रिबेलो मसुद्याची घटनात्मक कसोटी

जमीन संरक्षणाचा प्रश्न हा केवळ मालमत्तेचा नाही, तर ओळख टिकवण्याचा प्रश्न बनला आहे. रिबेलो मसुद्याचा गाभा असा आहे की विकास थांबवायचा नाही, पण तो स्थानिकांना विस्थापित करून होऊ नये. त्यामुळे मसुदा पूर्ण बंदीऐवजी नियमन सुचवतो.

Story: संपादकीय |
15th February, 09:27 pm
रिबेलो मसुद्याची घटनात्मक कसोटी

गोवा हा भौगोलिकदृष्ट्या लहान, पण सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध प्रदेश आहे. समुद्रकिनारे, पर्यटन आणि जागतिक आकर्षण यामुळे गेल्या दोन दशकांत गोव्याचे रूप झपाट्याने बदलले. परंतु या बदलामागे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोवा विकसित होत आहे की स्थानिकांच्या हातातून निसटत आहे, यावर सतत विचारमंथन होत असते. याच पार्श्वभूमीवर माजी न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी सुचवलेला गोमंतकीयांसाठी जमीन संरक्षणाचा मसुदा केवळ धोरणात्मक प्रस्ताव नाही; तो गोव्याच्या सामाजिक अस्तित्वाशी जोडलेला घटनात्मक प्रयोग आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यात जमिनींचे दर प्रचंड वाढले. पर्यटन, दुसरी घरे, निवृत्तीधारकांचे स्थलांतर आणि मोठ्या गुंतवणुकींमुळे स्थानिक नागरिकांसाठी घर खरेदी करणे कठीण झाले. अनेक गावांमध्ये पारंपरिक वस्ती कमी होत असून बाहेरील लोकांची मालकी वाढताना दिसते. हा बदल फक्त आर्थिक नाही; तो लोकसंख्यात्मक आणि सांस्कृतिक स्थित्यंतर घडवणारा आहे. भाषा, परंपरा, शेतीपद्धती आणि सामाजिक रचना यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे जमीन संरक्षणाचा प्रश्न हा केवळ मालमत्तेचा नाही, तर ओळख टिकवण्याचा प्रश्न बनला आहे. रिबेलो मसुद्याचा गाभा असा आहे की विकास थांबवायचा नाही, पण तो स्थानिकांना विस्थापित करून होऊ नये. त्यामुळे मसुदा पूर्ण बंदीऐवजी नियमन सुचवतो. गोमंतकीयांना प्राधान्याने हक्क प्रदान करणे, संवेदनशील क्षेत्रांमध्ये खरेदीवर निर्बंध घालणे, जमीन व्यवहारांची पारदर्शक तपासणी करणे तसेच पर्यावरण आणि पारंपरिक वस्तीचे संरक्षण करणे असे मुद्दे त्यात आहेत. हा दृष्टिकोन भावनिक घोषणेपेक्षा कायदेशीर संतुलन साधण्याचा प्रयत्न दर्शवतो.भारतीय राज्यघटना सर्व नागरिकांना समानतेचा हक्क देते, त्यामुळे एखाद्या राज्याने बाहेरील नागरिकांवर निर्बंध घालणे सहज शक्य नाही. परंतु, न्यायव्यवस्थेने काही विशेष परिस्थितींमध्ये संरक्षणात्मक उपाय मान्य केले आहेत. विशेषतः भौगोलिक, आदिवासी किंवा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशांसाठी ते उपयुक्त ठरतात. यामुळे गोव्यासाठीही कायदेशीर मार्ग पूर्णपणे बंद नाहीत; मात्र कायदा तर्कसंगत, प्रमाणबद्ध आणि सार्वजनिक हितावर आधारित असावा, हीच एक अट आहे. भावनिक भाषेत लिहिलेला कायदा न्यायालयात टिकत नाही; पुराव्यांवर उभा असलेला कायदा टिकतो. 

गोमंतकीय कोण? हा या संपूर्ण चर्चेतील सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न आहे. जर व्याख्या खूप व्यापक नसेल तर भेदभावाचा आरोप होईल. मात्र व्यापक असेल तर संरक्षणाचा उद्देशच अपयशी ठरेल. कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित मार्ग म्हणजे वस्तुनिष्ठ निकष. दीर्घकालीन वास्तव असावे, नोंदीचे दस्तावेज असावेत, कर, मतदार नोंदणी किंवा सातत्यपूर्ण अधिवास असावा. अशा पुराव्यांवर आधारित व्याख्या न्यायालयात अधिक टिकाऊ ठरते. भारतामध्ये मालमत्ता हा मूलभूत हक्क नसला तरी तो कायदेशीर संरक्षण असलेला अधिकार आहे. त्यामुळे जमीन व्यवहारांवर निर्बंध घालताना राज्याने सिद्ध करावे लागते की निर्बंध आवश्यक असून ते बेकायदा नाहीत. सार्वजनिक हिताशी त्यांचा थेट संबंध आहे. रिबेलो यांच्या मसुद्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्ण बंदीऐवजी नियंत्रित परवानगी प्रणाली सुचवतो. हा मध्यम मार्ग न्यायालयीन परीक्षणात अधिक टिकण्याची शक्यता वाढवतो. कोणत्याही नव्या तरतुदीला पर्यावरणीय आणि सांस्कृतिक आधार असावा लागतो. गोव्याचा प्रश्न फक्त लोकसंख्येचा नाही; तो पर्यावरणीय संतुलनाचा आहे. किनारी भाग, शेती क्षेत्रे आणि पारंपरिक गावे अनियंत्रित बांधकामांमुळे धोक्यात येत आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागेल. जर जमीन संरक्षण कायदा पर्यावरणीय संवर्धनाशी जोडला गेला, तर त्याला अधिक मजबूत घटनात्मक आधार मिळू शकतो. कारण न्यायालये विकास आणि पर्यावरण यांच्यातील संतुलनाला विशेष महत्त्व देतात.

असा कायदा लागू झाल्यास त्याला आव्हान दिले जाऊ शकते. यात समानतेचे उल्लंघन, गुंतवणूक स्वातंत्र्यावर मर्यादा, आर्थिक परिणाम अशा मुद्यांवर युक्तिवाद केला जाऊ शकतो. हा कायदा खरोखर संरक्षणासाठी आहे की राजकीय लोकप्रियतेसाठी यावर न्यायालय निर्णय घेईल. जर सरकारकडे ठोस आकडेवारी, पर्यावरणीय अहवाल आणि लोकसंख्यात्मक बदलांचे पुरावे असतील, तर कायदा टिकू शकतो. अन्यथा तो बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मसुदा केवळ गोव्यासाठी महत्त्वाचा नाही; तो भारतातील इतर लहान राज्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो. विकास आणि स्थानिक हक्क यांच्यातील संघर्ष अनेक प्रदेशात दिसतो. त्यामुळे गोव्याचा प्रयोग यशस्वी झाला, तर स्थानिक संरक्षणाच्या नव्या कायदेशीर मॉडेलची सुरुवात होऊ शकते.