लोकसभेचा प्रचारः आरोपांच्या फैरी आणि शब्दांचा खेळ...

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर, राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आणि त्यानंतर एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले. राजकीय पक्षांपेक्षा उमेदवारांवर वैयक्तिक आरोप जास्त होत आहेत. या निवडणुकीत समाज, धर्म याचा फायदा उठवण्यासाठी दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोणाला आपल्या बाजूने कसे आकर्षिक करायचे त्याचा पुरेपूर अभ्यास राजकीय पक्षांनी केलेला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मते मिळवण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातील.

Story: उतारा |
21st April, 05:14 am
लोकसभेचा प्रचारः आरोपांच्या फैरी आणि शब्दांचा खेळ...

गोव्यात लोकसभा मतदानाला १७ दिवस राहिले आहेत. ७ मे ला मतदान होईल. तोपर्यंत निवडणुकीत उतरलेल्या महत्त्वाच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहतील. २०२२ च्या निवडणुकीनंतर आणि काँग्रेसमधून फुटून आठ आमदार भाजपात गेल्यानंतर काहीकाळ भाजप, आप, काँग्रेस आणि आरपीजीमधील आरोपांचे युद्ध थांबले होते. विधानसभा अधिवेशनाच्या काळात काही दिवस एकमेकांवर तोंडसुख घेतले जायचे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर, राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आणि त्यानंतर एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले. राजकीय पक्षांपेक्षा उमेदवारांवर वैयक्तिक आरोप जास्त होत आहेत. काहीच मिळत नसल्यास जुन्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टींवरून एकमेकाला टार्गेट केले जात आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कोण कसा फायदा उठवेल ते सांगता येत नाही. 

एका आमदाराला विरोधी पक्ष नेत्यांनी 'लापीट' म्हटल्यामुळे भंडारी समाजाची एक युवा समिती आमदाराच्या समर्थनात पुढे आली. सत्ताधारी पक्षानेही त्यांची भूमिका योग्य म्हणत विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्यावर टीका केली. भाजपने समाजाची तळी उचलून धरण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार केविलवाणा होता. कारण रुद्रेश्वर किंवा भंडारी समाजाच्या कुठल्याच गोष्टीवेळी ही समिती पुढे आली नाही. आलेमाव यांनी कुठल्याच समाजाचा उल्लेख केलेला नव्हता. एका पक्षाचा आमदार म्हणून त्यांनी टीका केली होती. समाजाचा कुठेच उल्लेख नसताना त्या नावाने पोळी भाजण्यासाठी अचानक ही समिती प्रकट झाली. युरी आलेमाव यांनी आमदार जीत आरोलकर यांना उद्देशून लापीट शब्दाचा वापर केला होता. अनेकांना तो असंसदीय वाटत असला तरी कोकणीच्या शब्दकोशात त्याचा अर्थ आक्षेपार्ह नाही. चतुर, चपळ, जलद, बेरकी, चलाख, तरबेज असा त्याचा अर्थ निघतो. मूळ पोर्तुगीज असलेल्या या शब्दाचा मूळ अर्थ थोडा अस्वीकृतीचा असला तरी कोंकणीत हा शब्द आता वेगळ्या अर्थाने प्रचलित झाला आहे. त्यामुळेच त्याला शब्दकोशातही स्थान मिळाले. त्यात आक्षेप घेण्याइतके काही नव्हते. आपल्या समाजातील आमदाराला काही म्हणाल तर खबरदार असे सांगण्याचा प्रयत्न या युवकांनी केला. या युवकांचा हा वेडपटपणा पाहिला की, असे युवक आपापल्या समाजातील आमदारांना घोटाळे करू नका, गोव्यातील जमीन बाहेरच्यांना विकू नका, गैरकाम करू नका असे का सांगत नाहीत असा प्रश्न पडतो. आपल्या आमदारांना मंत्रिपद मिळावे म्हणून ते सत्ताधारी पक्षाशी कधी भांडताना दिसत नाहीत. हेच ते लोक ज्यांचा निवडणुकीत अगदीच सहज वापर होत असतो. ही गोष्ट या युवकांनीही समजून घ्यायला हवी. या निवडणुकीत समाज, धर्म याचा फायदा उठवण्यासाठी दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोणाला आपल्या बाजूने कसे आकर्षिक करायचे त्याचा पुरेपूर अभ्यास राजकीय पक्षांनी केलेला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मते मिळवण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातील. म्हापसा बँक आता कालबाह्य झाली. एक काळ या बँकेचाही होता. जिथे राष्ट्रीय बँका लोकांना दारात उभे करून घेत नव्हत्या तिथे म्हापसा अर्बन, मडगाव अर्बन सारख्या बँकांनी गोव्यातील सर्वसामान्यांना कर्ज देऊन मदत केली. त्या बँका वाचवण्यासाठी राज्य सरकारने कधीच प्रयत्न केले नाहीत. त्या आता बंद पडल्या. म्हापसा बँकेचे खापर निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्यावर फोडण्याचे प्रयत्न होत आहेत. आपण बाजूला राहतो पण बँक वाचवा असे खलपांनी मागे सरकारला सांगितले होते पण ती बँक वाचवता आली नाही. हा विषय जुना झाल्यामुळे त्याचा प्रचारावर मोठा परिणाम होणार नाही हेही महत्त्वाचे. खलपांनी म्हापसा बँकेत आपले पैसे ठेवले नाहीत असेही आरोप होत आहेत. या पूर्वीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात खलपांच्या काही ठेवी म्हापसा अर्बन बँकेत असल्याच्या नोंदी सापडतात. श्रीपाद नाईक यांनी काही घोटाळा केला असा आरोप होत नाही, इतक्या वर्षांमध्ये गोमंतकीयांचे प्रश्न मांडता आले नाहीत किंवा त्यांनी गोव्यातील लोकांसाठी फार काही केले नाही असे मात्र आरोप होत आहेत. भंडारी समाजाच्या एका गटानेही त्यांच्यावर तोंडसुख घेतले. या सगळ्या गोष्टींचा मतदानावर परिणाम होणार का ते पहावे लागेल. भंडारी समाजातील अनेक नेते हे भाजप, इंडिया गट तसेच आरजीपीकडे काही प्रमाणात विभागून गेले आहेत त्यामुळे भंडारी समाजाचा कोणाला फायदा आणि कोणाला फटका बसतो ते पहावे लागेल.

आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात 'कटप्पा' कोण आणि 'भल्लाळदेव' कोण यावरून सध्या जुंपली आहे. विजय सरदेसाई यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या मदतीने निवडणूक जिंकली आणि सत्ता स्थापन करण्यासाठी पर्रीकरांसोबत जाऊन काँग्रेसच्या पाठीत कसा खंजीर खुपसला त्याची आठवण आता आरजीपीचे आमदार विरेश बोरकर करून देत आहेत. सरदेसाई आताही मनापासून काँग्रेसच्या प्रचारात नाहीत, ते काँग्रेसच्या पाठीत आताही सुराच खुपसतील कारण ते 'कटप्पा' आहेत असा आरोप करून एक खळबळ उडवली. त्याला आरजीपीच्या विकास भगतने प्रत्युत्तर दिले. बोरकर हे 'भल्लाळदेव' आहेत आणि आरजीपी भाजपच्या निर्देशांवर इंडी आघाडीच्या विरोधात काम करत आहे असा आरोप केला. अर्थात आरजीपीने इंडियाशी चर्चा करून जागा वाटप करायला हवे होते अशी काहींची भूमिका आहे. आरपीजीने तसे केले नाही. उलट उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसला मान्य होणार नाहीत अशा अटी घातल्या. त्यामुळेच आरजीपी भाजपची बी टीम आहे असा जो आरोप होतो त्याला आणखी बळ मिळाले.

अजून जाहीर प्रचारासाठी १५ दिवस मिळतात. या पंधरा दिवसांमध्ये कुठला पक्ष आघाडी घेतो ते मतमोजणीनंतर कळेल. सध्या उत्तर गोव्यात भाजप विरूद्ध काँग्रेस आणि या दोघांविरूद्ध आरजीपी असा प्रचार सुरू आहे. तळागाळातील प्रचारात भाजप आघाडीवर आहे. भाजपनंतर प्रचारात तरी किमान आरजीपीने आघाडी घेतली आहे असे दिसते. काँग्रेसच्या प्रचारात आता कुठे रंग भरू लागला आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील वातावरण अद्यापही अमुकच उमेदवार जिंकेल असे सांगण्याच्या स्थितीत नाही. दक्षिण गोव्यातही भाजपच प्रचारात आघाडीवर आहे. पक्षाचे कॅडर, बुथ स्तरावरील कार्यकर्ते, पंच, सरपंच, नगरसेवक, आमदार असा मोठा गोतावळा भाजपसोबत असल्यामुळे त्यांच्या प्रचाराची हवा आहे. काँग्रेसच्या प्रचारालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आप, गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसचे आमदार दक्षिण गोव्यातील उमेदवारासाठी दिवसरात्र फिरताना दिसत आहेत. दक्षिण गोव्यात आरजीपी मात्र प्रचारात फार पुढे आहे असे दिसत नाही. तेथील लढत भाजप विरूद्ध काँग्रेस अशीच थेट होऊ शकेल पण आरजीपी किती मते मिळवते त्यावर जिंकणारा उमेदवार ठरेल. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कोण कोणाची बी टीम याचा एक साधारण अंदाज येईल. कोण कोणाच्या प्रचारात मनापासून होते किंवा कोणाला कुठे किती मतांची आघाडी मिळाली ते स्पष्ट होईल. भाजपचा प्रयोग यशस्वी ठरतो की, सासष्टी पुन्हा काँग्रेसलाच झुकते मात देऊन विजयाचा मार्ग सुकर करते ते ४ जून ला कळेल.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.

९७६३१०६३००