निसर्गाची कन्या : धनगर स्त्री

विशेष

Story: बबिता बाबलो गांवस |
17th August 2019, 11:08 am
निसर्गाची कन्या : धनगर स्त्री


-
आजचे हे युग बरेच धावपळीचे झाले आहे. साहजिकच स्पर्धेत टिकण्यासाठी माणसाला बराच त्रास, मनस्ताप सहन करावा लागत आहे. तो खूप व्यस्तही झाला आहे. त्याला समाजाप्रती प्रेम, आपुलकी नाही, असे मी म्हणणार नाही. पण, त्याच्यात हवी तेवढी तळमळ जाणवत नाही. समाज म्हटला की तो अनेक जाती-जमातींपासून बनतो. फार पूर्वीपासून अनेक रूढी-परंपरा या समाजात चालत आल्या आहेत, पण आता काही प्रमाणात रूढी-परंपरा विसर्जित होत असताना पहावयास मिळते. अर्थात काही जाती-जमातीत त्या काटेकोरपणे पाळल्या जातात.
अनेक वर्षापासून आडोशाला राहिलेली जमात म्हणजे धनगर. आपल्या चकाकत्या समाजात या धनगर जमातीचा फक्त गरजेपुरता विचार केला जातो. अर्थात निवडणूक जवळ आली की. मात्र, त्यापलीकडे तिचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, याकडे कोणी लक्षच दिलेले नाही. गरीब असूनही त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. या धनगर समाजात आजही पुरूषाचा हुकूम अंतिम, अशी स्थिती असते. धनगर महिलेने फक्त राबायचं. शिक्षण क्षेत्र तर त्यांना फारसं लाभलंच नव्हतं. अनेक सुख-सुविधांपासून आजही वंचित असलेला हा समाज. काही समाजसेविकांमुळे तो प्रकाशात आला. गावापासून दूर, अडगळीच्या जागेत राहणाऱ्या या जमातीला नवोदित युवा लेखिका, शिक्षिका शुभदा प्रकाश च्यारी यांनी आपल्या पुस्तकातून प्रकाशात आणले आहे. त्यांच्या या पहिल्या पुस्तकाचे नाव आहे, ‘धनगर स्त्री’. या जमातीला पुस्तकरूपात आणण्याचा शुभदा यांचा प्रयत्न खरंच स्तुत्य म्हणावा लागेल.
या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे, निसर्गाशी घट्ट गाठ बांधलेले निसर्गतज्ज्ञ, अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रा. राजेंद्र पांडुरंग केरकर यांची. केरकरसर प्रस्तावनेत लिहितात, गोव्याच्या भूमीत निसर्ग पूजन आणि पशुपालक अशा धनगर जमातीतल्या स्त्रियांच्या जीवनातील विशेष पैलूंचं दर्शन घडविण्याचे कार्य लेखिका च्यारी यांनी आपल्या ‘धनगर स्त्री’ या पहिल्याच पुस्तकातून प्रयत्नपूर्वक केले असल्याची प्रचिती येते. लेखिका केरकरसरांची विद्यार्थीनी. पुढे तिने संशोधक सहाय्यक म्हणून सरांबरोबर काम केले. तेव्हाच च्यारी यांनी ही लोकजीवनाची, लोकसाहित्याची माहिती संकलित केली.
रानोमाळ आणि दऱ्याखोऱ्यात धनगरांच्या पाड्यापाड्यावर जाऊन लेखिका च्यारी यांनी आपल्यातील साहित्यिक जागृत केला. त्यातूनच त्यांच्या या ‘धनगर स्त्री’ पुस्तकाला आकार लाभला. धनगर जमातीतले स्त्रीमन अजूनही इतर समाज ओळखू शकलेले नाहीत. ही स्त्री कष्टाळू आहे. अत्यंत प्रामाणिक आहे. कष्टाळू आहे. प्रामाणिकपणे जगणे, निरपेक्ष मरणे आणि अखेर अनाम उरणे, यात धनगर स्त्रियांच्या अस्तित्वाची प्रचिती येते, असे अनेक मुद्दे मांडत या ‘धनगर स्त्री’ पुस्तकाला केरकरसरांनी प्रस्तावना लिहिली आहे. चांगली विचार व लेखनशैलीद्वारे त्यांनी या प्रस्तावनेच्या रुपाने जणू ज्ञानदानच केले अाहे, असे म्हणावे लागेल.
लेखिका शुभदा च्यारी यांचे जन्मस्थान दोडामार्ग कसई. शिक्षणाच्या निमित्ताने त्या गोव्यात राहू लागल्या. पुढे गोव्याच्याच झाल्या. केरकरसर, त्यांच्या पत्नी पौर्णिमा यांचे मौलिक मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळाले. अर्थात सोबत आई-वडिलांचे आशीर्वाद. याविषयी लेखिकेने पुस्तकात लिहिले आहे. लेखिकेने ज्ञानपिपासू होऊन धनगरांच्या वाड्यामध्ये फिरताना अनेक गोष्टी बारकाईने जाणून घेतल्या. त्याचे सुंदररीत्या मांडलेले मनोगत या पुस्तकात वाचायला मिळते.
‘धनगर स्त्री’ या पुस्तकात धनगर समाजातील रूढी-परंपरांवर भरभरून लिहिले आहे. धनगर महिलेच्या अस्तित्वावर, चारित्र्यावर, कर्तृत्वावर, पर्यावरणाला दिलेल्या योगदानावर भाष्य करणारे अकरा लेख लेखिका च्यारी यांनी शब्दमाळेत गुंफले आहेत. या ७२ पानी पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, केरी- सत्तरी येथील प्रसिद्ध संस्थेने. विवेकानंद साहित्य संस्कृती अभिवृद्धी मंच हे तिचे नाव. कला आणि संस्कृती खात्याचे आर्थिक अनुदान या पुस्तकाला प्राप्त झाले आहे. मुखपृष्ठावर धनगर महिला तिच्या पारंपरिक वेषात दाखवली आहे. हे चित्र काढले आहे, समृद्धी केरकर हिने. पहिली आवृत्ती २८ जुलै २०१८ रोजी आली.
नव्या पिढीला अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ‘आेळख’ या पहिल्या प्रकरणात सापडते. केवळ पीएचडीसाठी सोडल्यास नवी पिढी असा अभ्यास करायला आपणहून पुढे सरसावत नाही. अर्थात शुभदा च्यारी सारख्या तरुण लेखिका, लेखक याला अपवाद. त्यांनी आपल्या गोव्याला ‘उष्णकटिबंध प्रदेशातील स्वर्ग’ असं संबोधत गोव्याची माहिती सुंदररीत्या मांडली आहे. पुढे धनगर समाज इतर जातीमधून कसा वगळला, हे लेखिकेने अभ्यासू वृत्तीने मांडले आहेत. हा समाज प्रामुख्याने रानात राहणारा. काळानुरूप थोडासा बदल झाला आहे, एवढेच.
पारंपरिक श्रद्धेनुसार मानले जाते की, जेव्हा देवाने सृष्टीची निर्मिती केली, तेव्हा प्राण्यांना पाहायला कोणी नव्हतं. त्यामुळे महादेवाने आपल्या मळापासून धनगराची निर्मिती केली. दुसरी एक दंतकथा अशी आहे. पूर्वी एकदा म्हणे वारुळातून शेळ्या- मेंढ्यांचे कळप बाहेर आले. काहीवेळाने त्यांना भूक लागली व ते शेतीची नासाडी करू लागले. शेतकऱ्यांनी महादेवाची प्रार्थना केली. त्यांना काही सुचेना. काही वेळाने त्यांनी या शेळ्या, मेंढ्यांची राखण, देखभाल करायला धनगर निर्माण केला. अशा अनेक दंतकथा, रुपककथा या पुस्तकात वाचायला मिळतात.
गोव्यातील धनगर समाजाची वैशिष्टे थोडक्यात आपण जाणतो. पण, लेखिकेने पुस्तकातील आपल्या कथारूपी लेखात पूर्ण धनगर समाज आपल्यासमोर उभा केला आहे. त्यांची बोलीभाषा मायमराठीशी नाते सांगणारी. अजूनही ते त्याच मराठी- कोकणी भाषेत बोलतात. बोलण्याची खास अशी शैलीही आहे. पूर्वी त्यांची वेषभूषा डोळ्यांत भरणारी होती. अंगरखा, धोतर, डोक्याला पागोटे, हातात चांदीचे कडे, काठी, कांबळ.... या वेषामुळे धनगर समाजाचं वेगळेपण उठून दिसे. आज ही वेषभूषा काही प्रमाणात कमी झाली आहे. केवळ सण, समारंभापुरती ती दिसते. अशी धनगर समाजाची अनेक वैशिष्टे या पुस्तकात वाचायला मिळतात.
बारा तालुक्यांच्या गोव्यात तिसवाडी वगळता इतर सर्व तालुक्यात धनगर वस्ती आहे. निसर्गाला आपला परमसखा मानून त्याच्याच सान्निध्यात धनगर समाजाने आपली लोकसंस्कृती सजवली, फुलविली. गोव्यातील सामाजिक जीवन पुस्तकात वाचायला मिळते. धनगर समाजाविषयी काहीही माहिती नसलेले शेकडो लोक गोव्यात आहेत. इतरत्रही आहेत, त्यांना हे पुस्तक म्हणजे जणू पर्वणीच आहे.
कित्येकदा प्रश्न पडतो ‘गवळ’ म्हणजे नेमकं काय? याचं उत्तर या पुस्तकात मिळतं. गवळ म्हणजे घर. त्यातही अनेक प्रकार. ‘गवळ’ लेखात हे सारे काही वाचायला मिळते. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल, यात शंका नाही.
