करोना : थोडीशी जबाबदारी, शिस्त हवी

प्रासंगिक

Story: प्रदीप मनोहर पाटील |
21st March 2020, 11:43 am


-
तसं पाहिजे तर मानव किंवा कुठलाही प्राण्यांचं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं. त्यात अन्न, हवा, पाणी मिळाले की शरीर चालत, पळत असतं. जीव हा अन्न, पाणी, हवेवाचून जगूच शकतं नाही. या घटकांतून अनंत सूक्ष्म जीव शरीरात जात असतात. ते केवळ मायक्रोस्कोपमधूनच दिसू शकतात. पाहिलं बघितलं तर सारी सृष्टी जवळजवळ नियमित एकमेकांच्या संपर्कात असते. त्यात सारे प्राणी, पशुपक्षी, जीवजंतू येतात. आपण मानव आहोत त्यामुळे आमचाच विचार करू. आपण दररोज अनेक सूक्ष्म जीवजंतूंच्या संपर्कात सदैव राहतो. कसेही रहात असलो तरी शरीराची योग्य निगा, काळजी घेत असतो. त्या क्रियेत बरेच जीवजंतू मारतो किंवा पळवून लावत असतो किंवा शरीर तंदुरूस्त असते त्यामुळे त्या जंतूंना परतावून लावत असतो. त्यात काही व्हायरस, जीवजंतू हे आपल्या आरोग्यासाठी चांगलेही असतात. काही आपल्या पेशींना पोषक असतात. त्यांना ते जगवतात, त्यांची वाढ करतात. पण, जे वाईट असतात, त्यांच्या त्रासामुळे शरीरावर परिणाम होतो. शरीर दुखतं, प्रकृती बिघडते, शरीर मरणाच्या दिशेने चालत जाते. त्यातील काही बॅक्टेरिया, विषाणूंना आपण आजारांची नावे दिली आहेत. ते शरीरात शिरले की आजार होतात.
जीवनिर्मिती अनेक स्थित्यंतरातून गेलेली प्रक्रिया आहे. सारे एकमेकांवर जगत असतात, पोसतात, वाढतात, एकमेकांना संपवतातही. चक्राप्रमाणे हे जीवचक्र असतं. गीतेत सांगितलंय, ‘जीव जीवस्य जीवनम्..’ याचा अर्थ तोच.
अन्न कुठलंही असो, योग्य तापमानात चांगल्यापैकी शिजवलं तर चांगलंच. मग शाकाहार असो मासाहारी. माणूस दोन्ही आहारात मोडणारा, पचवणारा आहे. वाईट सूक्ष्म जंतू किंवा विषाणूंमुळे शरीरावर होणारा परिणाम म्हणजेच आजार. निसर्गचक्र फिरतं असतं. त्यात बदल होणे, हा नियम. या नियमानुसार बदलातून उत्पन्न झालेले आजार आजपर्यंत अनेक आले. त्यात बरीच माणसे दगावली. पूर्वी साथीचे आजार येत म्हणजेच जवळ राहिले, एकमेकांशी संपर्क आला की मरण. देवी, प्लेग, क्षय... त्यात लाखो माणसे मरण पावली. आज त्यातील काही नष्ट झाले आहेत. त्यावर उपाय आले आहेत. अलीकडेच प्राण्यांच्या संपर्कातून एड्स आला. तो हळूहळू कमी होतो. वेळ जातो, पण उपचार सापडतोच. तोपर्यंत धीर आणि योग्य ती खबरदारी प्रत्येकाने सदोदित घेणं महत्त्वाचं.
काळ बदललाय, निसर्गचक्र अनिश्चित झालंय. मानवाच्या अतिसुखापायी निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. पूर्वी घनदाट वनराई होती. जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत नसत. ते पाहण्यासाठी सर्कस होती. आता ती बंद झाली, प्राण्यांना त्रास नको म्हणून. जंगलसृष्टीचा नाश केला मानवाने. प्राण्यांना आहार- विहार ठेवला नाही. परिणाम ते मानवी वस्तीत येऊ लागले. हा संघर्ष अजून चालू आहे.
