13th February, 09:14 pm
नोबेल विजेत्या मोहम्मदींवर कठोर कारवाई

मानवाधिकार कार्यकर्ता आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना इराणच्या न्यायालयाने नुकतीच ७.५ वर्षांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राष्ट्रीय सुरक्षेविरोधात कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या नव्या शिक्षेमुळे त्यांचा एकूण तुरुंगवास आणखी वाढणार असून, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

इराणमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ता आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना अद्याप तुरुंगातून सुटका मिळणार नाही. इराणच्या एका न्यायालयाने त्यांना सहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली असून, त्यासोबतच दोन वर्षांचे निर्वासन आणि देशाबाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नरगिस मोहम्मदी यांच्या वकील मुस्तफा नीली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नरगिस मोहम्मदी यांच्यावर ‘संघटन तयार करून राष्ट्रविरोधी कट रचणे’ या आरोपांखाली सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, सरकारविरोधी प्रचारात्मक कारवायांप्रकरणी त्यांना अतिरिक्त दीड वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. इराण कायद्यानुसार, या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानुसार, नरगिस मोहम्मदी यांना इराणच्या दक्षिण खोरासान प्रांतातील खोस्फ या दुर्गम शहरात दोन वर्षांसाठी निर्वासित करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्यावर देश सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय अंतिम नसून, त्याविरोधात अपील करता येऊ शकते, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. ५३ वर्षीय नरगिस मोहम्मदी यांनी गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ, नरगिस मोहम्मदी यांनी आपला बहुतांश वेळ तुरुंगातच घालवला आहे. त्यांची मुले २०१५ पासून त्यांना भेटू शकलेली नाहीत. ही मुले सध्या पॅरिस येथे वास्तव्यास आहेत. कुटुंबापासून दूर, कठोर तुरुंगवास असूनही, त्यांनी आपला संघर्ष कधीच थांबवलेला नाही.

नरगिस मोहम्मदी यांच्या या निर्भीड आणि सातत्यपूर्ण संघर्षाची दखल घेत, त्यांना २०२३ साली नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. मात्र, त्यावेळी त्या तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या मुलांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान, नरगिस मोहम्मदी यांना सुनावण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार तज्ज्ञ, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्यूमन राइट्स वॉच यांसारख्या संघटनांनी हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांवर थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे. युरोपियन देशांनीही इराणच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त करत नरगिस मोहम्मदी यांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.

- सुदेश दळवी