रेबिज लस व काळजी

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
24th August 2019, 11:53 am
रेबिज लस व काळजी


-
रेबिजची लस इंजेक्शनव्दारे कधी टोचून घ्यायची हे आपण गेल्या सप्ताहात पाहिले. पूर्वीप्रमाणे बेंबीवर इंजेक्शन्स घेतली जात नाही. आता केवळ पाच ते सहा इंजेक्शन्स दंडावर घेतली जातात. अर्थात बाहेर घेतली तर ती महाग पडतात. आज ही इंजेक्शन्स किती काळ गुणकारी राहतात, ते पाहू.
रेबिज लसीचा चांगला उपयोग व्हायला हवा. तर त्याची काळजीही घ्यायला हवी. नाहीतर रुग्णाला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे ही लस काळजीपूर्वक हाताळली पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवलेले इंजेक्शन योग्य तापमानात ठेवले तर ते दोन वर्षेही चांगले राहते. मात्र, बाहेर ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकते.
३७ अंश सेल्सिअस तापमानात रेबिस लस फक्त तीन महिने टिकते. ४५ अंश सेल्सिअस तापमानात ती तीन महिने चांगली राहते. तर ५५ अंश सेल्सिअस तापमानात ती केवळ एक महिना टिकते. त्यामुळे केवळ नागरिकांनीच नव्हे, तर उत्पादक, औषधालयांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
जी कंपनी रेबिस लस तयार करते आणि बाजारात विकायला आणते तेव्हा त्यावर सगळी बारीकसारीक माहिती दिलेली असते. औषधालये आणि इस्पितळ व्यवस्थापनांनी त्यावर लिहिल्याप्रमाणे या लसींची काळजी घ्यायला हवी. अन्यथा ती खराब होते व रुग्णाला काहीही फायदा होत नाही.
गोव्यात प्रत्येक सरकारी इस्पितळ व प्राथमिक आरोग्य केंद्रांना शीतकपाट दिलेले आहे. त्याचा वापर नीट करायला हवा. इस्पितळातील परिचारिका व डाॅक्टरांचे ते प्रथम कर्तव्य. त्यांनी याचा विसर पडू देता कामा नये. असे हवामान ठेवणे याला ‘कोल्ड चेन’ म्हणतात. पोलिओ लसही अशाच पद्धतीने जपून ठेवावी लागते. दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात कुठलीही लस ठेवण्याची व्यवस्था झाली तर ते उत्तम. खराब होण्याची शक्यता असलेली लस, गोळ्या, सिरप वगैरे सारी औषधे फ्रीजमध्ये ठेवायला हवीत. पण, सर्वच ठेवण्याची गरज नाही. कुठली ठेवावीत, ते त्या औषधाच्या पाकिटावर स्पष्ट लिहिलेले असते.
(लेखक निवृत्त आरोग्य संचालक आहेत.)