लोहयुक्त तांदूळ

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
12th October 2019, 11:27 am
लोहयुक्त तांदूळ


-
देशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व गावात जेवणात प्रामुख्याने भात खाल्ला जातो. भातामध्ये (शीत) लोह (लोखंड) या घटकाची कमतरता असते. सिडनी- आॅस्ट्रेलिया येथील शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन केले आहे. भातात लोह, झिंक आणि व्हिटामीनची कमतरता असते. त्यामुळे कायम भातावर भर देणाऱ्या व्यक्तीला अॅनिमिया म्हणजे पंडुरोग होऊ शकतो. समुद्रकिनाऱ्यावरील भागातील शेतजमिनीत लोह असलेले तांदूळ पिकविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ते रुचकर असले तरी पाॅलिश करायला मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे.
जगातील एक तृतियांश लोकांना पंडुरोग असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. त्यामुळे या तांदळांमुळे ही समस्या काही प्रमाणात तरी कमी होईल, असे अनेकांना वाटते. लहानपणीच अ‍ॅनिमिया होतो, तेव्हा बाळाच्या मेंदूची वाढ होत नाही. त्यामुळे तो जरा संथ, आळशी होतो. त्याची प्रतिकार शक्तीही कमी होते. त्याच्या रक्तात हिमोग्लोबीन द्रव्य कमी असते. त्याला पटकन धाप लागते. थकायला होते. कुठल्याही कामात लक्ष लागत नाही.
वर म्हटल्याप्रमाणे, गोव्यासह आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटकात, तामिळनाडू, आसामात, बंगालात भरपूर भातपीक घेतले जाते. ते लोकही भातावरच भर देतात. आंध्रप्रदेशात भाताची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. भाताचे पीक वाढायला हवे, म्हणून नवे बियाणे, खत, पटकन उत्पन्न देणारे भातपीक यावर संशोधन चालू असते. मिठात आयोडीन वापरले जाते, तसे तांदळात लोह असले तर अनेक आजार दूर होतील, असे तज्ञांना वाटते. हे लोह असलेले तांदूळ जगभर पोहोचावेत, यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
(लेखक निवृत्त आरोग्य संचालक आहेत.)