पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाचा नियोजित ८ आणि ९ ऑक्टोबर रोजीचा गोवा दौरा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. गोव्यात सध्या सुरू असलेली ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) मोहीम आणि मतदार यादीतील नावे वगळण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर हा दौरा स्थगित केल्याचे बोलले जात आहे.
एसआयआर प्रक्रियवरून देशात सध्या वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी आंदोलन केली जात असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सर्व घडामोडींच्पा पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा हा दौरा तूर्तास लांबणीवर पडल्याचे समजते.


