पणजी शहरातील बारच्या वेळेवर नियंत्रण ठेवणार : रोहित मोन्सेरात

शहरातील काही निवासी भागात सुरू असणारी बार पहाटे उशिरापर्यंत सुरू असतात. येथे मोठ्या आवाजात संगीत लावले जाते. येथे येणारे काही ग्राहक रात्री दंगा मस्ती करतात. स्थानिकांना या गोष्टींचा त्रास होत आहे. याचा विचार करून पणजी महापालिकेतर्फे बार सुरू ठेवण्याच्या वेळेवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बारचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
9 hours ago
पणजी शहरातील बारच्या वेळेवर नियंत्रण ठेवणार :  रोहित मोन्सेरात

पणजी : शहरातील काही निवासी भागात सुरू असणारी बार पहाटे उशिरापर्यंत सुरू असतात. येथे मोठ्या आवाजात संगीत लावले जाते. येथे येणारे काही ग्राहक रात्री दंगा मस्ती करतात. स्थानिकांना या गोष्टींचा त्रास होत आहे. याचा विचार करून पणजी महापालिकेतर्फे बार सुरू ठेवण्याच्या वेळेवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बारचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

बुधवारी महापालिकेच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित मोन्सेरात म्हणाले की, बार मध्ये येणाऱ्या ग्राहकांवर बारचे नियंत्रण नसते. मात्र अशा ग्राहकांमुळे स्थानिकांना मनस्ताप होत आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत बार  सुरू ठेवण्याच्या आम्ही विरोधात आहोत.

आम्ही बारसाठी नियमावली तयार करत आहोत. या नियमांचे कडक पालन केले जाईल याची खात्री आम्ही करणार आहोत. लवकरच ही नियमावली जारी करून ती सर्व बारना दिली जाईल. स्पा आस्थापनांना आम्ही केवळ परवानगी देऊ शकतो. मात्र तिथे आज काय चालू आहे हे पाहणे आमचे काम नाही.

लवकरच पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य खात्यांसह आम्ही स्पाची तपासणी करणार आहोत. सध्या आम्ही नवीन स्पा ना परवाने देणे बंद केले आहे. नियमानुसार गाड्यांना शहरात जागा देणे आवश्यक आहे. जागा मिळाल्यावर गाडीधारकांनी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

अशा ठिकाणी स्वच्छता न राखल्यास त्यांचे देखील परवाने रद्द करण्यात येतील. शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी आदीबाबत आम्ही १५ ऑक्टोबरपासून तपासणी मोहीम सुरू करणार आहोत. यामध्ये पोलीस व अन्य खात्यांची मदत घेतली जाईल.

आजच्या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. बंदर कप्तान खात्याची नवी इमारत, जेटीच्या खाजगीकरण करण्याच्या आम्ही विरोधात आहोत. याबाबत आम्ही संबंधित खात्याला पत्र लिहिणार आहोत. मांडवी किनाऱ्यावरील पदपथावर एका आस्थापनाने अतिक्रमण केल्याची तक्रार आली आहे.

याबाबत आम्ही त्या आस्थापनाला नोटीस पाठवली आहे. हे अतिक्रमण लवकरच काढण्यात येईल. कला अकादमीमध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत देखील आम्ही राज्य सरकारची चर्चा करणार आहोत.

प्रगती - ५० मध्ये पणजी शहराची निवड

महापौरांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत प्रगती - ५० या उपक्रमात पणजी शहराची निवड झाली आहे. यानुसार शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा