भारतीय रेडक्राॅस सोसायटी

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
09th November 2019, 10:31 am
भारतीय रेडक्राॅस सोसायटी


-
आंतरराष्ट्रीय रेडक्राॅस सोसायटी ही जगातील सर्वांत मोठी वैद्यकीय सेवा पुरविणारी संस्था. मुस्लिम देशांमध्ये तिला रेड क्रिसेंट असे नाव आहे. भारतात तिची स्थापना १९२० साली झाली. भारतात या संस्थेच्या ७०० हून अधिक शाखा आहेत. जागतिक महायुद्धावेळी या संस्थेने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळेच हजारो सैनिकांचे प्राण वाचू शकले. जगात जेथे जेथे आजाराच्या साथी पसरतात, तेथेही ही संस्था काम करते.
सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही रेडक्राॅस संस्था काम करते. कोणालाही रोग होऊ नयेत, म्हणून उपाययोजना करते. नैसर्गिक संकटे येतात, तेव्हा या संस्थेचे स्वयंसेवक धावून जातात आणि सर्व मदतकार्य करतात. महापूर, त्सुनामी, भूकंप, वादळ वगैरे संकटे येतात, तेव्हा या संस्थेचे स्वयंसेवक तेथे सर्वांत आधी पोहोचतात. जे कोणी संकटात सापडले आहेत, त्यांना सुरक्षित जागी नेतात. दूध, धान्य, पाव, औषधे, पाणी, फळे इत्यादी देतात. इस्पितळे, सरकार, खाजगी संस्था, लहान मुलांच्या संस्था यांच्याकडून वा यांच्यातर्फे आर्थिक मदत गोळा करून ती संकटग्रस्त गरजूंना देतात. लष्कराच्या जवानांची गरज पडली, तर त्यांना ही संस्था तातडीने बोलावते. त्यांच्या सहाय्याने मग मदतकार्य सुरू करते.
युद्ध होते, तेव्हा कमकुवत राष्ट्रांच्या सैनिकांना बलाढ्य सैनिक कैद करतात. त्यांना रेडक्राॅस संघटना मदत करते. त्यांच्या शिबिरांची देखभाल ही संस्था करते. काही वेळा सरकारचे मध्यस्थ म्हणूनही ही संस्था काम करते. परस्परांतील सामंजस्य, मैत्री, सहकार्याची भावना व टिकाऊ शांतता वाढविण्यास चालना देणे हे त्यांचे प्रमुख काम.
देश, वंश, धर्म, श्रद्धा, वर्ग, लिंग, जात वा राजकीय मतप्रणाली यानुसार भेदभाव न करणे. दुःखद बाबींना अग्रक्रम देऊन हालअपेष्टा कमी करण्यास हातभार लावणे. संघर्षाच्या वेळी कोणा एकाची बाजू न घेणे, तसेच कोणत्याही राजकीय, वांशिक, धार्मिक अथवा मतप्रणाली विषयक वादग्रस्त बाबतीत स्वतःला गुंतवून न घेणे. ही संघटना स्वयंस्फूर्तपणे मदत करणारी असल्याने कोठल्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता काम करणे. एका देशात एकच रेडक्रॉस संस्था असू शकते. ती त्या देशातील सर्वांना खुली असते आणि तिने संपूर्ण देशभर आपले मानवहितवादी कार्य केले पाहिजे.