डेंग्यूपासून सावधान

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
14th September 2019, 11:35 am
डेंग्यूपासून सावधान


जगात सर्वाधिक लोक हिंसाचारामुळे, दहशतवादामुळे मरतात, असा एक समज आहे. काही प्रमाणात ते खरे आहे. पण, त्यापेक्षाही जास्त लोक मरतात, ते डास चावून झालेल्या आजारांमुळे. मलेरिया, डेंग्यू हे रोग सर्वांत जास्त पसरतात. आज डेंग्यूविषयी पाहू.
हा रोग व्हायरस जातीच्या रोगजंतूंपासून होतो. ते डासांद्वारे पसरतात. अॅडिस इजिप्ती हे त्या डासांचे नाव. ते फक्त दिवसाच चावतात. स्वच्छ पाण्याच्या साठ्यात ते अंडी घालतात. टायर, बाटल्या, नारळाच्या करवंट्या, कच्चे फुटलेले नारळ, डबे वगैरे घरासभोवती पडलेले असतात. पावसाच्या दिवसात त्यात पाणी साठून राहते. त्यात हे डास अंडी घालतात. अल्पावधीत त्यातून हजारो डास निर्माण होतात.
डेंग्यूवर रामबाण औषध नाही. तरीही हा तसा जीवघेणा आजार नाही. या आजारावर एक लस तयार करण्यात आली होती. तिचा उंदरांवर प्रयोग करण्यात आला होता. तो यशस्वीही झाला होता. मात्र, ती लस खर्चिक असल्याने तिचा फारसा प्रचार व प्रसार झाला नाही. डेंग्यू झाला ते कसे ओळखायचे? त्याची काही लक्षणे आहेत. ताप येतो. अनेकदा हुडहुडी भरून ताप येतो. सांधे दुखतात. उभे राहणे त्रासदायक होते. हात - पाय कापतात. उभे राहिल्यास घेरी आल्यासारखी वाटते. ओकारी येते, घसा सुकतो. खोकला येतो.
बाहेर मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा हा आजार होतो. त्यामुळे मे सुरू झाला की घराच्या सभोवती असलेल्या अडगळीच्या वस्तू नष्ट करायला हव्यात. खास करून टायर, डबे, करवंट्या वगैरे. पावसाळ्यातही अंगणात, परसात, मागील दारी फिरून डबे, करवंट्या नाहीत ना, तेही पाहायला हवे. बांंधकामाच्या जागी या वस्तू हमखास असतात. तसेच नवे छप्पर (बेथो) घट्ट व्हावे म्हणून टेरेसवर पाणी साठवून ठेवले जाते. तेथे हे डास हमखास अंडी घालतात. त्यामुळे हे पाणी तपासून बदलायला हवे.
डेंग्यूचे प्रमाण आपल्या गोव्यात तसे कमीच आहे. पण तरीही लक्ष ठेवायला हवे. कारण हे आजार पसरायला वेळ लागत नाही. आठवड्याच्या आत डेंग्यू गावभर पसरू शकतो. आपण सारेकाही आरोग्य खात्यावर सोपवून गप्प राहतो. पालिका, पंचायतींचीही तेवढीच जबाबदारी आहे. तसेच जागृत नागरिकांनीही कुठे पाणी साठलेले नाही ना, हे पहायला हवे. गरज पडल्यास आवश्यक उपाय घ्यायला हवेत. तेव्हाच हा डेंग्यूचा राक्षस नष्ट होईल.
(लेखक निवृत्त आरोग्य संचालक आहेत.)