पूर्ववैमनस्यातून कार्मोणा येथे एकावर प्राणघातक सुरीहल्ला; वार चुकवताना छाटली गेली चार बोटे

कोलवा पोलिसांकडून संशयिताला अटक : जखमीवर उपचार सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 09:23 am
पूर्ववैमनस्यातून कार्मोणा येथे एकावर प्राणघातक सुरीहल्ला; वार चुकवताना छाटली गेली चार बोटे

मडगाव : कार्मोणा मारिया गॅलरीनजिक इसाक राऊल या संशयिताने पूर्ववैमनस्यातून रिषभ नाईक याच्यावर सुरीहल्ला केला. जखमी रिषभला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला कोलवा पोलिसांनी अटक करत त्याला  दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इसाक राऊल (२२, रा. आंबेली) व रिषभ नाईक (२२, रा. चौकी, कार्मोणा) यांच्यात पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. रिषभचे मित्र जुल्डो डिकॉस्टा यांनी याप्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार्मोणातील मारिओ गॅलरीनजिक संशयित इसाक याने रिषभ याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी रागावलेल्या राऊल याने रिषभवर सुरीहल्ला केला. राउल याचा वार चुकवण्यासाठी हात पुढे केला असता रिषभ याची चार बोटे छाटली गेली. त्यानंतर संशयिताने रिषभच्या पाठीवरही वार करत घटनास्थळावरून पळ काढला. 

कोलवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. त्यानंतर संशयित राउल याला शोधण्यासाठी पथके पाठवली. संशयित रात्रभर लपून राहून पहाटे पळून जाण्याच्या तयारीत असताना  राऊलला कोलवा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जखमी रिषभ नाईक याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कोलवा पोलिस निरीक्षक सुनील पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा