भयानक रेबिज

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
17th August 2019, 10:59 am
भयानक रेबिज

गेल्या सप्ताहात आपण रेबिज या रोगाविषयी जाणून घेतले. यावेळी या भयानक रोगाची पुढील माहिती घेऊ. कुत्रा चावल्यावर जखम झाली की शक्यतो तिच्यावर टाके घालू नयेत. म्हणजे ती जखम शिवू नये. जखम मोठी असल्याने जर शिवावीच लागली तर जखमेच्या भागावर रेबिज इम्नोग्लोबिन हे इंजेक्शन टोचून घ्यावे व नंतरच टाके घालायला सांगावेत. अर्थात हे सर्व काम डाॅक्टर करतात.
जर जखमेवर टाके घातले तर रेबिजची भीती जास्त वाढते. इम्नोग्लोबिन इंजेक्शन न देता जर जखम शिवली तर प्राणावर बेतू शकते. त्यामुळे जखम उघडी ठेवणे केव्हाही चांगले. कुत्रा चावल्याने झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवायला हवी. त्यावर जंतूनाशक औषध लावायला हवे. डॅटोल, सावलोन चालते. फेणीही लावली तर चालते. त्यामुळे घाव, जखम लवकर भरून येते.
रेबिज झालेल्या वा होऊ शकेल असे वाटणाऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला रेबिज होऊ शकतो का, हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न. रेबिज झालेल्या व्यक्तीच्या लाळेत ते जंतू असतात. पण लाळेमुळे एकाचा रेबिज दुसऱ्याला झाल्याची उदाहरणे फारशी नाहीत. रेबिज झालेल्या व्यक्तीचे अवयवदान केल्याने ते रोपण केलेल्या व्यक्तीला रेबिज झाल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा डाॅक्टर कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक करतात. रेबिज झालेल्या व्यक्तीच्या लाळेतून रेबिज पसरल्याची उदाहरणे नसली तरी त्याच्या लाळेशी संबंध येऊ देणे योग्य नव्हे. आलाच तर जंतूनाशक औषधांनी आपले हात स्वच्छ धुवावेत.
घरात कुत्रा पाळणाऱ्यांनी त्याची काळजी घ्यायला हवी. त्याला जखम होऊ देता कामा नये. त्याला वेळोवेळी औषधे, इंजेक्शने द्यावीत. भटक्या कुत्र्यांना कुणी वाली नसतो. त्यामुळे त्यांना रेबिज होतो. पालिका, पंचायत वगैरेंनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा. मात्र, या पातळीवर फारसे उत्साहवर्धक वातावरण नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. (क्रमश:)

(लेखक निवृत्त आरोग्य संचालक आहेत.)