राहुल गांधी यांना उचलून वाहनात बसवताना पोलीस.
गोवन वार्ता न्यूज डेस्क
पणजी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत राहुल आणि प्रियंका गांधी यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले. दोघेही जंतरमंतरपासून सुमारे २०० मीटर आधीच रस्त्यावर बसले. सुरक्षा दलांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले असता, प्रियंका संविधानाची प्रत हातात घेऊन रस्त्यावरच आडव्या झोपल्या. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात झटापट झाली.
आंदोलन करत असताना लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांना बुधवारी पोलिसांनी जंतरमंतरजवळ ताब्यात घेतले. ‘इंडि’ आघाडीच्या खासदारांनी आरोप केला की, पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले. तत्पूर्वी, विरोधी पक्षाच्या खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधून खाली उतरून त्यांनी जंतरमंतरच्या दिशेने काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले. अनेक नेते आणि खासदारांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी राहुल गांधींना बळजबरीने उचलले
निवडणूक आयुक्तांशी भेटीची मागणी करत विरोधी पक्षाने धरणे आंदोलन केले. राहुल गांधी यांनी स्वतःहून गाडीत बसण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्यांना बळजबरीने उचलले. राहुल गांधी यांनी वाहनाच्या दरवाजाच्या चौकटीला पाय घट्ट रोवून विरोध केला. अखेर पोलिसांनी त्यांना वाहनात जबरदस्तीने बसवले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाराखंबा पोलीस ठाण्यात नेले. सुमारे तासाभराने त्यांची सुटका करण्यात आली.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा रस्त्यावरच ठिय्या
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयुक्तांना भेटण्याची विनंती करणाऱ्या खासदारांशी ते अशी वागणूक देतात. ते खासदारांना मारहाण करत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांनी मला अनेक ठिकाणी ओरखडे पाडले आहेत. आम्हाला जमिनीवर पाडण्यात आले. आम्ही आता इथून हलणार नाही.
पोलिसांकडून मारहाण, लाठीचार्ज : महुआ मोईत्रा
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या, शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांशी दिल्ली पोलीस क्रूरतेने वागत आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. दिल्ली पोलिसांकडून कार्यकर्ते आणि सामान्य जनतेवर निर्दयीपणे मारहाण आणि लाठीचार्ज का केला जात आहे ? खासदारांना जंतर-मंतरवर जाण्यापासून का रोखले जात आहे ?


