उत्तरेत तिरंगी, दक्षिणेत दोघांमध्येच लढत

भाजपकडून विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि इंडि आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवारीवर अॅड. रमाकांत खलप आहेत. रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब हे स्वत: निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळेच ही लढत तिरंगी होईल. विद्यमान खासदाराविषयी प्रथमच यावेळी जास्त असंतोष दिसत आहे. विरोधाचे वारे सध्यातरी वेगाने वाहत असले तरी अजूनही मतदानाला बरेच दिवस बाकी आहेत. हे वारे परतून लावण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करेल.

Story: उतारा |
14th April, 06:12 am
उत्तरेत तिरंगी, दक्षिणेत दोघांमध्येच लढत

लोकसभेची निवडणूक आली म्हणजे किमान अमुक उमेदवार जिंकू शकतो, तमुक काठावर जिंकेल असे अंदाज लोक व्यक्त करत असतात. राजकारणात जेव्हापासून अर्थकारणाने प्रवेश केला, तेव्हापासून निवडणुकीचे चित्र शेवटच्या क्षणीही बदलते हे सर्वांनाच माहीत आहे. यावेळी गोव्यात होणाऱ्या निवडणुकीत उत्तर गोव्यात विद्यमान खासदार आणि मंत्री श्रीपाद नाईक यांच्याविरुद्ध माजी केंद्रीय मंत्री आणि तीन-चार वर्षे जुना असलेल्या प्रादेशिक पक्षाचा प्रमुख उतरला आहे. दक्षिण गोव्यात तिन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. राजकीय जाणकार यावेळच्या लढतींबाबत मात्र अजूनही अंदाज बांधू शकत नाहीत, असे राजकीय चित्र राज्यात निर्माण झाले आहे. त्यातच उत्तर गोव्यात भंडारी समाजाने रुद्रेश्वर देवस्थानाच्या वादानंतर नाराज होऊन श्रीपाद नाईक यांना घेरण्याचा प्रयत्न केला. २०१९ च्या निवडणुकीत श्रीपाद नाईक ८० हजार, तर २०१४ मध्ये १.०५ लाख मतांच्या फरकाने जिंकले होते. या दोन निवडणुकांमध्ये त्यांना भरघोस मते मिळाली होती. यावेळी विद्यमान खासदाराविषयी विरोधी लाट असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ही निवडणूक २००९ मधील निवडणुकीतील परिस्थितीची पुनरावृत्ती करू शकते. मी परिस्थितीची पुनरावृत्ती यासाठी म्हटले आहे की यावरून कोणाच्याच बाजूने कौल दिला जात नाही. २००९ मध्ये श्रीपाद नाईक पराभूत होत आहेत अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी ते ६,३५३ मतांच्या फरकाने जिंकले. राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर जितेंद्र देशप्रभू यांनी श्रीपाद नाईक यांना पराभवाच्या अगदीच दारावर नेऊन ठेवले होते. कदाचित ती निवडणूक देशप्रभूंनी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली असती तरीही चित्र वेगळे दिसू शकले असते. अगदी दोन टक्के जास्त मते घेऊन श्रीपाद नाईक जिंकले. विशेष म्हणजे २००९ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांवरील उमेदवार प्रत्येकी ८,६४६ आणि ६,६३८ मतांवर होते. २०१४ साली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांचे उमेदवार प्रत्येकी १५,८५७ आणि ५,६४० मतांपर्यंत थांबले. २०१९ मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा उमेदवार ४,७५६ मतांपर्यंत येऊन थांबला होता. त्यामुळे उत्तर गोव्यातील गेल्या तिन्ही वेळच्या निवडणुका भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांच्या उमेदवारांसोबत झाली. दोन पक्षांच्या अशा लढतीची स्थिती १९९९ आणि २००४ मध्येही होती. यावेळी या दोन बलाढ्य पक्षांच्या स्पर्धेत रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचा (आरजीपी) उमेदवार आहे. भाजपकडून विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि इंडि आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवारीवर अॅड. रमाकांत खलप आहेत. रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब हे स्वत: निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळेच ही लढत तिरंगी होईल. विद्यमान खासदाराविषयी प्रथमच यावेळी जास्त असंतोष दिसत आहे. विरोधाचे वारे सध्यातरी वेगाने वाहत असले तरी अजूनही मतदानाला बरेच दिवस बाकी आहेत. हे वारे परतून लावण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करेल.

दक्षिण गोव्यात भाजप, काँग्रेस आणि आरजीपी या तिन्ही पक्षांचे तिन्ही उमेदवार लोकसभा निवडणूक प्रथमच लढत आहेत. काँग्रेस आणि आरजीपीच्या उमेदवाराने यापूर्वी २०२२ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. भाजपच्या उमेदवार मात्र प्रथमच निवडणूक लढत आहे. भाजपने पल्लवी धेंपो यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना तर आरजीपीने रुबर्ट परेरा यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिणेत आजी माजी खासदार किंवा आमदार निवडणुकीत नाहीत. तिन्ही उमेदवार प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तिथे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये भाजपचे दोनवेळा उमेदवार निवडून आले. पण दोन्ही वेळेला मतांची आघाडी फार मोठी नव्हती. १९९९ मध्ये रमाकांत आंगले १४,४५७ मतांनी जिंकले होते. त्यानंतर २०१४ मध्ये नरेंद्र सावईकर ३२,३३० मतांनी जिंकले होते. भाजपला लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात हे दोनच विजय आतापर्यंत मिळवता आले आहेत. अन्यथा गेल्या पंचवीस वर्षांत काँग्रेसनेच बहुतांशीवेळा निवडणुका जिंकल्या आहेत. प्रथमच भाजपने यावेळी महिला उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीतील रंगतही वाढली आहे. एकतर्फी निवडणूक होईल असे चित्र नाही. काँग्रेस व भाजप यांच्यातच तेथे लढत होणार आहे. आरजीपीचा उमेदवार हा दोघांपैकी एका पक्षाचा रंग भंग करू शकतो.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत. ९७६३१०६३००