गोमंतकीय ग्रामीण जीवनाचा आलेख : माती आणि माणसे

Story: पुस्तकपरिचय |
21st April, 07:03 am
गोमंतकीय ग्रामीण जीवनाचा आलेख : माती आणि माणसे

ज्याप्रमाणे संध्याकाळ झाल्यानंतर पक्षी आपल्या घरट्याकडे धाव घेतात, त्याप्रमाणेच गावात राहणारा माणूस कितीही झालं तरी गावाकडेच पुन्हा ओढला जातो. शहराकडे कितीही ऐशोआरामाचे जीवन असले, तरी 'गांव सुटंना' ही प्रत्येक ग्रामीण माणसाची भावना असते. गावातील 'माती आणि माणसं' ही ग्रामीण माणसाची ओळख असते. गावाबद्दल वाटणारी आत्मियतेची भावना विविध साहित्यप्रकारांतून आकार घेत असते व आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आधार शोधत राहते. त्या मातीतून जन्माला आलेले तिचे पुत्र तिची अस्मिता जागृत ठेवण्याचे कार्य करतात. गाव म्हटले की, अशा लोकांच्या डोळ्यात दिसणारी या मातीची ओढ विलक्षण असते. प्रा. विनय बापट हे अशातीलच एक! सरांच्या लेखनाला ग्रामीणतेचा अस्सल सुगंध लाभलेला आहे. त्यांच्या लेखनातून ग्रामीणत्त्वाची ओळख होते.

'बागीतलं घर' हे त्यांचे पुस्तक गावातील परिसर, वातावरण आणि घरातील माणसे यांची ओळख करून देणारे होते. तर आता प्रकाशित होत असलेले‌ ‘माती आणि माणसं’ हे पुस्तक ही वीण अधिक घट्ट करणारे आहे. सरांचा स्वभाव मिश्किल आहे आणि त्याचा प्रत्यय हे लेखन वाचतानाही येतो. हे पुस्तक वाचत असताना मला पु. ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाची आठवण पुन्हा पुन्हा येत होती. या पुस्तकात आलेल्या प्रत्येक लेखामधून मातीचा ओलावा आणि माणसांच्या मनाला असणारा मातीचा गंधही जाणवतो. 

पहिलाच लेख 'दोन आंबे'. अगदी निरागसपणे हा लेख अनेक गोष्टी चित्रित करताना दिसतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांनाच जी आंबे खाण्याची इच्छा असते, त्या गंमती, त्यात आंब्यांची झाडे लागत नाहीत म्हणून पदरी आलेली निराशा आणि त्यातून केले जाणारे प्रयत्न याचे चित्रण करणारा हा लेख आहे. आपल्या बालपणी आपल्याला आपले आई, वडील, आजी, आजोबा कितीतरी गोष्टी सांगतात. ज्यामधून आपण बरेच काही शिकतो. 'बालपणीच्या गोष्टी' हा त्यांचा लेख म्हणजे लेखकाने आपणाला आपल्या बालपणाची तीव्रतेने करून दिलेली आठवण आहे. लेखकाच्या आईने गोष्टींमार्फत त्यांच्या मनावर नकळतपणे केलेले संस्कार यातील अनेक लेखांमधून दिसून येतात, व्रत वैकल्याच्या गोष्टीतून त्यांना मिळालेली माहिती. त्यांना त्यांचे वडील, इतर नातेवाईक यांनी गोष्टींमधून बरेच काही शिकविले व त्यातूनच त्यांना साहित्याची गोडी निर्माण झाली. पोर्तुगीजांच्या कालखंडातील विषय घेऊन त्यांना अनेकांनी गोष्टी सांगितल्या, त्यात वेगवेगळे आशय वर्णन करून सांगितलेले होते, त्यातूनच कदाचित लेखकाला इतिहासाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. या लेखातून लेखक आपणाला गतकाळाचे दर्शन घडवतो, आपल्या समृद्ध इतिहासाची जाणीव करून देतो. त्यांच्या लेखांमधून सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आधुनिक काळातील वास्तवाशी असणारे संबंध त्यांनी काही लेखांमधून नेमकेपणाने व्यक्त केले आहेत.