गेल्या वर्षी चीनच्या वुहान या गजबजलेल्या शहरात मार्केटमध्ये करोना नावाचा विषाणू उत्पन्न झाला. त्यातून पहिल्यांदा एका मानवास लागणं झाली आणि नंतर त्या बाधित व्यक्तीकडून शहरात आणि आता जगभर पसरला कोरना विषाणू. चीनने जगाला उशीरा सांगितले, पण आपण सीमा सील करून त्वरित पाऊल उचलले. तरीही तो विषाणू तेथून बाहेर गेलेल्या लोकांमुळे इतरत्र पसरला.
तिथल्या कुणालाही बाहेर नेऊ नका. पण, जिवाच्या भीतीने अनेकजण आपापल्या देशात गेले व तेथे करोना पसरला. तेथील विदेशी लोक आपल्या देशात गेले व तेथे करोना शिरला. अशा रितीने तो सर्वत्र पसरला. आपल्या भारतातही दुबई तसेच इतर देशांतून आलेल्या पर्यटकांमुळे (विदेशी व देशीही) हा आजार पसरला आहे. साऱ्या भारतीयांनी काळजी घेणं महत्वाचे आहे.
आपल्या भारतात पूर्वी संत गाडगेबाबा सांगून गेले आहेत, ‘माझा देश बिनडोक्याचा बाजार आहे’. काही अंशी तसंच दिसते. आपल्याकडे तापमान जास्त आहे, करोना पसरणार नाही. ४० अंश तापमानात तो जिवंत राहू शकत नाही, वगैरे बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात आल्या. तापमान जास्त, कमी या भ्रमात न राहता काळजी घेणं महत्त्वाची. आपल्याकडे जे करू नका असे सांगितले जाते, ते जास्त करण्याची हौस असते. बाहेर निघू नका सांगितले, सुट्या दिल्या तर लोक नातेवाईकांकडे जाऊ लागले आहेत. तोंडाला मास्क बांधतानाही दिसत नाहीत. काय म्हणावं याला? कुठल्याही समस्येचे गांभीर्यच समजत नाही, ही आपल्या देशाची शोकांतिका वाटते. यावरून आपले आंतरराष्ट्रीय पातळीवर हसं होतं. नावं ठेवतात. काही दिवसांपूर्वी लंडन येथे आंतरराष्ट्रीय विश्लेषक चॅथम हाऊस यांनी म्हटलं, ‘करोना विषाणूची भारतात सुरुवात झाली नाही, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.’ याचे कारण आपला देश कसा आहे, हे सर्वांना माहीत आहे, असे दिसते. आपल्याला वाईट वाटलं, पण काय खोटं बोलले ते? कोणी आपल्यावर हसतं तर त्यातून बोध घेऊन सुधारलं पाहिजे. हसणाऱ्या माणसाला आपण खोटे ठरवलं पाहिजे. तशी कृती आपण केली पाहिजे. त्यांना वाईट म्हणत, टीका करत बसण्यापेक्षा आपण सुधारलं पाहिजे. सारे काही सरकारवर सोपवून बसणे सर्वस्वी चूक आहे. सरकारने सांगितले आहे, तसं वागावे. सहकार्य करा. घरात थांबा. मुलांना सुट्या मिळाल्या आहेत, म्हणून बाहेर पडू नका. त्यासाठीच सुट्या दिल्या आहेत. फिरण्यासाठी नव्हेत, हे लक्षात ठेवावे.
काळजी कशी घ्यायची यावर बरेच प्रबोधन झालंय. तसं वागावे. आपण जगा, दुसऱ्याला जगु दया. स्वतः निरोगी राहा, दुसऱ्याला राहू द्या. काही होत नाही, अशा भ्रमात राहू नका, यात जितकी काळजी घ्याल, तितकं चांगलं. सरकारी आदेश पाळा. आपल्या येथे असं काही असलं तर अफवा खूप जास्त पसरवल्या जातात. वर्तमानपत्रातील सरकारी आरोग्य खात्याच्या बातम्यांवरच भरवसा ठेवा. करोना हा आजार थोडीशी काळजी घेतल्यास नाहीसा होईल, पण त्यासाठी हवा संयम, जबाबदारीची जाणीव, शिस्त.
(लेखक विविध विषयांवर लिहितात.)