प्लास्टिक वापर टाळूया, वसुंधरेचे रक्षण करूया

भारतात दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जातो. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन' म्हणूनही ओळखला जातो. जैवविविधतेचे संवर्धन करणे व पृथ्वीचे संरक्षण करणे ही कुणा एकट्याची जबाबदारी नसून प्रत्येकाची जबाबदारी आहे याची आठवण करून देण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो.

Story: साद निसर्गाची |
21st April, 05:59 am
प्लास्टिक वापर टाळूया, वसुंधरेचे रक्षण करूया

थ्वीला सजीवांची जीवनदायिनी असे म्हटले जाते. प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी लागणारी सर्व नैसर्गिक संसाधने पृथ्वी पुरवत असते. मग ती प्राणवायू देणारी झाडे असो किंवा अन्न, वस्त्र, निवारा पुरवणारी इतर संसाधने. आपल्याला प्रत्येक गरजेची वस्तू पुरवण्याचे काम वसुंधरा करत असते. तथापि, सद्यस्थितीत ज्या पद्धतीने आवश्यक नैसर्गिक संसाधने शोषून घेतली जात आहेत ते पाहता ही नैसर्गिक संसाधने वेळेपूर्वी संपुष्टात येण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत मानवालाच नव्हे तर पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाला पृथ्वीवर टिकून राहणे कठीण होईल. ही समस्या सोडवण्यासाठी निसर्गाने दिलेल्या गोष्टींचे संवर्धन करण्याची गरज आहे.

भारतात दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जातो. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन' म्हणूनही ओळखला जातो. जैवविविधतेचे संवर्धन करणे व पृथ्वीचे संरक्षण करणे ही कुणा एकट्याची जबाबदारी नसून प्रत्येकाची जबाबदारी आहे याची आठवण करून देण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. वाढते प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, जंगलतोड, वाढते तापमान, नैसर्गिक संसाधनांमध्ये होणारी घट यासारख्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकून माणसाला शाश्वत विकासाचे मार्ग अंगीकारण्यास प्रवृत्त करण्यासाठी वर्ष १९७० पासून पर्यावरणतज्ञ गेलॉर्ड नेल्सन यांनी हा उपक्रम सुरू केला. यावर्षीचा वसुंधरा दिवस "ग्रह विरुद्ध प्लास्टिक" या थीमखाली साजरा केला जाणार आहे. सजीवांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक प्रदूषण किती हानीकारक आहे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही थीम निवडण्यात आलेली आहे. २०२४ सालाच्या अखेरीस प्लास्टिकवर संयुक्त राष्ट्रसंघाचा ऐतिहासिक करार लक्षात घेऊन ही थीम निवडण्यात आली आहे. एकल-वापर प्लास्टिकचा वापर त्वरीत बंद करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधून काढणे हा ह्यामागील उद्देश आहे. 

प्लास्टिक हा विनाशकारी राक्षस फक्त हवा व पाणीच नव्हे तर पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी या सर्व पंचमहाभूतांना आपल्या विळख्यात ओढतो. खूप दिवस जमिनीवर एकाच ठिकाणी पडून राहिलेले प्लास्टिक त्या जागेवरची माती नापिक बनवते. पिण्याचे पाणी प्लास्टिक बाटली किंवा पेल्यामधून पिल्यास कॅन्सर सारखे आजार होण्याची भीती असते. विल्हेवाट लावण्याच्या हेतूने जाळलेले प्लास्टिक हवा प्रदूषित करते. अर्धवट जळालेले प्लास्टिक पावसाळ्यात नद्या, समुद्रात वाहून गेल्यामुळे जलचर प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कालांतराने हे प्लास्टिक कणांच्या स्वरुपात जमिनीत झिरपून पाण्याचे स्रोत दूषित करते. 

संयुक्त राष्ट्र पर्यावरण प्रोग्रामनुसार माणूस वर्षाकाठी जगभरात 300 दशलक्ष टन प्लास्टिकचे उत्पादन करतो. त्यापैकी निम्मे प्लास्टिक एकल वापर (single-use) वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते. एकल वापर प्लास्टिक हे मुख्यत्वे जीवाश्म इंधनावर आधारित रसायनांपासून (पेट्रोकेमिकल्स) बनवले जाते. वापरात आणल्यानंतर लगेच विल्हेवाट लावल्या जाणाऱ्या प्लास्टिकला एकल वापर प्लास्टिक असे म्हणतात.

आपल्या घरातील ११ टक्के कचरा हा प्लास्टिक कचरा असतो. त्यातील ४० टक्के प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करता येतो. सध्यस्थितीत जवळपास ५० टक्के प्लास्टिक एका वापरानंतर फेकून दिले जाते. कच्चा माल वापरुन नवीन प्लास्टिक तयार करण्यापेक्षा प्लास्टिकचा पुनर्वापर केल्यास ८८ टक्के कमी ऊर्जा लागते असे संशोधन सांगते. एका प्लास्टिकच्या बाटलीचा पुनर्वापर करुन वाचवलेल्या ऊर्जेवर १००-वॅट बल्ब जवळजवळ एक तास चालू शकतो. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या हाताळण्यासाठी आणि एकल वापराच्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी अभिनव विचार, नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देणे अनिवार्य आहे. 

या वसुंधरा दिनी आपण एकल वापर प्लास्टिकचा वापर कमी करण्यासोबत प्लास्टिकचा पुनर्वापरावर करण्यावरही भर देऊया. प्रदुषणकारी ऊर्जा स्रोतांवर चालणारे अनावश्यक दिवे बंद करूया. जैवविविधतेचे संवर्धन करुया. सेंद्रिय शेतीवर भर देत मातीची सुपिकता टिकवून ठेवूया. भूमिगत पाण्याचे स्रोत जिवंत ठेवण्यावर भर देऊया. घराशेजारी आणि जवळपासच्या भागात झाडे लावून तापमान वाढ आटोक्यात आणण्यासाठी झटुया. नद्या, समुद्र, ओहोळ प्लास्टिकमुक्त करुन पाण्याचे प्रदूषण रोखुया. 

"नाही झाले जर प्लास्टिक नष्ट, श्वास घेण्यास होतील कष्ट प्लास्टिक करी पर्यावरणाचे भक्षण चला करू वसुंधरेचे रक्षण”


स्त्रिग्धरा नाईक