त्यांच्या लेखांमधून विविध सणांचे, वृक्षांचे, वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे, आताचे सण वा त्यातील आनंद याची तुलना केलेली आहे. विचार करायला भाग पाडणारे असे काही लेख आहेत. या पुस्तकातील शेवटचे अकरा लेख ही अत्युत्तम अशी व्यक्तिचित्रे आहेत. त्यात 'आठवणी भाईंच्या' हा लेख खूपच सुंदर झाला आहे. ‘भाई’ म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर! त्यांच्याच आठवणी त्यांनी या लेखात सांगितलेल्या आहेत. त्यांचे कार्य, त्यांचे कौटुंबिक जीवन, संघटनेचे काम करताना, लेखकाचा त्यांच्याशी आलेला संबंध, इत्यादी विषय त्यांनी आत्यंतिक जिव्हाळ्यांने या लेखातून मांडलेले आहेत.

 विश्वास, नाते, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम इत्यादींची सांगड घालत त्यांनी माणसांचे व्यक्तिगत आयुष्यही या लेखांच्या मार्फत रेखाटलेली आहेत. ‘काशीचा भट’ सारखे व्यक्तिचित्र आतून आपण एका वेगळ्याच माणसाला भेटत आहोत असे वाटते. जिवंतपणे त्या व्यक्तिंना आपल्यासमोर शब्दांच्या माध्यमातून उभी करण्याची लेखकाची शैली अद्वितीय म्हणावी अशीच आहे. या सगळ्या गोष्टी वर्णन करत असताना आताच्या काळातील त्याच्याशी असणारा संबंध, वेगळेपणा, जीवनशैली, सामाजिक भान, राजकीय भान, स्वानुभव, कौटुंबिक नातेसंबंध, माणुसकी, यांचे विशेष सांगताना, गांभीर्य, भावुकता, गंमत या सगळ्याचा मिलाफ त्यांच्या लेखांमधून जाणवतो. आजच्या घडीला समाजजीवनात जी कमतरता व ताणतणाव जाणवतात त्याच्याविषयी लेखक आपल्या लेखांमधून मतप्रदर्शन करतात. 

'आई' या लेखातून त्यांनी आईचा संघर्ष, तिचे प्रेम, तिची स्वभाव वैशिष्ट्ये, कोणत्याही संकटावर मात करण्याची तिची वृत्ती, तिची कष्टाची कामे, काळाबरोबर बदलणारी त्यांची आई, तिचे वर्णन, इत्यादी व तिचे मूर्त स्वरूप त्यांनी लेखातून व्यक्त केलेले आहे. या लेखातून लेखकाला आपल्या आईबद्दल वाटणारा आदर व तिच्याबद्दलची प्रेमभावना, ओढ दिसते. 

'वाटा' या लेखातून जगण्यातील वास्तव जे काहीसे  कटू आहे  असे ‘कटूसत्य’ सांगण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. बालपणातील त्यांच्या गोष्टी व आताच्या काळात, या वयात त्याचे जुळणारे संबंध त्यांनी लेखातून व्यक्त केलेले आहेत. 

त्यांचा प्रत्येक लेख हा निसर्गाचा माणसाशी असणारा संबंध, माणसाच्या मनातील भावभावनांचे चित्रण, आताच्या काळातील व लेखकाच्या बालपणीच्या काळातील गोष्टींचे असणारे संदर्भ व त्याची तुलना, प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या आयुष्यात असणारे स्थान या सर्व गोष्टींचे दर्शन घडवितात. या ठिकाणी मी त्यांच्या सर्वच लेखांविषयी सांगितलेले नाही कारण जर सगळ्याच लेखांवर भाष्य केले तर हे पुस्तक वाचण्याचा अनुभव घेता येणार नाही. हा लेख संग्रह म्हणजे लेखकाला जवळून जाणून घेण्याची संधी आहे. बालपणीच्या काळातील प्रसंगांमधून त्यांचे घडलेले वर्तमान हा या लेख संग्रहाचा गाभा आहे. आजच्या तरूण पिढीने तर अगदी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. सरांना भावी लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.


सायली रामकृष्ण गर्दे, डिचोली