लँडस्केपमध्ये वसलेलं पुनाखा

आम्ही या नयनरम्य ठिकाणाला जाताना, इथल्या डोंगराळ दऱ्याखोऱ्यांमधून प्रवास करत असता, आमच्या लक्षात आलं की हा प्रदेश खरंच किती सुंदर आहे. धरतीला आलिंगन द्यायला उतरून आलेले ढग आमच्या प्रवासाला अधिक जादुई बनवत होते.

Story: प्रवास |
28th April, 06:04 am
लँडस्केपमध्ये वसलेलं पुनाखा

भूतानच्या शांत लँडस्केपमध्ये वसलेलं पुनाखा, त्याच्या मोहक दृश्य आणि समृद्ध इतिहासामुळे प्रसिद्ध आहे. आम्ही या नयनरम्य ठिकाणाला जाताना, इथल्या डोंगराळ दऱ्याखोऱ्यांमधून प्रवास करत असता, आमच्या लक्षात आलं की हा प्रदेश खरंच किती सुंदर आहे. धरतीला आलिंगन द्यायला उतरून आलेले ढग आमच्या प्रवासाला अधिक जादुई बनवत होते. त्यामुळेच की काय पण आतापर्यंत पाहिलेलं भूतान आणि आता पाहत असलेल्या भूतान या मध्ये खूप फरक जाणवत होता. ह्या सृष्टीसौंदर्याने आम्हाला भुरळ पाडली होती. 

भूतानमध्ये पुनाखा व्हॅली भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. लाल आणि पांढरा तांदूळ पो चू आणि मो चू ह्या नद्यांच्या खोऱ्यात उगवले जातात. रित्शा (म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी) हे पुनाखा मधील एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. इथे शेती मोठ्या प्रमाणात चालते. आम्ही वाटेत थांबून इथली शेतं पाहिली. आजूबाजूची घरं दगडी पायासह लाकडाने बांधलेली होती. जिथे राहणार होतो ते देखील एक फार्म हाऊस होतं. त्यामुळे आतून ही घरं कशी असतात ह्याचा उलगडा आता काही वेळातच होणार होता. 

आम्ही इथे होम-स्टे बुक केला होता. हॉटेलमध्ये न राहता एखाद्या भुतानी घरात एक दिवस राहावं, असा विचार करुन आम्ही आमच्या ट्रॅव्हल कंपनीला अगदी गळ घालून इथे उपलब्ध असलेलं एकमेव फार्महाऊस बुक केलं. पूनाखाची डोंगराळ वाट संपली तशी आमची गाडी रस्त्याच्याकडेला जेवणासाठी थांबली. उतरून आम्ही एका बारीक रस्त्याने ताशीने दाखवलेल्या हॉटेलकडे गेलो. गरमागरम जेवण जेवलो. इथलं जेवण भारतीयांना आवडेल असं चमचमीत नि तिखट. पोट पूजा झाल्यावर त्याच हॉटेलच्या शेजारी असलेली काही दुकानं पाहिली. वस्त्र महाग, पण दागिने त्या मानाने स्वस्त. असं आहे भूतान! आम्ही फक्त आठवणीसाठी फ्रीज मॅग्नेट्स घेतली. 

गाडीत बसताना मी ताशीला “अजून किती दूर आहे आमचं फार्म हाऊस?” असं विचारणार तोच ताशी दूरवर (आणि उंचावर!) बोट दाखवत “ते बघा तुमचं फार्महाऊस” असं म्हणाला. मुख्य रस्त्यापासून बरेच दूर होते. पण अर्ध्यावर गाडी गेली आणि उरलेली वाट अगदी जंगली! गुरा ढोरांना ओलांडून पायी चालत चालत आम्ही आमच्या ह्या भुतानी घरी पोहोचलो.

घर एकदम सुंदर. निसर्गाच्या कुशीत लपलेले. मातीच्या पायऱ्या चढत चढत आम्ही गेटकडे पोहोचलो. गेट उघडताच आत उघडी चौकट आणि बसण्याची सोय होती. दमलेल्या पायांनी लगेच खुर्ची शोधली आणि डोळे मात्र कौतुकाने ह्या घराचे सौंदर्य साठवण्याच्या कामात व्यस्त झाले. फार्महाऊसच्या मालकीणबाई आदरातिथ्य करण्यात पटाईत निघाल्या. एकही हिंदीचा (नि इंग्रजीचा) शब्द न बोलता येणाऱ्या मालकीणबाई पाहुण्यांच्या स्वागतासाठी चहा न्याहारी घेऊन सज्ज होत्या. ‘बटर टी’ ही इथली खासियत. चहाच्या ऐवजी मालकीण बाई हे नवं पेय देऊन गेल्या होत्या. मिठाची चव असलेला बटर टी मला घश्याखाली घालवेना. त्यामुळे मी तो तसाच सोडला. 

काही काळाने मालकीणबाईंनी आमचं सामान वरच्या खोल्यांवर ठेवून घेतलं. त्यांचे मिस्टर मिश्र हिंदी इंग्रजी बोलत होते. ते आम्हाला वरती घेऊन गेले आणि खोल्या चावीसकट आमच्या ताब्यात करून “जेवायचं खाली, आमच्याबरोबर, ८ वाजता” असं आम्हाला सांगून मग तिथूनच ओरडून मालकीणबाईंना देखील आठवण करून, आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले. 

क्रमशः


भक्ती सरदेसाई