महापालिकेसाठी रस्सीखेच

उत्पल पर्रीकर यांचा भाजपसोबत सुरू असलेला संघर्ष त्यांना कोणती शिकवण देतो आणि यातून ते प्रगल्भ होऊन पुढे येतात का, ते वेळ सांगेल. पण भाजपसारख्या बलाढ्य पक्षाने मात्र बाबूशच्या मदतीने पणजी, ताळगाव, सांताक्रुझमध्ये आपला झेंडा फडकवत ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

Story: संपादकीय |
16th February, 10:27 pm
महापालिकेसाठी रस्सीखेच

पणजी महापालिकेच्या निवडणुकीची तारीख शेवटी जाहीर झाली. ६ मार्चपासून गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू होईल, जे २६ मार्चपर्यंत चालेल. त्याच दरम्यान ११ मार्च रोजी पणजी महापालिकेची निवडणूक होईल. १४ मार्चला निवडणूक घ्यावी असा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने तयार केला होता, पण अखेर बुधवार ११ मार्च ही तारीख निश्चित झाली. शुक्रवार १३ मार्चला निवडणुकीचे निकाल समोर येतील. यावेळीही पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात विरुद्ध उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलमध्ये, अर्थात भाजप विरुद्ध उत्पल पर्रीकर, अशी थेट लढत पाहायला मिळणार, असेच चित्र आहे. काँग्रेसने पणजी महापालिकेच्या निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा द्यायचा असे ठरवल्यामुळे भाजप आणि बाबूश मोन्सेरात यांना पणजीतील निवडणूक बरीच जड जाऊ शकते. उत्पल पर्रीकर यांच्यासोबत सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक असे महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे लोक आहेत. शिवाय काँग्रेसने पूर्णपणे उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला तर काँग्रेसची मतेही उत्पल यांच्या गटातील उमेदवारांना मिळू शकतात. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसला असा पर्याय स्वीकारणे अपरिहार्य आहे. फक्त महापालिकाच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला अशाच प्रकारचे धोरण स्वीकारावे लागेल. 

पणजी महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत जर उत्पल पर्रीकर यांनी मोन्सेरात आणि भाजपला चांगली टक्कर दिली, तर ते २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारू शकतील. पण त्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना आपले वर्चस्व दाखवावे लागेल. हे वर्चस्व सिद्ध करणे म्हणजे महापालिकेवर सत्ता स्थापन करणे असेही नाही. कारण यापूर्वी बाबूश महापालिका जिंकायचे आणि भाजपला पणजीची जागा मिळायची, असाही इतिहास आहे. पणजीत विधानसभेची जागा मिळवायची असेल तर पणजी मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात मते महापालिकेच्या निवडणुकीत मिळवणे गरजेचे आहे. त्यावरून विधानसभा निवडणुकीत पणजीतील मतदार काय कौल देतील, त्याचा अंदाज येऊ शकतो. महापालिका निवडणूक होत असताना बाबूश मोन्सेरात हे लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मुक्त झाले आहेत. या गोष्टीची त्यांना मदत होईल असेही नाही. कारण ते आरोप असतानाही मोन्सेरात जिंकले. पण अशा गंभीर आरोपांतून मुक्त होणेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. हे सगळे महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत होत आहे हे विशेष. पणजीचा विचार करायचा झाला तर महापालिका भाजपकडे आहे. उत्पल यांनी भाजपविरोधी भूमिका घेतलेली असल्यामुळे ते स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरवून ही निवडणूक लढणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे उत्पल यांनी सांगितल्यामुळे भाजपला पणजीत कसून तयारी करावी लागेल. भाजपने पणजीतील कमान पूर्णपणे बाबूश मोन्सेरात यांच्याकडे सोपवल्यामुळे उमेदवार निवडीतही पक्षाने हस्तक्षेप केलेला नाही. उमेदवार निवडीचे पूर्ण अधिकार मोन्सेरात यांना दिल्यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असला, तरी मोन्सेरात यांनी भाजप सोडलेल्या आणि भाजपच्या काही चांगल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. जर उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलला काँग्रेसने पाठिंबा दिला, तर काँग्रेसची पारंपरिक मते त्यांच्या गटाला मिळू शकतात. पणजीत काँग्रेसची किमान ५ हजार मते असल्याचा अंदाज आहे. त्यातील किमान दोन ते तीन हजार मतदारांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारांना मतदान केले, तर सध्या महापालिकेत २५ विरुद्ध ५ असा असलेला आकडा मात्र बदलू शकतो. विरोधकांचा आकडा दहापेक्षा जास्तही होऊ शकतो. तसे झाले तर विधानसभा निवडणुकीतही परिणाम दिसू शकतील. उत्पल पर्रीकर यांनी एकहाती भाजप आणि मोन्सेरात यांना टक्कर देणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने पाच जागा जरी मिळवल्या तरीही त्यांचा तो नैतिक विजय ठरेल. पण त्यांच्या हाती जागा लागल्या नाहीत तर मात्र त्यांना विचार करावा लागेल. ज्यांच्या वडिलांनी भाजपसाठी आयुष्य वेचले, त्यांचे पुत्र असलेल्या उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजपविरोधात संघर्ष करावा लागेल, असा विचारही त्यांनी केला नव्हता. पण राजकारण सगळ्या गोष्टी शिकवते. उत्पल पर्रीकर यांचा भाजपसोबत सुरू असलेला संघर्ष त्यांना कोणती शिकवण देतो आणि यातून ते प्रगल्भ होऊन पुढे येतात का, ते वेळ सांगेल. पण भाजपसारख्या बलाढ्य पक्षाने मात्र बाबूशच्या मदतीने पणजी, ताळगाव, सांताक्रुझमध्ये आपला झेंडा फडकवत ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.