पणजीची लढाई कोण जिंकणार?

ही महापालिका निवडणूक उत्पल यांची राजकीय परीक्षा आहे आणि बाबूश मोन्सेरात यांच्या महापालिकेतील एकहाती वर्चस्वाची लढाई आहे. पणजीत राजकीय परिवर्तन घडले तर हे परिवर्तनाचे वारे पणजीतून संपूर्ण गोव्यात पसरायला वेळ लागणार नाही.

Story: विचारचक्र |
19th February, 11:40 pm
पणजीची लढाई कोण जिंकणार?

राज्यातील एकमेव महानगरपालिका म्हणजे पणजी महापालिका. २००२ साली या महानगरपालिकेची अधिकृतरित्या निर्मिती झाली आणि तेव्हापासून पणजी मतदारसंघ आणि महानगरपालिका यांच्या राजकारणाची एकत्रित समीकरणे तयार झाली. जी सामाजिक राजकीय घडामोड पणजीत घडते, त्याचे पडसाद राज्यभर उमटतात. राजकीय निदर्शने, सामाजिक आंदोलने, उपोषणे अशा सरकारविरोधी कार्यक्रमांसाठीचे हमखास स्थान म्हणजे राजधानी पणजी. राजधानी म्हणजे राज्याचा विकास आणि नागरी जीवन दर्शवणारा मानबिंदू होय. पणजी महानगरपालिका आणि पणजी विधानसभा मतदारसंघ या दोन्हीचे क्षेत्र जवळपास एकच‌ असल्यामुळे गेली २५ वर्षे पणजीतील मतदारांना एका वर्षाच्या फरकाने दोनदा मतदान करण्याची संधी मिळते. गेली तीन दशकांतील किमान तीन कार्यकाळ बाबूश मोन्सेरात पॅनलने महानगरपालिकेवर वर्चस्व कायम ठेवले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर राज्याच्या राजकारणात होते, त्यावेळी काँग्रेसच्या सुरेंद्र फुर्तादोंचा अपवाद वगळता महानगरपालिकेवर नेहमी भाजपचा महापौर होता व भाजपचेच वर्चस्व राहिले. या वर्षीच्या निवडणुकीत पॅनल भाजपचे आहे, असे जरी म्हटले जात असले तरीही बाबूश मोन्सेरात यांना अनुकूल अशा उमेदवारांना अंतिम यादीत स्थान मिळेल, असेच दिसून येते. २०२१ साली झालेल्या निवडणुकीत भाजपला इथे अपेक्षित यश मिळाले नाही, पण बाबूश‌ पॅनलने ही निवडणूक एकहाती जिंकली होती. 

पणजी विधानसभा मतदारसंघ, पणजी महानगरपालिका आणि मांडवी नदीत ठाण मांडून बसलेले कॅसिनो या तिन्हींवर ज्या राजकरण्याचे वर्चस्व असते, तो राजकीयदृष्ट्या नेहमी 'मजबूत' स्थितीत असतो‌, असा आजवरचा राजकीय इतिहास सांगतो. मनोहर पर्रीकर यांची केंद्रात संरक्षणमंत्री पदी वर्णी लागल्यावर पणजीत बाबूश यांना सत्तास्वप्ने पडायला सुरुवात झाली. पण शनिवार-रविवारी गोव्याचे राजकारण नजरेखालून घालणाऱ्या पर्रीकर हयात असेपर्यंत बाबूश यांना पणजीत यश मिळाले नाही. पण पर्रीकरांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत सिद्धार्थ कुंकळकर यांचा पराभव करून बाबूश मोन्सेरात पणजीतून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. 

२०२१ साली बाबूश पुत्र रोहित मोन्सेरात महापौर झाले. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत ताळगांवमधून बाबूश यांच्या पत्नी जेनिफर तर पणजीतून खुद्द बाबूश निवडून आले, पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि नाराजी एक गोष्ट स्पष्ट सांगत होती की बाबूश यांना त्यांचा निसटता विजय जिव्हारी लागला होता. एकाही भाजप कार्यकर्त्याने आपल्याला मतदान केले नाही, ही मनातली खदखद त्याचवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली. याला कारण होता केवळ एकच माणूस, उत्पल मनोहर पर्रीकर. 