धनगरांचे मुख्य व्यवसाय सविस्तररीत्या पुस्तकात मांडले आहेत. दूध देणाऱ्या प्राण्यांचे पालन करणे व दूध आणि दुधापासून तयार होणारे पदार्थ विकणे हा धनगर गवळ्यांचा मुख्य व्यवसाय. आजही ते हा व्यवसाय करतात. पुढे ‘समाज रचना’ या विषयाला लेखिका हात घालते. धनगरांची आपल्या रूढी-परंपरा जपण्याकडे जास्त कल दिसतो. जमावाने राहणारे धनगर नीतिनियम, बंधने पाळतात. मुख्यत: कुळ, वंशपरंपरा, कुटुंब वगैरेंमध्ये ते आपली विभागणी करतात. वेगवेगळी कुळे आणि कुलदैवते यांची येथे माहिती मिळते. हेडगो आणि लांबोर हे त्यांचे भटजी.
धनगर स्त्रीची जीवन पद्धती मांडताना लेखिका लिहिते, जशा पद्धतीचं जीवन भारतीय स्त्रीला मिळालंय तसंच धनगर स्त्रीलाही मिळाले आहे. मात्र, कैक ठिकाणी बदल, वेगळेपण दिसतो. या जमातीत वधुकडून वराला हुंडा मिळत नसतो, तर ‘देण’ देण्याची परंपरा आहे. अशा अनेक प्रथा, रूढी पुस्तकात वाचायला मिळतात. धनगर महिलेच्या कामाची सुरूवात भल्या पहाटे होते. तिची कामे पुरूषापेक्षा जास्त. ती ते न कुरकुरता, आळस न करता करतेही, असे अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्ष एका प्रकरणात लेखिकेने मांडले आहेत. इतरांनीही त्यावर अभ्यास करावा, असा हा विषय नक्कीच आहे.
‘धनगर स्त्री आणि लोकसंस्कृती’ यात धनगर स्त्रीने लोकसंस्कृतीला दिलेले योगदान वाचायला मिळते. प्रत्येक लोककला प्रकारात ती हिरीरीने भाग घेते. अनेक प्रकारचे फुगडी प्रकार ती सादर करते. प्रत्येक क्षण साजरा करण्यास त्यांना गीतांचा आधार लागतो.
बाळाला झोपवताना,
निजु निजु रं तान्या बाळा
बा जो जो जो जो रं तान्या बाळा
बहिणीने भावासाठी गायिलेले गीत,
आसटून लाकूड साळ्याचं, साळ्याचं
आमची कोन कोन येयाचं येयाचं
आमचा येयाचा मामा....
अनेक वेळा कोड्यांचा खेळही रंगतो,
माजा बापाला बी सोपाचा नाई आनी
तुझ्या बी बाला सोपायचा नाही
या कोड्याचे उत्तर आहे, चुना
पुढे झांजू गोविंदा आणि कोल्हा बुद्धीने भला अशा वाचण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. धनगर स्त्री म्हटलं की ती शेळ्या-मेंढ्यांना घेऊन दिवस-दिवस रानावनात फिरते. त्यामुळे तिला अनेक वनाैषधींचे उत्तम ज्ञान. अनेक रोगांवर त्या वनाैषधींचा उपचार करून स्वत: ठीक होतात आणि इतरांनाही ती औषधे देतात.
धनगरी स्त्रीगीतांतील साैंदर्य खुलवून टाकणारी गीतं स्त्रीच्या आेठांवर रूळताना आढळते.
डोंगराचा पाला नी खडकाचं पानी
आई माजे डोईचा टोपरू गेला
पाऊस लागतो बऊगळ्याचा
चरव झाला गं मऊगडाच्या
ह्यो ह्यो चरव खाईतो कोण
खाईतो खाईतो मर्गाळ म्हस
अशा अनेक गीतांचा समावेश या पुस्तकात आहे.
धनगर स्त्रीची शैक्षणिक स्तरावर तेवढीशी प्रगती झालेली नाही. लेखिकेने धनगर स्त्रीचे राहणीमान सुधारण्यासाठी सरकारने या त्यांना खास सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी या पुस्तकात केली आहे. ‘ती जगताना’ या प्रकरणात अन्य समाजातील स्त्रियांच्या तुलनेत धनगर स्त्री लेखिकेला धाडसी, करारी, कष्टाळू, प्रेमळ, मायाळू तशीच सहनशीलही वाटली. त्यामागची कारणेही त्यांनी दिली आहेत.
शुभदा च्यारी यांनी लिहिलेले ‘धनगर स्त्री’ हे पुस्तक अभ्यासपूर्ण आहे. ज्यांना या समाजावर संशोधन करण्याची इच्छा आहे, त्यांनी ते मुद्दाम वाचावे. इतर साहित्यप्रेमींसाठीही ती एक पर्वणी आहे. कारण विषय नवा, नव्या धाटणीचा.
(लेखिका कवयित्री, गृहिणी आहेत.)