शीतपित्त : काय खावे, खाऊ नये

Story: डाॅ. विक्रांत जाधव |
12th October 2019, 11:29 am
शीतपित्त : काय खावे, खाऊ नये


-
शितपित्त (पिताम) ही अवस्था कधी आजारामध्ये प्रवेशित होते कळातच नाही. अंगावर सूर्य मावळल्यानंतर लाल गांध्या येतात. खाज सुटते. या गांध्या म्हणजेच शीत पित्त. योग्य आहार घेतल्यास हा आजार लवकर ठीक होण्यास मदत होते
शरद ऋतूमध्ये (ऑक्टोबर) विशेष करून ऋतू सुरु होताना शीतपित्त म्हणजेच अंगावर गाठी येऊन खाज येणे, मोठे चट्टे येणे, अचानकपणे लाली येऊन रेघा येणे असे अनेक व्यक्तींमध्ये दिसून येते. काही वर्षांपूर्वी हा आजार उन्हाळ्यातून पावसाळ्यात प्रवेश करताना तसेच पावसाळ्यातून थंडीत प्रवेश करतानाच होत असे. परंतु, गेल्या दशकात याचे प्रमाण खूपच वाढले असून प्रमुख त्रास देणाऱ्या आजारांमध्ये आज याचा समावेश झाला आहे. ‘allergy’ असे नाव असलेल्या या आजाराचे मूळ खाण्यात आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. बदलत्या वातावरणाप्रमाणे बदलता पथ्यकर आहार ही व्याधी मुळासह नष्ट करण्यास सहाय्य ठरतो. तात्पुरत्या बरे वाटणाऱ्या इतर औषधांना पथ्याची जोड दिल्यास फायदा होतो.
शीत पित्ताच्या रुग्णाने काय खावे?
शीतपित्ताचा त्रास असताना मुगाचे काढण व मसुराची डाळ अत्यंत गुणकारी ठरते. तुरीची डाळ व मटकीसारखी डाळसुद्धा पथ्यकर असून या दोन्हींनीही शीतपित्त वाढत नाही, हे वास्तव. विविध प्रकारच्या दुधाच्या पदार्थांनी शीतपित्त वाढताना दिसून येते. म्हशीच्या दुधाच्या सेवनाने तर वाढतेच. म्हणून गायीचे दूध (अगदी घ्यायचे असेल तरच) सेवन करावे. तुपाचे सेवन मात्र शीतपित्तामध्ये लाभदायी ठरते. जायफळ व केशर ही द्रव्ये शीतपित्त असताना आवर्जून सेवन करावीत. फायदा होतो.
शीतपित्ताचा त्रास असताना जेवणात आले चावून खावे किंवा आल्याचा रस घ्यावा. कांदा कापून त्यावर केवळ मिरपूड टाकून सेवन केल्यास चांगला गुण येतो. आल्याचं व ओल्या हळदीचं लोणचं शीतपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी नियमित सेवन करावे. कारण शीतपित्त हा पुन्हा पुन्हा उद्भवणारा आजार आहे. जेवणातील काही पदार्थांमध्ये चारोळी (श्रीखंडामध्ये केवळ दिसण्यासाठी टाकली जाणारी) टाकून खाल्ल्यास चांगला लाभ होतो आणि शक्तीही वाढते.
जेवणात बांबूच्या कोंबांचे लोणचे शीतपित्त कमी करण्यास मदत करते. भाज्यांमध्ये पडवळ, दोडकी, कारली या भाज्यांचे सेवन विशेष लाभदायी ठरते. चाकवताची भाजी शीतपित्तामध्ये पालेभाज्यांच्या सेवनाची तृप्ती करून देते. शीतपित्त असताना मधाचा उपयोग गुणकारी ठरणारा असून विशेषतः लहान मुलांना दिवसभरात ३ ते ४ वेळा केवळ मध सेवनासाठी दिल्यास गुण येतो. शीतपित्त असताना पाण्यात कडूनिंबाची पानं टाकून ते पाणी सेवन करावे. कडू जिरे पाण्यात उकळून घेऊन ते पाणी दिवसभर सेवन केल्यास चांगलाच फायदा होतो.
डाळिंब, द्राक्ष, आंबा ही चवदार फळे शीतपित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करतात. लिंबाचे सेवन आवर्जुन करावे (लिंबाने शीतपित्त वाढते हा अनेकांचा गैरसमज आहे.) शीतपित्तात सॅलाडमधील काकडी व उकडलेले बिट काळे मिरे टाकून घेतल्यास फायदा होतो. जेवताना पिण्याच्या पाण्यात केवळ लिंबू पिळून ते सेवन केल्यास त्रास कमी होतो. टरबूज हे फळदेखील या अवस्थेत उपयुक्त ठरते.