रक्तातील चरबी

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
05th October 2019, 11:46 am
रक्तातील चरबी


-
बहुतेक सर्वांना हृदयाचा विकार, चरबीची समस्या असल्याने कोलेस्ट्रॉल हा शब्द लहान मुलांनाही माहीत असतो. पण, ते नक्की काय हे अनेकांना माहिती नसते. आपल्या रक्तात दोन तऱ्हेचे कोलेस्ट्राॅल असते. चांगले व वाईट.
चांगले कोलेस्ट्राॅल : हे माणसाला काम करायला उत्साहित करते. इंजिन आॅईलप्रमाणे ते काम करते. आपल्याला कसलेही काम करायला मनापासून उत्साह, आनंद वाटत असेल, तर आपल्या शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणात आहे, असे समजावे. असल्या व्यक्तींच्या शरीरात सहसा चरबी असत नाही. याला वैद्यकीय भाषेत ‘एचडीएल’ असे म्हणतात.
वाईट कोलेस्ट्रॉल : हे माणसाच्या रक्तात चरबीचे प्रमाण वाढवते. नंतर त्वचेखालची चरबी वाढवते. पोटावरील चरबीही वाढवते. माणसाच्या आतड्यांमध्ये काही जीव असतात. ते चांगले कोलेस्ट्रॉलचे शत्रू असतात. या जीवांमुळे चरबी झपाट्याने वाढत जाते.
चांगले कोलेस्ट्रॉल हे मासे (खास करून बांगडा), सुरमई (विस्वण), करली, वेरल्या, पापलेट यांच्यामध्ये असते. पालेभाज्या, फळांमध्येही ते असते. वाईट कोलेस्ट्रॉल शिणाणी- खुबे- तिसऱ्या- कालवें (शॅलफिश), खेकडे, चिकन, मटण, पोर्क, बिफ यामध्ये असते. त्यामुळे जिभेवर ताबा ठेवायला हवा. चांगले कोलेस्ट्रॉल बहुधा मानेकडे वाढते, तर वाईट पोटावर.
अनेक जण जाडे, लबलबीत असतात. यामागे अनेक कारणे आहेत. आईवडील, आजी आजोबा, पणजी- पणजोबा जाड असल्यास पुढील पिढीही जाड होते. याला अनुवांशिकता म्हणतात. दात पुढे असणे, टक्कल पडणे, मधुमेह, रक्तदाब अशा गोष्टीही अनुवांशिक असू शकतात. जास्त प्रमाणात वाईट कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणे, वेळीअवेळी खाणे, एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे, व्यायाम न करणे (साधे दीड-दोन किलोमीटर चालत जाणे हासुद्धा चांगला व्यायाम आहे, हे कोणी विसरू नये.) इत्यादी कारणांमुळे माणूस जाडा होऊ शकतो.
तसे होऊ नये, यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल असलेले अन्न खायला हवे. बाहेरचे ब्रँडेड, तेलकट, मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत. पालेभाज्या, फळे (घरगुती असल्यास उत्तम) खावीत, व्यायाम करावा. घरातील वा कार्यालयातील काम करताना तासाभरात उठून हातपाय मोकळे करावे. कोलेस्ट्रॉलचे वाईट परिणाम असतात, हे सांगायला नको.