आग शांत करणारी कोरफड

Story: डाॅ. विक्रांत जाधव |
17th August 2019, 11:00 am
आग शांत करणारी कोरफड

घरच्या बंगल्याच्या कुंपणावर किंवा खेडोपाडी माळरानावरही दिसणारी कोरफड तिच्या औषधी गुणधर्मांमुळे मृदा, माता, गृहकन्या अशा नावांनी आयुर्वेदात ओळखली जाते. त्वचा भाजली असता होणारी आग शांत करण्याचे काम ‘कुमारी’ करते. याशिवाय गर्भाशयाच्या विविध तक्रारीत किंवा बाह्य लेपनातही तिचा उपयोग होतो. विविध त्वचाविकारावर तर कोरफड खूपच उपयुक्त ठरते.
विसाव्या शतकात ‘हर्बल मेडिसिन’ कडे ज्यामुळे संपूर्ण जग आकर्षित झाले, ती ‘कुमारी’ वनस्पती म्हणजेच कोरफड दिसायला स्वत:चे वेगळे रूप असलेली. गुलाबासारखा सुगंध नसलेली तरीही कुमारी मुलींना हवीहवीशी वाटणारी, त्यांच्या शारीरिक तक्रारींना धावून येणारी ही कोरफड, म्हणनूच गुलाबाने ‘तरुणी’ हे नाव घेतले, तर कोरफडीला तिच्या उपयुक्त गुणांमुळे ‘कुमारी’ हे नाव मिळाले. तशी हिला नावे भरपूर. त्यात मृदा, माता, गृहकन्या ही नावे उल्लेखनीय. या वनस्पतीच्या पानांच्या लांब आकारामुळे हिला दीर्घपत्रिकासुद्धा म्हणतात.
स्वत:च्या उल्लेखनीय उपयुक्त गुणाधर्मामुळे ‘कुमारी’ ने जग वेडे केले. जंगलात कोठेही, कोणत्याही अवस्थेत राहणारी ही कोरफड कुंड्यांमध्ये तसेच घरातील दिवाणखान्यात आपलं घर करण्यात यशस्वी ठरली. भारतात घरातील कुंपणावर दिसणारी ही वनस्पती, अमेरिकेसारख्या देशात घराघरांत सजवलेल्या कुंड्यांमध्ये वास करते.
जगातल्या बहुतांश स्वयंपाकघरात ‘कुमारी’ राहते. असे का? कारण, कोणत्याही क्षणी गृहिणीचे, मुलांचे लक्ष चुकून चटका बसला तर त्या ठिकाणी भाजते. त्या ठिकाणी कोरफडीचा गर लावला तर होणारी आग थांबते व जखम तत्परतेने भरण्यासाठी ती बँडेजसारखे काम करते. काही दिवसात जखम बरी करते. म्हणूनच भारतात जरी ती कुंपणावर असली तरी जगात मात्र राष्ट्राध्यक्षांच्या दिवाणखान्यापासून थेट जगातल्या सर्वाधिक खपणाऱ्या दाढीच्या साबणांमध्ये, अभिमानाने आयुर्वेदीय वनस्तींचा झेंडा फडकवत उभी आहे ही भारतीय ‘कुमारी.’
कोरफडीला अलो-वीरा जडिका असे म्हणतात. साधारण क्षुप असणारी ही कुमारी तीस ते साठ सेंटिमीटर उंच होते. तिची पाने जाड, रसरशीत, दोन ते चार सेंटिमीटर रुंदीची व लांब असतात. पानांमध्ये घट्ट असे बुळबुळीत द्रव्य साठलेले असते. त्याचाच उपयोग बऱ्याच प्रमाणात केला जातो. आयुर्वेदीय औषधी निर्माणात, कोरफडीच्या पानांचा रसक्रिया विधीने जो घन भाग केला जातो, त्याला काळा बोळ असे म्हणतात. गर्भाशयाच्या विविध तक्रारींमध्ये याचा उपयोग केला जातो. कोरफड गुणधर्माने पचायला जड, स्निग्ध, चिकट, कडू, गोड व थंड आहे. मात्र, काळा बोळ मात्र उष्ण व तीक्ष्ण गुणधर्माचा आहे. अलीकडे रामदेवबाबांपासून इतर अनेकजण आलुवेरा, आलुवेरा करतात, ती हीच कुमारी, कोरफड. गोव्यात तिला कांटेकोर म्हणतात.
कोरफडीचे मुख्य कार्य रक्त व धातूंवर दिसून येते. कोरफड कमी मात्रेत दिल्यास भूक वाढवणारी, पोटातील वात कमी करणारी तसेच शौचाला साफ करून यकृताचे कार्य वाढवणारी अशी आहे. (क्रमश:)

(लेखक आयुर्वेद डाॅक्टर आहेत.)