रजोनिवृत्ती

Story: अपूर्वा सांबरेकर |
12th October 2019, 11:28 am
रजोनिवृत्ती


शेजारच्या एका ५० वर्षाच्या काकूंकडे मी केलेला एक गोड पदार्थ देण्यास गेले होते. दार उघडंच होतं. आत गेले तर काका काकूवर चिडचिड करत होते. ‘हल्ली तू कोणतंही काम वेळेत करत नाहीस. मी काही विचारलं तर लगेच चिडचिड करतेस. का करतेस अशी चिडचिड? मला कंटाळा आलाय घरात राहायचा.’
मी ते ऐकलं आणि विचार केला की कदाचित काकांना काकूच्या वयाचं भान राहिलं नाही. त्यांचंसुद्धा काकांसारखंच वय वाढत आहे आणि आता त्या ५० वर्षे वयाच्या झाल्या आहेत. यावरून मला रजोनिवृत्तीविषयी लिहिण्याचा विषय मिळाला.
साधारणतः वयाच्या तेरा- चौदाव्या वर्षी मुलीची मासिक पाळी सुरु होते. ती वयाच्या ४८-५० व्या वयापर्यंत चालू राहते. या ऋतुस्नानाच्या काळात तिला अनेकदा शारीरिक वेदना जाणवत असतात. तिच्यात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. आजच्या काळात स्त्रिया सर्व गोष्टी एक आव्हान म्हणून स्वीकारत आहेत. त्यामुळे जरी त्रास झाला तरी सहन करून आपली नोकरी, व्यवसाय सांभाळत आहेत. परंतु जेव्हा रजोनिवृत्तीचा काळ येतो तेव्हा त्यांच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. जसं ऋतुस्नानाच्या काळात तिला शारिरीक वेदना होतात तशाच प्रकारे रजोनिवृत्तीच्या काळात होत असतात.
माझ्या आईचं वय सुद्धा आता पन्नाशीकडे पोचले आहे. तिच्या बाबतीतही असंच होत असतं. सतत तिला थकवा येतो. कामाचा वेगही मंदावत चालला आहे. रात्रीची जागरणे होतात, झोप लागत नाही. आणखी एक मुख्य गोष्ट म्हणजे तिला घाम दरदरून येतो. अशक्तपणा वाढत आहे. तिचा उजवा हात नेहमी दुखतो. त्यांमुळे तिचा पूर्वीसारखा मूडही राहिला नाही. तिच्या या शारीरिक त्रासाबरोबर तिला मानसिक त्रासही सहन करावा लागतो. तिची बारीक कारणांवरूनही चिडचिड होते. स्वभाव चिडचिडा बनत चालला आहे. काही गोष्टी तिला पटकन लक्षात येत नाहीत तसेच काही गोष्टी आठवत नाहीत. स्वयंपाक करताना अनेकदा जेवणात मीठ कमी जास्त होतं. कधी कधी तर जेवण अळणी होतं.
अशा प्रकारे अनेक शारीरिक आणि मानसिक पातळीवर महिलांची उलथापालथ होते.
ज्यांची मासिक पाळी येत असते. त्यामध्ये काही स्त्रिया घरात शुभकार्ये करण्यास मिळावे म्हणून पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेतात. आणि घरात शुभ कार्य करून घेतात. गोळ्या खाल्ल्याने शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम होतो आणि जेव्हा पाळी येते तेव्हा मग शारीरिक तक्रारी सुरु होतात. त्यामुळे गोळ्या न घेता नैसर्गिक पद्धतीने पाळी येणे चांगले असते.
कधी कधी कोणताही अनैसर्गिक उपाय न करता मासिक पाळी वेळेवर येत नसेल तरीही शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवतो. त्यामुळे पाळीचक्र अनियमित होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपाय करणे केव्हाही चांगले.
(लेखिका विद्यार्थिनी आहेत.)