महोत्सव साजरे करताना हवे नियमांचे भान

Story: अंतरंग - गोवा |
18th February, 11:58 pm
महोत्सव साजरे करताना हवे नियमांचे भान

गोव्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे कार्निवल, शिमगोत्सव आणि नरकासुर प्रतिमा स्पर्धा या महोत्सवांची परंपरा आजही राज्यात सुरू आहे. सध्या पर्यटन विकास महामंडळामार्फत सरकार या महोत्सवांना प्रोत्साहन देते. मात्र या महोत्सवांच्या नावाखाली कार्यक्रमस्थळी होणारा धांगडधिंगाणा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतो, ज्याचा ताण पोलीस तसेच प्रशासनावर येतो. त्यामुळे हे महोत्सव राबवताना नियम आणि अटींचे कडक पालन होणे आवश्यक आहे. तसेच, पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी या महोत्सवांच्या व्यस्त वेळापत्रकात योग्य अंतर ठेवणे गरजेचे आहे.      

पूर्वी कार्निवल, शिमगोत्सव व नरकासुर प्रतिमा स्पर्धा हे महोत्सव स्थानिक संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवले जात असत. मात्र, आता पर्यटन खात्याने या महोत्सवांचे पूर्णतः सरकारीकरण केल्यामुळे मूळ आयोजक असलेल्या नगरपालिका, ग्रामपंचायती आणि स्थानिक सांस्कृतिक संघटनांचा सहभाग नाममात्र राहिलेला आहे. 

या महोत्सवांतून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो, ही सकारात्मक बाब असली तरी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मिरवणुकांमुळे गोंधळ वाढतो. कार्निवल आणि शिमगोत्सव महोत्सवांचे बक्षीस वितरणाचे कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत चालतात. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ उडतो, अनेकदा हाणामारी होतात. यावर आयोजक किंवा प्रशासनाचे नियंत्रण नसते. सध्या ध्वनी प्रदूषणाचे नियंत्रणाचे कडक धोरण असल्यामुळे थोडासा परिणाम झालेला आहे.

सलग आठवडा ते पंधरा दिवसांपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमांमुळे पोलीस यंत्रणेवर याचा बराच ताण येतो. शिवाय दरदिवशी मिरवणुका असल्यामुळे स्पर्धकांना आपले चित्ररथ तसेच रोमटामेळ वेगवेगळ्या शहर आणि गावांमध्ये नेण्यास अडथळा निर्माण होतो आणि स्पर्धक वेळेवर स्पर्धास्थळी पोहोचत नाहीत. जर कार्यक्रमांमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवले आणि व्यसनाधीनतेला आळा घातला, तर या महोत्सवांचा मूळ उद्देश सफल होईल. यासाठी सरकारने पर्यटन खात्यामार्फत या महोत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

- उमेश झर्मेकर