भाजपने २०२२ साली पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या बाबूश यांना तगडे आव्हान उभे केले होते. ही निवडणूक उत्पल पर्रीकर फक्त ७१६ मतांनी हरले. यातून काही गोष्टी अधोरेखित झाल्या. बाबूश मोन्सेरात यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करता येऊ शकते. मनोहर पर्रीकर यांना मतदान करणाऱ्यांनी उत्पल यांनाच मतदान केले आणि उत्पलमध्ये त्यांना आपला नेता दिसत होता. काँग्रेस, आप आणि इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा न घेण्याचा आत्मघातकी निर्णय आपला पराभव करून गेला का, याचे उत्तर. 

पणजी महानगरपालिका निवडणुक ही एकप्रकारे आमदारकीच्या निवडणुकीआधीची सेमीफायनल म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ही निवडणूक जो कुणी जिंकेल, त्याला पणजीतील आपल्या एकूण राजकीय ताकदीचा अंदाज येईल. 

पणजी महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे शहरातील प्रतिष्ठित नागरी समाजाने मांडवी नदीत नवीनच येऊ घातलेल्या महाकाय सहाव्या कॅसिनो जहाजाविरोधात व पर्यायाने सरकारच्या विरोधात सभा घेऊन जोरदार आवाज उठवला. या सभेला सत्ताधारी वगळता सर्वपक्षीय राजकारणी उपस्थित होते आणि या सभेत चर्चिल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर बारीक लक्ष ठेवून होते. त्याच्याच तिसऱ्या दिवशी उत्पल पर्रीकर, दत्तप्रसाद नाईक, वैदेही नाईक हे माजी भाजप नेते तर सुरेंद्र फुर्तादो, मिनिनो क्रुझ हे काँग्रेस नेते यांनी महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी "आमी पणजेकार" या पॅनलची घोषणा केली. 

गेल्या तीन दिवसांत काही स्थानिक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत उत्पल पर्रीकर अत्यंत पोक्तपणे आणि मुद्देसूदपणे बोलले, हे निरीक्षण महत्वाचे आहे. त्यांचा हा पोक्तपणा महानगरपालिका ते विधानसभा असा कायम राहून प्रतिबिंबित होतो का, हे पाहावे लागेल. काँग्रेसशी हातमिळवणी केल्याच्या राजकीय आरोपाला ते काय प्रत्युत्तर देतात, हेही महत्त्वाचे आहे. उत्पल पर्रीकर यांचा राजकीय कल वा झुकाव हा नेहमी भाजपकडे होता आणि आजही थोड्या प्रमाणात आहे, हे नाकारता येणार नाही. भाजपकडून आपल्या नेतृत्वाला मान्यता मिळावी यासाठी उत्पल यांची धडपड सुरू होती आणि असेलही. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पल यांची भाजपच्या विचारसरणीकडे असलेली निष्ठा आहे. पर्रीकर यांच्याकडे असलेली राजकीय व्यवहार्यता आणि चापल्य आत्मसात करायला उत्पल यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. पणजीत आणि गोवाभर पसरलेल्या जुन्या पर्रीकर समर्थक भाजप कार्यकर्त्यांना उत्पल हवे, पण भाजपला आणि भाजपमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका विशिष्ट सामाजिक राजकीय लॉबीला दुसरे पर्रीकर पर्व नको, हे एक उघड गुपित आहे. पहिल्या पर्रीकर पर्वामध्ये एकछत्री कारभार पाहिलेल्या या लॉबीला पुन्हा भाजपमध्ये पर्रीकर गट पुनरुज्जीवित होऊ द्यायचा नाही आणि तो झालाच तर उत्पल पर्रीकर यांची स्वीकारार्हता वाढीस लागेल. ही महानगरपालिका निवडणूक उत्पल यांची राजकीय परीक्षा आहे आणि सर्व विरोधकांना एकत्र येण्यास भाग पाडणाऱ्या बाबूश मोन्सेरात यांच्या महानगरपालिकेतील एकहाती वर्चस्वाची लढाई आहे. पणजीत राजकीय परिवर्तन घडले तर हे परिवर्तनाचे वारे पणजीतून संपूर्ण गोव्यात पसरायला वेळ लागणार नाही. 

- प्रा. विघ्नेश शिरगुरकर

(लेखक कथालेखक, अनुवादक 

आणि कवी आहेत.)