बारावीचा निकाल आणि सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांचे भवितव्य

गोवा उच्च शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेल्या निकालाने अनेकांना धक्के बसले. खास करून विज्ञान शाखेचा निकाल असमाधानकारक लागल्याचे चित्र पहावयास मिळाले‌. अनेक सरकारी व खाजगी उच्च माध्यमिक विद्यालयांचे निकाल असमाधानकारक लागले. अनेक मुलांची शैक्षणिक टक्केवारी घसरली. यामुळे अनेक विद्यालयांच्या एकूण अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Story: भवताल |
28th April, 06:06 am
बारावीचा निकाल आणि सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांचे भवितव्य

आतापर्यंत ज्या उच्च माध्यमिक विद्यालयांचे निकाल चांगले आलेले आहेत, त्या विद्यालयांचा दर्जा चांगला आहे व त्याच विद्यालयांमधून मुलांचे चांगल्या प्रकारे भवितव्य घडू शकते असा सर्वसामान्यांचा समज आहे. यामुळेच आज चांगल्या निकाल देणाऱ्या विद्यालय समाजाच्या उच्च स्तरावर पोहचलेल्या आहेत. 

शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे. खाजगी व सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यामध्ये निर्माण झालेली स्पर्धा यातून सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांचे भवितव्य अधांतरी दिसत आहे. खाजगी उच्च माध्यमिक विद्यालयांचा साधनसुविधा देण्याकडे असलेला कल, सरकारी विद्यालयांमध्ये आवश्यक असलेल्या साधनसुविधा उपलब्ध न होणे, खाजगी विद्यालयांमध्ये साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागत नाही यामुळे खाजगी विद्यालय या स्पर्धेमध्ये पुढे असलेल्या दिसतात. याचा विपरित परिणाम सरकारी विद्यालयांवर होतो आहे. 

आज गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. मात्र अनेक विद्यालयांमध्ये कायमस्वरूपी शिक्षका अभावी तासिका पद्धतीवर शिक्षण देणाऱ्या अध्यापकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. कायमस्वरूपी शिक्षक हे चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतात व तासिका पद्धतीवर शिक्षण देणारे शिक्षक चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊ शकत नाही असे मानणे बरोबर नाही. वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचा सारासार विचार केल्यास फक्त एक पूर्णवेळ शिक्षक सोडल्यास इतर सर्व शिक्षक हे तासिका पद्धतीवर काम करणारे आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून तासिका पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकाकडून सुद्धा चांगल्या प्रकारचा निकाल आलेला आहे. मात्र रोजगाराच्या बाबतीत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असलेली भीती यावर सरकारने गांभीर्याने व कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण उद्या जर पूर्णवेळ शिक्षकाची नियुक्ती या शाळेमध्ये केली, तर गेल्या पंधरा वर्षापासून तासिका पद्धतीवर प्रभावीपणे काम करणाऱ्या शिक्षकांचे भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण होत असतो. गेल्या पंधरा वर्षापासून तासिका पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकांची वयोमर्यादा आज सरकारी नोकरीसाठी संपलेली आहे आणि यदाकदाचित सरकारने पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती केल्यास या तासिका पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकांचे भवितव्य अधांतरी बनणार आहे. तरीसुद्धा मनामध्ये भीतीचे सावट साठवून आजही तासिका पद्धतीवर शिक्षक चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहेत. ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. 

पटसंख्येमध्ये सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय कमी पडू लागले आहे. कारण त्याच परिसरामध्ये खाजगी उच्च माध्यमिक विद्यालयांना शिक्षण खात्याकडून मिळणारी परवानगी याचा विचार केल्यास सरकारी विद्यालयांचे भवितव्य अधांतरी बनणार आहे. शिक्षण खात्याची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सांभाळत आहेत. यामुळे अशा सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भवितव्या संदर्भात विचार करताना सरकारने समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कुटुंबाचा विचार करणे गरजेचे आहे. कारण खास करून सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेणारी मुले ही सर्वसामान्य घटकांची आहे. मात्र खाजगी विद्यालयांमध्ये प्रवेश घेणारी मुले ही आर्थिक दृष्ट्या भक्कम कुटुंबातीलच असतात हे नाकारून चालणार नाही. 

गोव्याच्या ग्रामीण भागाचा सारासार विचार केल्यास सरकारी प्राथमिक शाळा असो, माध्यमिक शाळा असो, किंवा उच्च माध्यमिक विद्यालय असो या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून समाजाला आज प्रतिष्ठेची व्यक्तिमत्त्वे बहाल केलेली आहेत. गावातच शिक्षणाची चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण झाल्यामुळे आज सर्वसामान्य कुटुंबाला चांगल्या प्रकारचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली काही प्रमाणात भीतीचे वातावरण बदलणे गरजेचे आहे. खास करून विज्ञान शाखेचा विचार केल्यास सर्वच खाजगी किंवा सरकारी विद्यालयांचे निकाल कमी लागलेले आहेत. स्वतःला शिक्षण क्षेत्रातील नामवंत विद्यालयाचा कित्ता आपल्या पाठीवर गिरविणाऱ्या अनेक खाजगी विद्यालयांचे निकाल सुद्धा झपाट्याने खाली लेले आहेत. 

विज्ञान शाखा हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र निर्माण करणारी आहे. विज्ञान शाखेच्या माध्यमातून आज संशोधन व शास्त्रज्ञ निर्माण करण्याची क्षमता आहे. यामुळे या शाखेच्या संदर्भात पुन्हा एकदा अवलोकन होणे गरजेचे आहे. या संदर्भात अनेकांनी आतापर्यंत आपली मते मांडलेली आहेत. अनेक तज्ञांनी या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे विचार व्यक्त केलेले आहेत. यंदा विज्ञान शाखेचा कमी लागलेला निकाल हा कडक तपासणी किंवा परीक्षा देत असताना मुलांची त्यावेळची मानसिक परिस्थिती हा सुद्धा महत्त्वाचा घटक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. हे बरोबर आहे व मान्य आहे. मात्र सरकारने येणाऱ्या काळात निकालाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण आज मोठ्या प्रमाणात नापास झालेली मुले व कमी लागलेल्या निकालाचे दुष्परिणाम विद्यालयांच्या भवितव्यावर होणार आहेत. 

समाजामध्ये आपली प्रतिमा निर्माण करायची असेल व व्यक्तिमत्त्व निर्माण व्हायचे असेल तर शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. यामुळे या क्षेत्राकडे दुर्लक्ष चालणार नाही. गेल्या पाच वर्षाचा एकूण विचार केल्यास चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन शिक्षण खात्याने खास करून सरकारी विद्यालयांच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे हे नाकारून चालणार नाही. आज सरकार माध्यमातून चालणाऱ्या प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयातील दर्जा कमालीचा बदलू लागलेला आहे. मात्र सरकारी विद्यालयांच्या भवितव्यासंदर्भातही अशाच प्रकारचा गंभीर विचार होणे गरजेचे आहे. त्यांचे भवितव्य अधांतरी बनणार नाही व तासिका पद्धतीवर शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांचा सरकारने त्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आतापर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारचे योगदान शिक्षण क्षेत्राला दिलेले आहे. यामुळे अचानकपणे पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करून पंधरा वर्षापासून महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या शिक्षकावर असलेली टांगती तलवार सरकारने विचारपूर्वक दूर करणे ही काळाची गरज बनलेली आहे.


उदय सावंत, वाळपई