जीवनशैली बदला, मधुमेह टाळा

Story: डाॅ. प्रितम कळंगुटकर |
09th November 2019, 10:31 am
जीवनशैली बदला, मधुमेह टाळा


-
१४ नोव्हेंबर, हा जागतिक मधुमेह दिवस असून, जगभरात मधुमेहाबद्दल जागरूकता वाढविण्याच्या उद्दिष्टाने तो साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ आणि जागतिक आरोग्य संस्था त्याचे आयोजन करतात. ‘कुटुंब आणि मधुमेह’ ही २०१८ -२०२० या वर्षांतील संकल्पना आहे.
इन्सुलिनवरील रुग्णांसाठी साखरेवर कडक नियंत्रण असणे आणि जीवनशैलीची गुणवत्ता राखणे गरजेचे. आहार, व्यायाम, औषधोपचार, रक्तातील ग्लुकोज निरीक्षण, जखमेची नियमित मलमपट्टी आणि डॉक्टरांचे औषधोपचार या सगळ्या बाबतीत कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेली मदत फार महत्त्वाची असते.
अलीकडे मधुमेह हा जणू साथीचा आजार बनल्यामुळे प्रत्येकाला धोका आहे. भारतातील मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही इंटरनेट, सोशल मीडियामुळे मधुमेहाविषयी बरीच जागरूकता आहे. पण, केवळ थोडेच लोक नियमित सायकल चालविणे, पोहणे यासारख्या शारीरिक व्यायामांचा विचार करतात. हल्ली लोक अधिक व्यस्तही झाल्याने जीवनशैली बदलली आहे. तेलकट पदार्थ खाणे, छोट्या अंतरासाठीही वाहनांचा वापर करणे, हे सामान्य बनले आहे.
मधुमेहाची सामान्य लक्षणे म्हणजे, जास्त भूक किंवा तहान लागणे, जास्त लघवी होणे, पायात जळजळ होणे किंवा दृष्टी अस्पष्ट होणे अशी आहेत. मधुमेहात दोन प्रकार असतात. प्रकार १ आणि प्रकार २. प्रकार २ म्हणजे हा मधुमेहाच्या ९५ टक्के लोकांमध्ये पाहतो तो. याचा अर्थ लोक स्वादुपिंडातून मिळालेल्या इन्सुलिनचा वापर करण्यासाठी अक्षम आहेत. प्रकार १ मध्ये, जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती आपली स्वादुपिंडे नष्ट करते आणि त्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन होत नाही. हे सहसा बालपणात घडते पण आपल्यावर कदाचित तारुण्यात याचा प्रभाव होऊ शकतो, जेव्हा आपले हार्मोन्स बदलू लागतात. या प्रकारच्या रुग्णांना इन्सुलिन चालूच ठेवावं लागतं.
‘गर्भावस्थेमध्ये मधुमेह’ हा तिसरा प्रकार आहे. ज्यात गर्भधारणेदरम्यान व्यक्तीवर परिणाम होतो. शेवटचा प्रकार म्हणजे दुय्यम मधुमेह. याला संक्रमणकालीन मधुमेह म्हणून देखील म्हणून शकता. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकालीन स्टिरॉइड्स वापरते तेव्हा हा प्रकार उद्भवतो. कारण स्टिरॉइड्स शरीरात साखरेची पातळी वाढवतात. एकदा त्याचा वापर थांबवला, की साखरेची पातळी सामान्य स्थितीत येते. मधुमेह काही अँटी-डिप्रेसन्ट्स गोळ्यांच्या सेवनामुळे देखील होतो.
जर तुमचे पालक, भावंडे किंवा जवळचे नातलग मधुमेही असतील तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता जास्त. विशेषत: वेळीअवेळी खाणे, लठ्ठपणामुळे मधुमेह होऊ शकतो. म्हणून, आरोग्यासाठी खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनविणे अत्यंत महत्त्वाचे. कमी कार्बोहायड्रेट खाणे, तेलकट पदार्थ टाळणे आणि जेवणात प्रथिने समाविष्ट करणे उपयुक्त आहे. प्रत्येकाला व्यायामशाळेत जाणे शक्य नाही, यासाठी सोपे मार्ग म्हणजे चालणे. कामाच्या ठिकाणी चालत जाणे, लिफ्टऐवजी पायर्‍या चढणे, स्ट्रेचिंग व्यायामासाठी पाच-दहा मिनिटांचा ऑफिस ब्रेक घेणे इत्यादी. रक्तातील साखरेचे वार्षिक निरीक्षणही हवे. वयाच्या ४५ व्या वर्षी पूर्व-पेशीवरील शर्करा शोधणे आवश्यक. या टप्प्याला बॉर्डरलाइन डायबिटीस असेही म्हणतात.
लोक नेहमीच लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मधुमेहाची सामान्य लक्षणे म्हणजे थकवा, जास्त भूक किंवा तहान लागणे, जास्त लघवी होणे, पायाची जळजळ होणे, दृष्टी अस्पष्ट होणे, श्रम केल्याने धाप लागणे इत्यादी. मधुमेहामुळे डोळ्यांच्या मागील भागावर परिणाम झाल्यास, दृष्टी कमी होऊ शकते आणि कधीकधी अंधत्व येते. हृदयविकाराचा झटके, स्ट्रोक हे पुरुषांमध्ये आणि धूम्रपान करणार्‍यांमध्ये सामान्य. मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो आणि डायलिसिसची आवश्यकता असू शकते. पायांना क्षुल्लक जखम, अल्सर, गॅंग्रिन होऊ शकते. याचा कामावर परिणाम होतो. उत्पादकता कमी होते, खर्च वाढतो. वृद्ध रुग्णांच्या बाबतीत, वेड आणि नैराश्याचे प्रमाण सामान्य आहे. खाण्याची कमकुवत सवय आणि औषधांचे योग्य पालन न केल्याने हायपोग्लाइकेमिया आणि फॉल्स होण्याचा धोका वाढतो.
मधुमेह झालेल्या माणसाचे वजन कमी होते. याचे कारण असे की, जेव्हा मधुमेह असतो, तेव्हा शरीरातील इन्सुलिन कमी होते. आपण साखर पचवू शकत नाही. ती रक्तामध्ये राहते आणि आपल्या लघवीमधून बाहेर जाते. शेवटी आपल्या सर्व कॅलरी गमावल्याने वजन कमी होते. मधुमेहावर उपाय नाही. काही प्रकरणांमध्ये, स्टेम सेल थेरपी, आयलेट सेल ट्रान्सप्लांट आणि एसपीके (एकाचवेळी पॅनक्रिएटिक किडनी) प्रत्यारोपणाचा प्रयत्न केला जातो. परंतु, या प्रक्रियेनंतर रोगप्रतिकारक शक्तीसाठी अतिरिक्त औषधे घ्यावी लागतात.
(लेखिका हेल्थवे इस्पितळात काम करतात.)