प्राचार्यांचे पालकांना पत्र

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
21st March 2020, 11:41 am


-
साधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने म्हणजे परीक्षांचे सुगीचे दिवस. त्यामुळे ज्या घरात शिकणारी मुलं आहेत त्या घरात वातावरण तंगच असते. विशेषतः ज्या घरात दहावी किंवा बारावीचे मूल असते, त्या घरात तर वर्षभर अघोषित आणीबाणीच असते. याचं कारण परीक्षांना आणि त्यातून मिळणाऱ्या गुणांना दिलं जाणारं अवास्तव महत्व. या संदर्भात एका प्राचार्यांनी पालकांना लिहिलेले पत्र फार बोलके आहे. मूळ पत्र इंग्रजीत आहे. त्याचा स्वैर अनुवाद असा.
प्रिय पालक,
लौकरच तुमच्या मुलांच्या परीक्षा सुरु होतील. मला कल्पना आहे की आपल्या पाल्याने परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत असं प्रत्येकाला तीव्रतेने वाटतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या मुलांमध्ये एखादा कलाकार असेल ज्याला गणिताच्या सखोल ज्ञानाची आवश्यकता नाही. एखादा भावी उद्योजक असेल ज्याला इतिहास किंवा इंग्रजी साहित्याची फारशी गरज नसेल. एखादा संगीतकार असेल ज्याला रसायनशास्त्रात मिळणाऱ्या गुणांची फारशी चिंता नसेल. एखादा खेळाडू असेल ज्याला पदार्थविज्ञानापेक्षा शारीरिक तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असेल. तुमच्या पाल्याला चांगले गुण मिळाले तर उत्तमच पण ते नाही मिळाले तरी कृपा करून त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका. त्याला जवळ घेऊन सांगा की इतके गुण मिळाले तरी हरकत नाही. कदाचित तुझ्या हातून आणखी काहीतरी वेगळं घडायचं असेल. तू धीर सोडू नकोस. हे एवढंच त्याला सांगा आणि मग बघा त्याचा चेहरा कसा उजळून निघतो ते. एखाद्या परीक्षेत मिळालेल्या कमी गुणांमुळे त्याच्यात असलेली प्रतिभा आणि त्याचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आणि हो ! एक गोष्ट लक्षात ठेवा. या जगात फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरच सुखी असतात असं नाही.
अनेक शुभेच्छांसह,
प्राचार्य.
वरील पत्र हे पालकांसाठी पुरेसं मार्गदर्शक आहे. त्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही. गरज आहे ती त्यावर गांभीर्याने विचार करण्याची. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी म्हणजे भरपूर पैसा कमवायचा, तर परीक्षेत उत्तम गुण मिळविणे हा एकमेव मार्ग आहे अशी आमची झालेली धारणा. एकदा हे उद्दिष्ट निश्चित झाले की मग मूल दोन अडीच वर्षाचे होत नाही तोच प्ले स्कूल, नर्सरी, के. जी. या गोंडस नावाखाली मुलाला कोंडवाड्यात कोंडले जाते. बरं या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्याच हव्यात. कारण आपलं मूल फाड फाड इंग्रजी फाडायला लागलं म्हणजे ते हुशार झालं, असा पालकांचा गोड (गैर)समज असतो. (इंग्रजी भाषा येणं आणि इंग्रजी माध्यम असणं हे दोन वेगळे विषय आहेत.) शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी होतो हे नक्की. पण, शिक्षणाचा संबंध अर्थार्जनाशी लावला की शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट बाजूला पडून अर्थार्जनासाठी शिक्षण आणि तेही पालक ठरवतील ते
हे त्याचे उद्दिष्ट ठरते.
शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत, पण त्यातली महात्मा गांधीजींनी केलेली व्याख्या मला अधिक सुटसुटीत वाटली. ते म्हणतात, ‘By education I mean the allround drawing out of the best in child and man- body, mind and soul.’ थोडंसं स्वैर भाषांतर करायचं झालं तर असं म्हणता येईल की एखाद्या मुलाच्या किंवा व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा किंवा प्रतिभेचा शोध घेऊन त्यांचा सर्वंकष विकास करणे म्हणजे शिक्षण.
शिक्षणाच्या या व्याख्येप्रमाणे आपण आपल्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी देतो का? सामान्यपणे शिक्षण घेणं म्हणजे शाळेत जाणं आणि ९० टक्क्यांच्यावर गुण घेतले की मूल चांगलं शिकतं असं समजणं. आज आपली शिक्षण पद्धती ही सर्वस्वी गुणांच्या भोवती फिरत आहे. आणि याला जबाबदार पालक, शिक्षक, समाज आणि शासन हे घटक आहेत. कारण त्यांच्या मते चांगली शाळा कोणती तर ज्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो ती. चांगलं मूल कोणतं तर ज्याला ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतात ते. आणि मग सगळ्या पालकांची आपलं मूल चांगलं व्हावं यासाठी धडपड सुरु होते. मग त्यासाठी महागडी फी असणारे क्रॅश कोर्स, ट्युशन्स, गाईड्स, होमवर्क याच्या माऱ्यात मूल पार भरडून निघतं.
आपलं मूल मोठं व्हावं, सुखी व्हावं ही यामागे पालकांची इच्छा असते आणि ती प्रामाणिक असते यात कोणतीही शंका नाही. पण यात एकच चूक होत असते. ती म्हणजे पालक मुलाचं सुख कशात आहे किंवा त्याला कशात आनंद वाटतो हे न पाहता त्यांच्या सुखाच्या कल्पना मुलांवर लादत असतात. बहुतांश पालकांच्या सुखाच्या कल्पना म्हणजे मुलानं डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं. त्याच्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलन्स असावा इत्यादी. पण, एक गोष्ट लक्षात ठेवावी, सगळीच मुलं डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ शकत नाहीत. प्रत्येक मुलाच्या क्षमता आणि मर्यादा निसर्गदत्त असतात. आणि केवळ पैसा म्हणजे सुख नव्हे. एखाद्या कलाकाराची जमलेली बैठक त्याला मिळणाऱ्या बिदागीपेक्षा जास्त आनंद देऊन जाते. एखाद्या खेळाडूच्या दृष्टीने खेळाचे मैदान हे सुखाचे आगर असते. कुंचल्यातून चितारणारा चित्रकार देहभान विसरतो. एखाद्या उत्कट क्षणी स्फुरलेली कविता केवळ कविलाच नव्हे तर अनेकांना सुंदर अनुभूती देऊन जाते. मुलाला ज्या विषयात गती आहे त्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं म्हणजे शिक्षण. मग तो विषय कोणताही असो. प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना त्याला लावू नका.
मुलांना कमी गुण मिळाले तरी त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका. कारण तो कमी झाला तर ती आयुष्यात ठामपणे उभी राहू शकणार नाहीत. एमए, एमेस्सी झालेली मुलंसुद्धा प्यून, क्लार्क यासारख्या त्यांच्या विषयाशी कोणताही संबंध नसलेल्या नोकरीसाठी रांगा लावून उभी असतात. कारण आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वासच त्यांच्यात निर्माण झालेला नसतो. शिक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्याचा हा परिणाम असतो.
(लेखक साहित्यिक आहेत.)