काँग्रेसकडून देशाला तोडण्याची चाल

पंतप्रधान मोदी गोव्यात बरसले : विरियातोंच्या वक्तव्य‍ावरून पुन्हा हल्लाबोल, सुमारे ५० हजारांची उपस्थिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 12:09 am
काँग्रेसकडून देशाला तोडण्याची चाल

पणजी : काँग्रेसच्या उमेदवाराने संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यातून काँग्रेसचा छुपा अजेंडा उघड झाला आहे. मतांच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस ही चाल खेळत असल्याचा आरोप करीत, भाजप सरकारला तुष्टीकरण नव्हे, तर जनतेचे संतुष्टीकरण करायचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील गोव्याच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सांकवाळ येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांच्यासह मंत्री, आमदार यावेळी उपस्थित होते. सभेला ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती होती.

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी काहीच दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना, केंद्राने भारतीय संविधान गोव्यावर लादल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील सभेत काँग्रेसवर प्रहार केला होता. त्यानंतर गोव्यातील सभेत ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. अखेर मोदींनी सांकवाळमधील सभेतही या वक्तव्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. केवळ व्होटबँक जपण्यासाठी तुष्टीकरण करण्याची चाल काँग्रेसने आखलेली आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांकडून तशा पद्धतीची वक्तव्ये केली जात आहेत. परंतु, देशातील जनतेला काँग्रेसची ही चाल माहीत आहे. त्यामुळे जनताच लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीला धडा शिकवेल, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, गोवा, देशासाठी आपल्याला अजून बरेच काही करायचे आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात केंद्र सरकारने गोव्यातील पायाभूत साधनसुविधांसह पर्यटनाला बळकटी मिळवून दिली आहे. ई टुरिस्ट व्हिझाचा सर्वात जास्त लाभ आज गोव्यालाच मिळत आहे. लोकांची स्वप्ने हाच आपला संकल्प असून, त्यासाठीच आपण दिवस-रात्र काम करीत आहे. गोव्याच्या विकासाचा रथ पुढील काळातही पुढे नेण्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

माझे​ भाग्य गोव्यातच लिहिले जाते! 

माझ्या आयुष्याला गोव्यातूनच टर्निंग पॉईंट मिळाला. मला पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याचा निर्णय भाजपने गोव्यातच घेतला होता. माझे भाग्य गोव्यातच लिहिले जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एक भारत-श्रेष्ठ भारतचे गोवा हे मूर्तिमंत उदाहरण आहे. गोव्यात जितकी भव्य मंदिरे आहेत, तितकेच सुंदर चर्चही आहेत. त्यामुळेच जगभरातील पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात, असेही त्यांनी नमूद केले.


मोदींकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव

‘सबका साथ-सबका विकास’ या घोषणेनुसार केंद्र आणि गोव्यातील भाजप सरकार काम करीत आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता योजनांचा सर्वांना लाभ देणे हेच भाजप सरकारचे ध्येय होते. त्यानुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गोव्यातील शंभर टक्के घरांना शौचालय, वीज, पाणी, गॅस सिलिंडरचा पुरवठा देत सामाजिक न्याय म्हणजे काय हे सर्वांना दाखवून दिले. गोवा आज सर्वच बाबतीत इतर राज्यांसमोरील रोल मॉडेल आहे असे म्हणत, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

गोव्याला लसीकरणात यामुळे प्रथम संधी

गोव्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण झाल्यास पर्यटक विनासंकोच गोव्यात दाखल होतील. त्याचा फायदा गोव्याच्या पर्यटनासह त्यावर चालणाऱ्या व्यवसाय, उद्योगांना मिळेल, याच हेतूने केंद्रातील भाजप सरकारने कोविड लसीकरणात गोव्याला प्रथम संधी दिली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गोव्यात केवळ दोन खासदार आहेत. परंतु, आम्ही कधी निवडणुकांचा विचार केला नाही. विकास आणि जनतेच्या आरोग्याला आम्ही प्रथम प्राधान्य दिले, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा