जुने ते सोने

भन्नाट

Story: डाॅ. प्राजक्ता कोळपकर |
21st March 2020, 11:44 am
जुने ते सोने


------
आपण नेहमीच संग्रहालय किंवा ऐतिहासिक वास्तू बघायला जातो. मोडतोड झालेल्या वास्तू असतील तर लगेच क्षणाचाही विलंब न लावता प्रतिक्रिया देतो, ‘साधे हे जतन करता आले नाही?’ पण, सुंदर जतन केलेल्या वास्तू किंवा असतील तर चारशे- पाचशे वर्षे त्या कशा काय जपून ठेवल्या असतील? हा विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही. कुणालाही त्यासंबंधी विचारत नाही किंवा गुगलवर जाऊन बघतही नाही. पण, विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, इतक्या जुन्या वस्तू टिकूच शकत नाहीत. मग या टिकल्या कशा??
हा प्रश्न मला कायम भेडसवायचा, पण उत्तर शोधण्याचा आटापिटा केला नाही. मनात तीव्रतेने काही विचार आले असेल तर त्याचे उत्तर नक्कीच मिळते, याची अनुभूती मला आली. माझा ललित कला विभागातील नागपुरातला मित्र कुंदन हातेचा तब्बल वीस वर्षांनी नागपूरहून फोन आला. म्हणाला, ‘माझी बायको लीना पुण्यात येत आहे. तिला तुला भेटायचे आहे.’ आमची कशीबशी भेट झाली अर्थात हॉटेलमध्ये. तिच्याशी बोलल्यावर माझ्या मनात घोळत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि मला पराकोटीचा आनंद झाला.
संग्रहालयात वस्तू टिकून कशा राहतात, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे खुद्द लीनाच होती. लीना ही नागपूरची. चित्रकला महाविद्यालयात होती. अँसिएन्ट इंडियन हिस्टरी, कल्चर अॅण्ड आर्किओलॉजी, पाली आणि प्राकृत यात पदवी घेऊन म्युझिओलॉजी आणि अॅन्थ्रोरोपोलाजी यातही डिप्लोमा केला. हे ऐकत असताना सगळंच डोक्यावरून जात होते; त्यामुळे सोप्या भाषेत सांगण्याचा माझा तिला हट्ट. ती म्हणाली, ‘मी या सगळ्या पदव्या घेऊन सरकारी नोकरी केली, मात्र मन रमले नाही. शेवटी हेरिटेज कन्झर्वेशन म्हणजे वारसा संवर्धनाचा कोर्स २००६ मध्ये पूर्ण केला. द हेरिटेज कंझर्वेशन सोसायटी ही स्वतःच्या मालकीची संस्था २०१८ मध्ये स्थापन केली आणि या माध्यमातून भारतीय परंपरेचा वारसा टिकवण्याचे तिने मनावर घेतले. उदा. जुन्या वाचनालयातील जर्जर झालेली पुस्तके पूर्ववत करून देणे. २०० वर्षांपूर्वीचे ‘महाभारत’ तिने पूर्ववत करून दिले आहे. संग्रहालयातील मान्यवरांच्या वस्तू पूर्ववत करून जतन करणे, मंदिरांची दुरुस्ती, जुने शिलालेख, ताम्रलेख, ऐतिहासिक वास्तू, किल्ले यांचे जतन करून ठेवणे वगैरे.
लीनाला मुळातच आपल्या संस्कृतीचे खूप वेड. परदेशात जाऊन आल्यावर तर आपल्या भारतात इतिहासाचा, संस्कृतीचा, परंपरेचा खूप मोठा खजिना आहे, असे तिला जाणवले. भारतात असलेला हा ठेवा जगात कुठेही मिळणार नाही, त्यामुळे तो जतन करून ठेवलाच पाहिजे; नाहीतर पुढच्या पिढीला तो फक्त पुस्तकातच किंवा चित्राच्या माध्यमातूनच दिसेल आणि इतिहासाचे खरे वैभव त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोचणार नाही, ही खंतही तिला आहे. हे सगळेच जर पुढच्या पिढीपर्यंत जसेच्या तसे जाऊ द्यायचे असेल तर त्यावर आताच काम व्हायला पाहिजे; मात्र, दुर्दैवाने आपली ही संपत्ती आपण चांगल्या प्रकारे जतनही करत नाही यासाठी ती हळहळ व्यक्त करते.
याच कळकळीतून तिने साकारले आपले ध्येय. तेही वारसा संवर्धन करण्यासाठीचे. अल्पावधीत तिने बरेच काम केले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चष्म्याची केस, त्यांचे जॅकेट आणि ज्यावर त्यांनी संविधान लिहिले तो टाइपरायटरही लीनाने काही रसायनांचा वापर करून पूर्ववत केला आहे. नागपूरचे सेन्ट्रल संग्रहालय, वर्धेचे मगन संग्रहालय, सातारचे औंध म्युझियम ,कोल्हापूरचे न्यू पॅलेस संग्रहालय, आंबेडकर म्युझियम अशा अनेक ठिकाणच्या वास्तूंचे संवर्धन लीनाने लीलया केले आहे. वाळवीने खाल्लेली महाभारताची पोथी जशीच्या तशी पूर्वस्थितीत आणण्याचे काम हे अतिशय अवघड कामही अप्रतिमपणे तिच्या हातून घडले. पाली प्राकृत भाषा तिला यासाठी कामी आल्या. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये वाघाच्या पायांचा ऍश ट्रे, हत्तीच्या पायाची फुलदाणी या वस्तूसुद्धा पूर्वस्थितीत आणल्या. या वस्तूंवर एक प्रकारचा रोग तयार होतो, जो कॅन्सरसारखा असतो. त्याचा नाश होणे गरजेचे असते. नाहीतर ती वस्तू कुजत जाते. अशा प्रकारचा कॅन्सर समूळ नष्ट करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे रसायनही तिने तयार केले आहे. त्याच्या पेटंटसाठी तिने अर्ज केला आहे.
तिच्या घरी आजोबांचा पिढीजात परंपरा जपण्याकडे कल होता. त्यांच्याकडून लीनाला अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकायला मिळाल्या; त्यामुळे आपल्या पुराणातही खूप काही अद्भुत आणि अलौकिक आहे असे तिला वाटते आणि हा ठेवा जपून ठेवलाच पाहिजे हा तिचा आग्रह आहे.
गांधीजींची शाल किंवा आंबेडकरांचा कोट जतन करताना आपण काहीतरी भव्य करतोय या अनुभूतीने लीना हुरळून जाते. ती म्हणते त्या वस्तूंसोबत तो इतिहास माझ्या अंगात संचारतो आणि मी झपाटल्यासारखी काम करते. जिजाबाईंच्या पैठण्या जतन करण्याचाही तिचा मानस आहे.
लीनाचा निरोप घेताना मलाही खूप कौतुक वाटत होते. तिच्या हातून या सगळ्या वस्तूंवर काम व्हावे आणि त्या सुस्थितीत जतन व्हाव्या हे मलाही मनापासून वाटले.
(लेखिका समाजसेवक, व्यावसायिक आहेत.)