विद्यालयाची प्रतिमा डागाळणारे प्रकरण

अनेक संस्थांमध्ये राजकीय शक्ती वावरू लागल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू झालेला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून केंद्रीय मानव संसाधन केंद्राशी संलग्न असलेल्या वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाचा मुद्दा बऱ्याच प्रमाणात गाजतो आहे. खोटी कागदपत्रे तयार करून क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा मुद्दा यावरून पालक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Story: भवताल |
21st April, 05:10 am
विद्यालयाची प्रतिमा डागाळणारे प्रकरण

आज शैक्षणिक स्तरावर अनेक संस्था कार्यरत असून अनेक प्राथमिक, माध्यमिक, किंवा उच्च माध्यमिक अशा विविध शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाज निर्मितीचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शिक्षणातूनच माणसाची शैक्षणिक कुवत सिद्ध होत असते म्हणून शिक्षण क्षेत्र हे पारदर्शक हवे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय अतिक्रमण होऊ नये अशी प्रत्येकाची भावना असते. यामुळे शिक्षण क्षेत्राशी संलग्न असलेल्या संस्थांनी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याबरोबरच मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाचा मानसिक दृष्टिकोन हा शिक्षण क्षेत्राकडे पाहताना निर्मळ असला पाहिजे. मात्र दुर्दैवाने या शिक्षण क्षेत्राला आज राजकीय व भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जवाहर नवोदय ही पूर्णपणे निवासी स्वरूपाची शाळा आहे. या ठिकाणी खास करून आर्थिक स्तरावर कमकुवत घटकांच्या मुलांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होत असते. पाचवी व नववी या दोन वर्गांमध्ये मुलांना प्रवेश दिला जातो. यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करुन प्रवेश घेण्यापूर्वी चाचणी परीक्षा द्यावी लागते ज्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना या मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो. यासाठी अनेक ठिकाणी अनेक केंद्राच्या माध्यमातून चाचणी परीक्षा घेण्यात येत असतात. 

वाळपई जवाहर नवोदय विद्यालय हे उत्तर गोव्याशी संलग्न आहे. उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश दिला जातो. उत्तर गोव्यासाठी वाळपई तर दक्षिण गोव्यासाठी काणकोण असे दोन विद्यालय गोव्यामध्ये कार्यरत आहेत. या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांनी समाजात चांगले नाव कमविलेले आहे. उच्च पदावर ही मुले काम करताना दिसत आहेत. समाजाच्या प्रतिष्ठित पदावर काम करण्याची संधी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली असल्यामुळे या विद्यालयाचा दर्जा उच्च असून एक चांगल्या प्रकारची प्रतिमा या विद्यालयाने निर्माण केलेली आहे. यामुळेच आज या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुलांची स्पर्धा असते. 

मात्र पंधरा दिवसांपासून या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून गोव्याच्या उत्तर भागाव्यतिरिक्त महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षेसाठी खोटी कागदपत्रे बनवण्यात आल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रहिवासी दाखला, प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या मुलांचे प्रमाणपत्र, जन्म दाखला असणे या महत्त्वाच्या अटी असून अटींची पूर्तता करताना ही सर्व कागदपत्रे खोट्या पद्धतीने तयार करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे गोव्यात वास्तव्य करणाऱ्या मुलांचे खोटे रहिवासी दाखले तयार करणे, याच विभागांमध्ये शिक्षण घेतल्याचा खोटे प्रमाणपत्र तयार करणे व जन्म दाखला खोट्या पद्धतीने तयार करून ज्या २५ मुलांना पात्रता नसतानाही या विद्यालयाच्या चाचणी परीक्षांमध्ये बसून त्यांना उत्तीर्ण करण्याचे धाडस करण्यात आले. यामुळे या विभागातील स्थानिक पातळीवरील पंचवीस मुलावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. खोट्या कागदपत्रांनी या स्थानिक मुलांची संधी हिरावून घेण्यात आली. वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या चाचणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर नजर फिरवली तर गोव्यात कधीही अस्तित्वात नसलेली आडनावे यामध्ये प्रकर्षाने दिसतात. यामुळे या प्रकरणांमध्ये कोणकोण गुंतलेले आहेत त्याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केलेली आहे. पालक या संदर्भात बऱ्याच प्रमाणात आक्रमक झालेले असून ही खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी एक टोळी कार्यरत असल्याचे सिद्ध झाले आहे. शिक्षण क्षेत्रातही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची कृती होणे ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. यातून शिक्षण क्षेत्रासंदर्भात असलेला आपला प्रामाणिक दृष्टिकोनाविषयी साशंकता  निर्माण झाल्यास ते वावगे ठरणार नाही. एकूण या प्रकरणासंदर्भात विद्यालयाच्या व्यवस्थापनावरही संशयाचा अंगुलीनिर्देश होताना दिसत आहे. त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय अशा प्रकारे प्रवेश चाचणी परीक्षा देण्याची प्रक्रिया पूर्ण होणे कठीण असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. त्यात काही प्रमाणात सत्यता असण्याची शक्यताही नाकारता येण्यासारखी नाही. कारण ज्यावेळी मुले चाचणी परीक्षेसाठी आपली कागदपत्रे तयार करत असताना व्यवस्थापनाला या संदर्भात संशय येणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष करून या मुलांना चाचणी परीक्षेमध्ये समाविष्ट करून घेणे हे खरोखरच संतापजनक व गांभिर्याची बाब आहे.

वाळपई जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्रीय सरकारशी संलग्न असल्यामुळे या समितीवर उत्तर गोवा जिल्हाधिकारी हा मेंबर सेक्रेटरी असतो. गोवा सरकारला यांचे देणेघेणे नसले तरीसुद्धा गोव्यात हे विद्यालय कार्यरत असल्यामुळे गोव्याच्या शिक्षण खात्याने या संदर्भात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत शिक्षण खात्याने कोणत्याही प्रकारचे योगदान या विद्यालयाशी किंवा या विद्यालयाच्या विकासासाठी दिलेले नाही. ज्यावेळी या विद्यालयाच्या जमिनीचा प्रश्न उभा राहिला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर यांनी या संदर्भात जातीने लक्ष घालून या विद्यालयाला अभय प्राप्त करून दिले होते. गोवा सरकारचा या विद्यालयाशी संपर्क नसला तरीसुद्धा सरकारने या विद्यालयाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या विद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हा गोव्याचा रहिवासी आहे. या विद्यालयाशी माझी कोणतीही जबाबदारी नाही असे म्हणून हात झटकण्यापेक्षा विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी संलग्न असलेल्या प्रत्येक घटकाशी असलेल्या संबंधाचा विचार महत्त्वाचा ठरतो. म्हणूूूूनच सरकारची जबाबदारी महत्त्वाची ठरते. सरकारने हात झटकण्यापेक्षा जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सुरू असलेला सावळागोंधळ रोखण्यासाठी विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे.


उदय सावंत, वाळपई