बहुगुणी डाळिंब

Story: माया भाटकर |
14th September 2019, 11:38 am

निसर्गाने विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त अन्नद्रव्यांचे भांडारच भरलेले आहे. भरपूर आणि नियमितपणे फळांचे सेवन केल्यास केवळ आरोग्यच नव्हे, तर सौंदर्यवर्धन होण्यास उपयोगच होतो. सामान्यपणे असा सल्ला सर्वच डॉक्टर त्यांच्या रुग्णांना देतात. मग आपण का फळे खाण्यात कंजूषी करायची?
दररोज सर्वच प्रकारची फळे खाणे शक्य नाही. ऋतूप्रमाणेच ती सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आपला देखील तसा आग्रह नसावा. सतत वेगवेगळी फळे खाल्ल्याचा फायदा जास्तच, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बाजारामध्ये डाळिंब हे सर्वांच्या आवडीचे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याला इंग्रजीमध्ये ‘पॉमेग्रेनेट’ असे म्हणतात. या डाळिंबाची आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने फायदा काय ते पाहू.
आरोग्यासाठी महत्त्वाचे असे अनेक औषधी गुण डाळिंबामध्ये आहेत. डाळिंबाचा रस पितक्षमक आहे. या फळाचे सेवन केल्यास अपचन दूर होते. कावीळ झालेल्या व्यक्तींसाठी हे एक चांगले औषध. डाळिंबाचा रस, मध, साखर यांचे चाटण दिल्यास लहान मुलांचा खोकला बरा करतो. आवाज बसल्यास तो सुधारण्यास डाळिंब मदत करते. त्याच्या रसरशीत बियांमध्ये अँटी ऑक्सिडंटस आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे डायरीया, तोंडाचा आणि घशाच्या अल्सरवर चांगला उपाय आहेत. हृदयाच्या अारोग्यासाठी डाळिंबाचा रस अतिशय उपयुक्त असल्याचे तज्ञ सांगतात. हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. काॅलेस्ट्रॉलवर डाळिंब नियंत्रण ठेवत असल्याच्या नोंदी संशोधकांनी केल्या आहेत. डाळिंबामधील औषधी गुण कर्करोग आणि मधुमेहासारख्या दुर्धर रोगांपासून दूर राहण्यासाठी उपकारक आहेत. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारक आहे. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये डाळिंबाच्या रसाचा वापर करतात. संतुलित आहारासोबत नियमित डाळिंब खाणाऱ्यांची त्वचा नेहमी तजेलदार राहण्यास मदत होते.
(लेखिका विविध विषयांवर लिहितात.)