कोरगाव : सेन्ससच्या (जनगणना) कामकाजासाठी पेडणे तसेच गोव्यातील माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. काही शिक्षक दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असून, त्यांची सेन्सस ड्युटी सुमारे ४० दिवस राहणार आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा शैक्षणिक कालावधी आहे. अशा परिस्थितीत दहावीच्या मुख्य विषयांचे अध्यापन करणारे शिक्षक दीर्घकाळ सेन्ससच्या कामात व्यस्त राहिल्यास, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यास तसेच परीक्षेची तयारी करून घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना, विशेषतः मुख्य विषयांच्या शिक्षकांना, सेन्सस ड्युटीतून वगळण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन संबंधित शिक्षकांना सेन्सस ड्युटीतून सवलत मिळणार का, याकडे आता शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


