बंदुकीचा धाक दाखवत पंचाला धमकी


19th March 2018, 06:33 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : मेरशी येथील बामणभाट परिसरात सांताक्रुझ मतदारसंघाचे मगो पक्षाचे माजी उमेदवार तथा मेरशी पंचायतीचे विद्यमान पंच प्रकाश नाईक यांना चार ते पाच व्यक्तींनी धारदार चाकू आणि बंदूक दाखवून धमकी देण्याची घटना रविवार सायंकाळी घडली आहे. यावेळी संशयितांनी घटनास्थळावरून पलायन करण्यासाठी हवेत दोनदा गोळीबार केला. 

या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. यावेळी स्थानिक नागरिकांनी जुने गोवा पोलिस स्थानकाकडे धाव घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ६.३० वाजता मेरशी येथील बामणभाट येथे मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांना चार ते पाच व्यक्तींनी पूर्ववैमनस्यातून चाकू आणि बंदूक दाखवून धमकी देण्याचा प्रकार घडला. यावेळी घटनास्थळी नागरिक जमाव झाले. त्यामुळे घाबरलेल्या संशयितांनी हवेत दोनवेळा गोळी झाडली व घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी पंच नाईक यानी जुने गोवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी चार ते पाच व्यक्ती विरोधात भादंसंच्या कलम ५०४, ५०६, १४३ व १४८ नुसार आणि शस्त्र अधिनियम कायद्याच्या कलम ३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जुने गोवा पोलिस निरीक्षक सुदेश वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजयकांत कवळेकर पुढील तपास करत आहे.

हेही वाचा