काँग्रेसची स्वबळाची परीक्षा

Story: राज्यरंग |
19th February, 11:39 pm
काँग्रेसची स्वबळाची परीक्षा

विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षांनी खूप आधीपासून निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष यांची पाटी कोरी राहिली होती. २०१६ पासून काँग्रेसने सीपीएमसोबत युती केली होती; मात्र आता काँग्रेसने सीपीएमशी काडीमोड घेऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. १९७७ मध्ये डाव्या आघाडीचे प्रथमच सरकार बनले होते. तेव्हापासून काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपडत आहे. आता ‘एकला चलो रे’चा नारा देऊन सर्व २९४ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या काँग्रेसच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

१९७७ मध्ये डाव्या पक्षांचे पहिले सरकार आल्यापासून काँग्रेसला राज्यात स्वबळावर सत्ता मिळालेली नाही. सीपीएम नेतृत्वाखालील डाव्यांशी केलेल्या युतीमुळे २०२१ च्या विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही काँग्रेसला राज्यातील स्वतःच्या ताकतीचा अंदाज घ्यायचा आहे. सध्या कमकुवत संघटनात्मक बांधणीमुळे काँग्रेसला सर्व जागांवर सक्षम उमेदवार शोधावे लागणार आहेत. इतकेच काय प्रचारासाठी आणि बूथवर ठेवण्यासाठीही पुरेसे मनुष्यबळ पक्षाकडे नाही, असे काँग्रेसमधीलच एका गटाने मान्य केले आहे.

१९९८ मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापन केली. २००१ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-तृणमूलची युती झाली. मात्र, ते डाव्यांची सत्ता उलथवू शकले नाहीत. २००६ च्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर २१ जागा जिंकल्या. २०११ मध्ये तृणमूलने काँग्रेसबरोबर युती करून डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता संपवली. त्यावेळी काँग्रेसला ४२ जागांवर विजय मिळाला होता. नंतर बहुतांश आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. २०१६ मध्ये काँग्रेसने सीपीएमला जवळ केले आणि ४४ आमदार विधानसभेत बसवले. २०२१ च्या निवडणुकीत मात्र या युतीला केवळ एकच जागा जिंकता आली. तीही त्यांचा लहान मित्रपक्ष आयएसएफची होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचा उदय झाला. २०२१ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्यांना भोपळाही फोडता आला नाही.

मुस्लीम मते तृणमूलकडे जाण्यापूर्वी मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले होते. आता या दोन जिल्ह्यांतील ३४ पैकी २८ जागा तृणमूलकडे, तर उर्वरित भाजपकडे आहेत. आयएसएफ आणि ‘जनता उन्नयन पार्टी’ (जेयूपी) यांना सोबत घेऊन सीपीएम मोठी आघाडी करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस स्वतंत्र लढत असल्यामुळे या आघाडीला जनता स्वीकारते का ? काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयामुळे विरोधकांमध्ये फूट पडली आहे. त्याचा फायदा कुणाला होतो, हे पहावे लागेल.

प्रदीप जोशी